Why do some Muslim devotees refer to Jejuri’s Khandoba as Mallu Khan or Mallu Pathan?: पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेली जेजुरी वर्षभर भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात न्हाऊन निघते. गडावर उधळली जाणारी हळद, “येळकोट येळकोट जय मल्हार”चा घोष आणि घोड्यावर स्वार झालेल्या युद्धदेवतेची प्रतिमा ही जेजुरीच्या खंडोबाची परिचित ओळख आहे. मात्र खंडोबाच्या उपासनेचे वैशिष्ट्य केवळ तिच्या धार्मिक विधींमध्ये नाही. या लोकदैवताने महाराष्ट्रातील विविध जाती-जमातींबरोबरच काही मुस्लीम समुदायांनाही आपल्या श्रद्धाविश्वात सामावून घेतले आहे.

काही मुस्लीम परंपरांमध्ये खंडोबाला ‘मल्लू खान’, ‘मल्लू पठाण’ किंवा ‘अजमत खान’ अशा नावांनी संबोधले जाते. जेजुरीतील देवाच्या घोड्याची देखभाल एका मुस्लीम कुटुंबाकडे असल्याची नोंदही अभ्यासकांनी केली आहे. म्हणूनच जेजुरीकडे केवळ हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आधुनिक प्रतीक म्हणून पाहण्यापेक्षा, दख्खनच्या अनेक शतकांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून निर्माण झालेली लोकधार्मिक परंपरा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते.

खंडोबाची उपासना खरोखर ८०० वर्षे जुनी आहे का?

जेजुरीचे विद्यमान मंदिर सरसकट ‘८०० वर्षे जुने’ असल्याचे अनेकदा म्हटले जाते. मात्र येथे दोन स्वतंत्र बाबी लक्षात घ्याव्या लागतात.

  • पहिली बाब म्हणजे खंडोबाच्या उपासनेचे प्राचीनत्व आणि दुसरी बाब म्हणजे आज दिसणाऱ्या मंदिरवास्तूचा कालखंड. खंडोबा, मैलार किंवा मैलारलिंगाच्या उपासनेचे लिखित संदर्भ साधारण बाराव्या- तेराव्या शतकापर्यंत मागे जातात. त्यामुळे खंडोबाची लोकदैवत म्हणून विकसित झालेली परंपरा किमान सातशे ते आठशे वर्षे जुनी असल्याचे म्हणता येते. परंतु जेजुरी गडावरील संपूर्ण विद्यमान वास्तू आठशे वर्षांपूर्वी एकाच वेळी उभारली गेली, असे ठोसपणे म्हणता येत नाही.
  • आज दिसणाऱ्या गडकोट, ओवऱ्या, तटबंदी, दीपमाळा, पायऱ्या आणि इतर बांधकामांमध्ये मराठा व पेशवेकालीन स्थापत्याचे अनेक स्तर आढळतात. होळकर घराण्यासह विविध मराठा सरदार आणि पेशव्यांनी अठराव्या शतकात जेजुरीला देणग्या दिल्या तसेच बांधकामे केली. अनेकदा अहिल्याबाई होळकरांनी सतराव्या शतकात हे मंदिर बांधले असा दावा केला जातो. परंतु तो कालदृष्ट्या चुकीचा आहे. अहिल्याबाईंचा जन्मच १७२५ साली झाला होता. जेजुरीतील होळकरांचे योगदान अठराव्या शतकातील आश्रय, बांधकाम किंवा जीर्णोद्धाराच्या या संदर्भात येते.

महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअरमध्ये जेजुरीच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाची नोंद आढळते; तर खंडोबाच्या उपासनेच्या इतिहासविषयी सखोल संशोधन जर्मन भारतविद्याविशारद गुंथर-डिट्झ सोंथायमर यांनी केले आहे. [महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर्स विभाग: https://mahagazetteers.com/index_e.php, सोंथायमर यांचा Pastoral Deities in Western India- https://archive.org/details/pastoraldeitiesi0000sont.%5D

