Why North Sentinel Island visit is illegal and dangerous for Sentinelese tribe survival: अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील घनदाट अरण्यांनी वेढलेले ‘नॉर्थ सेंटिनल’ बेट म्हणजे आधुनिक संस्कृतीला पडलेले एक न सुटलेले कोडे आहे. हे बेट केवळ भौगोलिकदृष्ट्या दुर्गम नाही, तर ते काळाच्या प्रवाहात हजारो वर्षे मागे असल्यासारखे वाटते. जगापासून पूर्णपणे अलिप्त असलेल्या या बेटावर ‘सेंटिनेलीझ’ ही जमात वास्तव्य करते. ज्या काळात एका बाजूला माणूस कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती करत आहे आणि दुसरीकडे मानवी अंतराळ मोहिमा यशस्वी करत आहे, त्या काळातही हा समाज शिकारी आणि अन्न गोळा करण्याच्या आदिम अवस्थेत जगत आहे. हजारो वर्षांपासून निसर्गाच्या कुशीत एकांतात जगणाऱ्या या समाजाने आजही बाहेरील जगाशी कोणताही संबंध ठेवण्यास ठाम नकार दिला आहे.
कायदेशीर निर्बंध आणि ‘ना संपर्क’ धोरण
सेंटिनेलीझ जमातीचे हे वेगळेपण केवळ योगायोगाने टिकून राहिलेले नाही, तर ते भारतीय नियमांच्या कडक अंमलबजावणीचे फलित आहे. हे बेट बाह्य जगासाठी पूर्णतः बंद असून, संशोधकांपासून पर्यटकांपर्यंत कुणालाही तिथे जाण्यास सक्त मनाई आहे. या निर्बंधांचा मुख्य आधार म्हणजे ‘अंदमान आणि निकोबार बेटे (आदिवासी जमातींचे संरक्षण) विनियमन, १९५६’ हा कायदा.
भारत सरकारची Hands-off Policy
सुरुवातीच्या काळात भारत सरकारने या जमातीशी मैत्रीपूर्ण संपर्क साधण्याचे काही प्रयत्न केले होते. मात्र, त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाले नाहीत. उलट, परकीयांच्या हस्तक्षेपामुळे या जमातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर भारत सरकारने ‘हस्तक्षेप न करण्याचे’ (Hands-off Policy) कठोर धोरण स्वीकारले. आज भारतीय अधिकारी या बेटावर शासन करण्यासाठी जात नाहीत, तर कोणीही बाहेरील व्यक्ती त्या क्षेत्रात शिरकाव करणार नाही याची खात्री करण्यासाठी केवळ समुद्रक्षेत्रात ५ किलोमीटरच्या परिघात गस्त घालतात.
आरोग्याचा गंभीर प्रश्न
या बेटावर जाण्यास मनाई करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ‘बायोलॉजिकल रिस्क’ किंवा जैविक धोका. सेंटिनेलीझ जमातीचा बाह्य जगाशी असलेला संपर्क नगण्य असल्याने, त्यांच्यामध्ये आधुनिक मानवी आजारांविरुद्ध कोणतीही रोगप्रतिकारशक्ती विकसित झालेली नाही. आपल्यासाठी सामान्य वाटणारा साधा सर्दी-खोकला, गोवर किंवा फ्लू त्यांच्यासाठी संपूर्ण जमातीचा नाश करणारी महासाथ ठरू शकतो.
अंदमानच्या इतिहासात ‘ग्रेट अंदमानी’ जमातीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. ब्रिटिशांच्या काळात जेव्हा या जमातीचा बाह्य लोकांशी संपर्क आला, त्यावेळी त्यांची संख्या हजारोवरून अवघ्या काही डझनांवर आली.
‘बॅटल ऑफ एबरडीन’ (१८५९)
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी अंदमानमध्ये कायमस्वरूपी वसाहत आणि ‘सेल्युलर जेल’ उभारण्याचे ठरवले. १८५९ साली अंदमानी जमातींनी त्यांच्या जमिनीवर होणाऱ्या या अतिक्रमणाविरुद्ध मोठा लढा पुकारला. हा लढा ‘बॅटल ऑफ एबरडीन’ म्हणून ओळखला जातो. आधुनिक शस्त्रास्त्रांपुढे अंदमानी लोकांचे धनुष्यबाण तोकडे पडले आणि मोठ्या प्रमाणावर त्यांची कत्तल झाली. यामुळे या जमातीची शक्ती आणि आत्मविश्वास खचला.
