Pakistan Hospitals Empty Beds PTI Protest : पाकिस्तान सरकारने आपल्या देशातील रुग्णालयांना तातडीने बेड रिकामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अचानक दिलेल्या या निर्देशामुळे संपूर्ण पाकिस्तानात मोठी घबराट पसरली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील हिंसाचार आणि मोठ्या जीवितहानीची शक्यता गृहीत धरूनच हे आदेश देण्यात आल्याचे समजते, त्याविषयी…

पाकिस्तानमध्ये चाललंय तरी काय?

दुसऱ्याचे घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचे घर त्याच आगीत जळून खाक व्हावे, अशी अवस्था सध्या पाकिस्तानची झाली आहे. दशतवाद्यांना पोसणारा हा देश आता त्याच दशतवादाच्या छायेत सापडल्याचे दिसून येत आहे. आधीच पाकिस्तानात शरणार्थी असलेल्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा कुणीतरी सपाटाच लावला आहे. त्यातच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला राजकीय संकटांनाही तोंड द्यावे लागत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार अलर्ट झाले असून त्यांनी इस्लामाबादमधील अनेक रुग्णालयांना तातडीने बेड रिकामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना २४ तास उपलब्ध राहण्यास सांगण्यात आले असून त्यांच्या सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे. एवढेच नव्हे, तर आधीच रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही तात्काळ कामावर परत बोलावण्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

पाकिस्तानी नागरिकांमध्ये मोठी घबराट

पाकिस्तान सरकारच्या या आदेशांमुळे मोठी खळबळ उडाली असून तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी होणाऱ्या आंदोलनादरम्यान इस्लामाबादमध्ये मोठा हिंसाचार किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे का? असे असंख्य प्रश्न तेथील लोकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तींनी ‘ड्रॉप साइट’ला सांगितले की, येत्या सोमवारी (२८ सप्टेंबर) ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया नियोजित होत्या, त्या पुढे ढकलण्यात आल्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहे. यादरम्यान रुग्णालयांची ही पूर्वतयारी इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाच्या आंदोलकांवरील संभाव्य कारवाईशी संबंधित असल्याच्या वृत्ताला पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. त्याचवेळी ड्रॉप साइटने तपासलेल्या आदेशातील अधिकृत कागदपत्रांमध्ये संभाव्य मानवी संकट आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनादरम्यान पाकिस्तानात मोठा संघर्ष पेटण्याची भीती अधिकच गडद झाली आहे.

इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणींना अटक

पाकिस्तानात रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिल्यानंतर लगेचच प्रशासनाने इम्रान खान यांच्या तीन बहिणी अलीमा खान, नोरीन नियाझी आणि डॉ. उझमा खान यांना तडकाफडकी अटक केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अवघ्या २४ तासांच्या आत खान यांच्या कुटुंबीयांवर ही कारवाई करण्यात आली. ड्रॉप साइटने तपासलेल्या कागदपत्रांनुसार, इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांपैकी सर्वाधिक सक्रिय राहिलेल्या अलीमा खान यांना २० सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. उझमा खान आणि नोरिन नियाझी यांनाही ‘पंजाब मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर’ कायद्याच्या कलम ३ अंतर्गत अटक करण्यात आली. न्यायालयाने या तिघींनाही ३० दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

इम्रान खान यांच्या बहिणींवर आरोप काय?

उझमा खान आणि नोरीन नियाझी यांच्या अटकेनंतर लाहोरच्या उपआयुक्तांनी एक अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात दोघींवरही सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेस बाधा पोहोचवणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यापूर्वी ९ मे २०२३ रोजी पाकिस्तानात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये उझमा आणि नोरीन सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी ‘प्रवृत्त’ केले होते. तसेच त्या पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि जाहीर बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची जमवाजमव करत असून सरकारविरोधात घोषणाबाजी करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यांचे समाजात वावरणे सार्वजनिक शांततेसाठी धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावाही प्रशासनाने केला आहे.

पीटीआय कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

इस्लामाबादमधील नियोजित मोर्चापूर्वी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. देशभरात पक्षाच्या कार्यालयांवर छापे टाकले जात असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. यादरम्यान इम्रान खान यांच्यावर उपचार करणारे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फैसल सुलतान यांनाही गेल्या काही आठवड्यांपासून खान यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याचे ड्रॉप साइटने आपले वृत्तात म्हटले आहे. इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. या पार्श्वभूमीवर, येत्या रविवारी होणाऱ्या आंदोलनादरम्यान राजधानी इस्लामाबादमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.