शिवाचे रूप, पण मुळाशी लोकदेवता

  • खंडोबाला प्रामुख्याने शिवाचा ‘मार्तंड भैरव’ अवतार मानले जाते. मल्लारी माहात्म्य या ग्रंथपरंपरेनुसार मणी आणि मल्ल या असुरांनी ऋषींना त्रास दिल्यानंतर शिवाने मार्तंड भैरवाचे रूप धारण करून त्यांचा वध केला. ‘मल्लाचा अरि’, म्हणजे मल्लाचा शत्रू, या अर्थाने ‘मल्लारी’ किंवा ‘मल्हारी’ हे नाव रूढ झाल्याचे सांगितले जाते.
  • मात्र इतिहासकार रा. चिं. ढेरे आणि सोंथायमर यांसारख्या अभ्यासकांनी खंडोबाच्या रूपातील केवळ पौराणिक शिवरूप नव्हे, तर दख्खनमधील पशुपालक आणि कृषक समुदायांच्या प्राचीन लोकदेवतेचे स्वरूप म्हणूनही ओळखले आहे. कर्नाटकातील मैलार, तेलंगणा-आंध्र प्रदेशातील मल्लन्ना आणि महाराष्ट्रातील खंडोबा या परंपरांमध्ये सांस्कृतिक नाते दिसते.
  • खंडोबाच्या परिवारातही विविध समुदायांचे प्रतिनिधित्व आढळते. म्हाळसा व्यापारी किंवा लिंगायत परंपरेशी, तर बाणाई धनगर समुदायाशी संबंधित आहे. लोककथांमधील इतर पत्नींचा संबंध शिंपी, माळी आणि तेली समुदायांशी आहे. त्यामुळे खंडोबाचे दैवतविश्व एकाच जातीय चौकटीत बंदिस्त न राहता दख्खनच्या बहुस्तरीय समाजरचनेचे प्रतिबिंब ठरते.

मुस्लीम भाविक खंडोबाला ‘मल्लू खान’ का म्हणतात?

मध्ययुगीन दख्खनमध्ये हिंदू आणि मुस्लीम समाज परस्परांपासून पूर्णपणे विलग नव्हते. गावांचे दैनंदिन जीवन, बाजारपेठा, सैन्य, पशुपालन, हस्तव्यवसाय, जत्रा आणि रोगनिवारणाशी संबंधित श्रद्धास्थाने या माध्यमांतून दोन्ही समाजांमध्ये सातत्याने देवाणघेवाण होत होती. परिणामी काही लोकदैवतांना मुस्लीम पीरांचे, तर काही पिरांना स्थानिक ग्रामदैवतांचे गुण प्राप्त झाले. खंडोबा हा नवसाला पावणारा, कुटुंबाचे आणि पशुधनाचे रक्षण करणारा तसेच रोग-संकटांपासून वाचवणारा देव मानला जातो. मुस्लीम लोकधर्मातील पीर किंवा संरक्षक संताच्या प्रतिमेशी हे स्वरूप काही प्रमाणात मिळतेजुळते आहे. म्हणून काही मुस्लीम समूहांनी खंडोबाला ‘मल्लू खान’, ‘मल्लू पठाण’ किंवा ‘अजमत खान’ या नावांनी स्वीकारल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे.

 Khandoba mandir 1855 and 1862
Khandoba mandir 1855 and 1862 (विकिपीडिया)

सोंथायमर यांनी दिलेल्या संदर्भानुसार जेजुरीत खंडोबाच्या घोड्याची पारंपरिक देखभाल एका मुस्लीम कुटुंबाकडे होती, असे मानले जाते. घोडा हा खंडोबाच्या युद्धदेवतेच्या प्रतिमेचा मध्यवर्ती घटक आहे. त्यामुळे ही जबाबदारी केवळ व्यावहारिक सेवा नसून देवाच्या अनुष्ठानिक व्यवस्थेतील महत्त्वाची भूमिका मानली जाते. काही उत्सवांतील मिरवणुका आणि घोड्याशी संबंधित विधींमध्ये मुस्लीम सेवेकऱ्यांचा सहभागही दख्खनी समन्वयाची साक्ष देतो (Sontheimer,1989).

इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, “मुस्लीम खंडोबाची पूजा करतात” असे सरसकट विधान करणे योग्य नाही. सर्व मुस्लीम समुदाय किंवा सर्व स्थानिक मुस्लीम कुटुंबे ही परंपरा पाळतात, असा पुरावा नाही. परंतु, काही मुस्लीम कुटुंब आणि प्रादेशिक लोकपरंपरांमध्ये खंडोबाविषयी आदरभाव आढळतो; काही जण त्याला मल्लू खान किंवा पीरसदृश संरक्षक मानतात.

रा. चिं. ढेरे यांनी दिलेल्या संदर्भानुसार, खंडोबाच्या उपासनेत ‘मल्लूखानाची गदा’ (गदा-शिक्षा) ही एक मुसलमानी संज्ञा सापडते. समर्थांच्या दोन पदांत मल्लूखान देव मल्लारि, मल्लू खान देतो तूफान असा उल्लेख आढळतो. यांतील पहिला उल्लेख तर ‘तुरुक मातले, फोडाया आले’ या जेजूरीवरील आक्रमणाच्या प्रसंगाचे वर्णन करणार्‍या पदातील आहे.