यानंतर, ब्रिटिशांनी धोरण बदलले. ब्रिटीशांनी या जमातीला ‘सुधारण्यासाठी’ आणि त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी ‘अंदमान होम्स’ नावाची केंद्रे उभारली. येथे अंदमानी लोकांना पकडून आणले जात असे आणि त्यांना पाश्चात्य कपडे, अन्न आणि जीवनपद्धती शिकवण्याचा प्रयत्न केला जात असे. मात्र, हा प्रयोग या जमातीसाठी ‘डेथ ट्रॅप’ (मृत्यूचा सापळा) ठरला. ब्रिटिशांच्या संपर्कात आल्यामुळे १८७७ मध्ये बेटावर गोवरची साथ पसरली. यात अंदमानी लोक मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडले. शिवाय सिफिलीस (Syphilis), इन्फ्लुएन्झा आणि क्षयरोग (TB) यांचाही प्रादुर्भाव झाला. ब्रिटिशांनी अंदमानी लोकांना तंबाखू आणि दारू यांसारखी व्यसनेही लावली.
ही ऐतिहासिक चूक सेंटिनेलीझच्या बाबतीत टाळण्यासाठी ‘विलगीकरण’ हाच त्यांच्यासाठी एकमेव औषधोपचार ठरला आहे.
प्रतिकार हीच त्यांची संमती
येथे त्यांच्या ‘संमतीचा’ मुद्दा सर्वात कळीचा ठरतो. अनेकदा प्रश्न विचारला जातो की, त्यांना मुख्य प्रवाहात का आणले जात नाही? याचे उत्तर सेंटिनेलीझ लोकांनी स्वतःच दिले आहे. गेल्या अनेक दशकांपासून, जवळ येणाऱ्या बोटी किंवा हेलिकॉप्टर्सवर बाण सोडून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. हा केवळ आक्रमकपणा नसून, आपल्या सीमांचे आणि जीवनपद्धतीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दिलेला तो एक प्रखर इशारा आहे.
१९७४ साली नॅशनल जिओग्राफिकचा एक चित्रपट निर्माता या बेटावर गेला असता, त्याच्या पायाला बाण लागला होता. २००४ च्या त्सुनामीनंतर जेव्हा भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मदत कार्यासाठी तिथे गेले, तेव्हा एका सेंटिनेलीझ लोकांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने बाण मारून “आम्ही ठीक आहोत, तुम्ही निघून जा” असाच संदेश दिला होता. त्यांच्या या प्रतिकारातच त्यांची ‘नाही’ म्हणण्याची स्पष्ट संमती दडलेली आहे.
रक्तरंजित इतिहास आणि धोक्याची घंटा
काही दुर्दैवी घटनांनी या बेटाभोवतीची सुरक्षा अधिकच कडक केली आहे. २००६ साली दोन मच्छीमारांची बोट चुकून बेटाच्या किनाऱ्याला लागली होती, त्यांना सेंटिनेलीझ लोकांनी ठार मारले. २०१८ साली जॉन ॲलन चाऊ या एका अमेरिकन धर्मप्रचारकाने स्थानिक मच्छीमारांना पैसे देऊन बेकायदेशीररित्या या बेटावर प्रवेश केला. त्याचा उद्देश या जमातीचे धर्मांतर करण्याचा होता, परंतु बेटावर पाऊल ठेवताच त्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने हे सिद्ध केले की, कायद्याचे उल्लंघन करून तिथे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. भारत सरकारने या प्रकरणी चाऊचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला नाही, कारण त्यामुळे जमातीशी संघर्ष होऊन अधिक जीवितहानी होण्याची शक्यता होती.
विकासाची वेगळी व्याख्या
जगातील बहुतांश संस्कृती विकासाच्या नावाखाली मुख्य प्रवाहात सामील होत असताना, नॉर्थ सेंटिनल बेट मात्र याला अपवाद ठरले आहे. विकास म्हणजे केवळ रस्ते, वीज आणि तंत्रज्ञान नव्हे; तर एखाद्या समुदायाला त्यांच्या इच्छेनुसार जगू देणे, हा देखील विकासाचाच एक भाग आहे. सरकारची भूमिका त्यांना आपल्या जगाशी जोडण्याची नाही, तर ते जसे अनादिकाळापासून जगत आले आहेत, तसेच त्यांचे अस्तित्व अबाधित राहावे, याची खात्री करण्याची आहे.
त्यांना त्यांच्या प्रमाणेच जगू द्या
अशा गूढ ठिकाणाबद्दल कुतूहल असणे स्वाभाविक आहे. मात्र, सेंटिनेलीझ लोकांसाठी त्यांचे अलिप्त राहणे हाच त्यांचा सर्वात मोठा बचाव आहे. ते कोणत्याही देशाचे नागरिकत्वाचे दाखले बाळगत नाहीत किंवा त्यांना जगाच्या नकाशाची फिकीर नाही. त्यांच्यासाठी त्यांचे छोटेसे बेट हेच संपूर्ण जग आहे. आधुनिक जगाने हे समजून घेणे गरजेचे आहे की, या बेटावरील लोकांशी वागण्याचा सर्वात सुरक्षित आणि नैतिक मार्ग म्हणजे त्यांच्या प्रमाणे वागू देणे. ज्या जमिनीत त्यांनी हजारो वर्षे शांततेत काढली, तिथे आपल्या कुतूहलाचा कोणताही ठसा न उमटवणे, हाच त्यांच्या स्वायत्ततेचा खरा सन्मान ठरेल.