औरंगजेब आणि मधमाशांची कथा इतिहास आहे का?

जेजुरीच्या लोककथेनुसार औरंगजेबाच्या सैन्याने गड उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असता मधमाशांच्या थव्याने सैनिकांवर हल्ला केला. त्यामुळे औरंगजेबाला खंडोबाचे सामर्थ्य मान्य करावे लागले आणि त्याने देवाला सव्वा लाख रुपयांचा नजराणा अर्पण केला. ‘अजमत खान’ हे नावही याच कथेशी संबंधित आहे.

ही कथा जेजुरीच्या मौखिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र हा प्रसंग घडला त्याची कोणतीही समकालीन मुघल दफ्तरी नोंद, फर्मान किंवा विश्वसनीय आर्थिक दस्तऐवज सहज उपलब्ध नाही. म्हणून या कथेचे वर्णन ऐतिहासिक घटना न म्हणता स्थानिक लोकश्रद्धा किंवा दंतकथा म्हणूनच करणे अधिक योग्य ठरते, असे काही अभ्यासक सुचवतात. रा. चिं. ढेरे यांनी आपल्या दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा या ग्रंथात अजमत खान हे नाव अफजलखानाने पाली येथील खंडोबावर केलेल्या आक्रमणाशी संबंधित असावे अशी शक्यता व्यक्त केली आहे.

पोर्तुगीज घंटांचा संबंध

जेजुरीच्या मंदिरातील काही मोठ्या घंटांचा संबंध १७३९ मधील वसई मोहिमेशी जोडला जातो. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगिजांचा पराभव केल्यानंतर वसई परिसरातील चर्चमधून आणलेल्या घंटा महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना देण्यात आल्या. जेजुरीशीही अशा घंटांचा संबंध सांगितला जातो. परंतु, प्रत्येक घंटा नेमकी कोणत्या चर्चमधून आणली, ती कोणत्या वर्षी मंदिरात बसवली आणि तिच्यावरील लेख काय सांगतो, हे स्वतंत्र अभिलेखीय व शिलालेखीय तपासणीतून निश्चित करणे आवश्यक आहे.

भंडाऱ्याने जेजुरी पिवळी का होते?

जेजुरीच्या उपासनेची सर्वाधिक दृश्यात्मक ओळख म्हणजे भंडारा. हळदीचा रंग मंगलता, आरोग्य, समृद्धी आणि फलनाशी जोडला जातो. खंडोबाला कृषक आणि पशुपालक समाजाचा संरक्षक मानले जात असल्यामुळे हळदीचे कृषिसंस्कृतीशी असलेले नातेही येथे महत्त्वाचे ठरते. सोमवती अमावास्येला खंडोबा आणि म्हाळसेच्या प्रतिमांची पालखी कऱ्हा नदीकडे नेली जाते. या यात्रेत मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला जातो. त्याचबरोबर चंपाषष्ठीचा उत्सव मणी-मल्लावरील विजयाची स्मृती म्हणून साजरा केला जातो.

जेजुरीचा समन्वय नेमक काय सांगतो?

जेजुरीची परंपरा दोन धर्मांच्या सीमा नाहीशा झाल्याचे सांगत नाही. तिचे महत्त्व त्यापेक्षा अधिक सूक्ष्म आहे. इथे विविध समाजांनी आपापली धार्मिक ओळख कायम ठेवत एका प्रादेशिक लोकदैवताशी स्वतंत्र नाते निर्माण केले. कुणासाठी खंडोबा शिवाचा अवतार आहे, कुणासाठी कुलदैवत, कुणासाठी पशुधनाचा रक्षक, तर काही मुस्लीम परंपरांसाठी तो ‘मल्लू खान’ नावाचा पीरसदृश संरक्षक आहे.

महत्त्वाचे संदर्भ

  1. Günther-Dietz Sontheimer, Pastoral Deities in Western India*, Oxford University Press, 1989.
  2. Günther-Dietz Sontheimer, King of Hunters, Warriors, and Shepherds: Essays on Khandoba, Indira Gandhi National Centre for the Arts आणि Manohar.
  3. रा. चिं. ढेरे, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, पद्मगंधा प्रकाशन.
  4. Anne Feldhaus, Connected Places: Region, Pilgrimage, and Geographical Imagination in India, Palgrave Macmillan.
  5. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर्स विभाग
  6. Sahapedia – The Golden Jejuri