Why Pakistan Killed its own Citizens : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये संतापाचा वणवा पेटला. अमेरिका व इस्रायलने केलेल्या या संयुक्त हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानातील लोक रविवारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यादरम्यान कराचीतील अमेरिकन दूतावास व इस्लामाबादमधील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयांवर चालून गेलेल्या संतप्त जमावावर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी थेट गोळीबार केला. या गोळीबारात आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून १७० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेवर भाष्य करताना राजकीय विश्लेषकांनी पाकिस्तानी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. त्याविषयीचा हा आढावा…
अमेरिकेच्या एका अण्वस्त्रधारी मित्रराष्ट्राने (पाकिस्तान) आपल्याच जनतेपासून अमेरिकेच्या दूतावासाचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्याच नागरिकांची हत्या केल्याची टीका प्रसिद्ध लेखक शनाका अन्सेलम परेरा यांनी केली आहे. एकीकडे पाकिस्तानी सैन्य आंदोलकांना गोळ्या घालत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानचे गृहमंत्री खामेनी यांच्या हत्येचा निषेध करीत होते. ज्या अमेरिकेने खामेनी यांना मारले, त्याच अमेरिकेच्या दूतावासाचे रक्षण करताना पाकिस्तान सरकारने आपल्याच लोकांचे रक्त सांडले. इराणशी असलेले शेजारील संबंध आणि अमेरिका व सौदी अरेबियाशी असलेल्या लष्करी मैत्रीमुळे पाकिस्तानची अवस्था ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी झाली असल्याचे परेरा यांनी म्हटले आहे.
इराणला लागून पाकिस्तानची ९५९ किमी लांबीची सीमारेषा असल्यामुळे दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच चांगले संबंध आहेत. त्यातच बलुचिस्तान हा प्रदेश दोन्ही देशांच्या सीमेवरच असल्यामुळे या संबंधांना आणखीनच बळकटी मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील शिया समुदायाचे इराणशी असलेले धार्मिक नाते अत्यंत घट्ट आहे, त्यामुळेच इराणवरील हल्ल्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या देशांतर्गत शांततेवर होत आहे. अमेरिकेने आजपर्यंत अनेकदा पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची लष्करी मदत केली आहे. पाकिस्तानकडे असलेली घातक लढाऊ विमाने व युद्धसामग्री अमेरिकेतूनच आलेली आहे. एका बाजूला अमेरिकेचा पैसा आणि दुसऱ्या बाजूला इराणशी असलेली धार्मिक जवळीक या दोन टोकांच्या ओढाताणीत पाकिस्तानच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मत परेरा यांनी व्यक्त केले आहे.
आणखी वाचा : इराणकडे कोणकोणती क्षेपणास्त्रे? सैन्य किती शक्तिशाली? अमेरिका-इस्रायलसमोरील आव्हाने कोणती?
मध्यपूर्वेतील भडकलेल्या वणव्याने पाकिस्तानला एका अशा वळणावर आणून ठेवले आहे, जिथे कोणताही निर्णय घेणे त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षात पाकिस्तानला सर्वात मोठी भीती सौदी अरेबियाच्या भूमिकेची वाटत आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये एक ऐतिहासिक धोरणात्मक परस्पर संरक्षण करार झाला होता. या कराराअंतर्गत एका देशावर झालेला हल्ला हा दुसऱ्यावर झालेला हल्ला मानला जातो, त्यामुळे जर सौदी अरेबियाने इराणवर लष्करी कारवाई केली किंवा इराणने सौदीवर हल्ला केल्यास पाकिस्तानलाही या युद्धात उतरावे लागेल. इराणशी असलेले शेजारील नाते आणि अमेरिका व सौदीशी असलेल्या लष्करी व आर्थिक मैत्रीमुळे पाकिस्तानची सध्या मोठी दमछाक होत आहे, असेही परेरा यांनी म्हटले आहे.
कराचीत नेमके काय घडले?
पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये सुमारे २,००० आणि इस्लामाबादमध्ये ५०० आंदोलकांनी अमेरिकन दूतावासावर धडक दिली. यादरम्यान आंदोलकांनी दूतावासाची बाह्य भिंत ओलांडून आत प्रवेश केला. व्हिएन्ना करारानुसार, कोणत्याही देशाचा दूतावास हा त्या देशाचा सार्वभौम प्रदेश मानला जातो, त्यामुळे अमेरिकन दूतावासात झालेला प्रवेश हा अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानले गेले. कराचीचे पोलिस प्रमुख झीशान सिद्दीकी यांनी सांगितले की, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी हिंसक रूप धारण करून पोलिसांवर दगड विटांचा मारा केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांना नाईलाजाने जमावावर गोळीबार करावा लागला.
हेही वाचा : इराणच्या खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात राजकीय वादंग का उठला? कारण काय?
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून १७० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचे डॉनने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. या घटनेचे पडसाद पाकिस्तानच्या इस्लामाबाद आणि लाहोर शहरातही उमटले. तेथील संतप्त आंदोलकांनी वाहनांची तोडफोड करून पाकिस्तान सरकार इस्लामविरोधी असल्याच्या घोषणा दिल्या. सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंगर यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडून या घटनेचा तातडीने अहवाल मागितला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यादरम्यान हा गोळीबार केवळ पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव केला की अमेरिकेच्या दबावापोटी हे आता न्यायालयीन चौकशीनंतरच समोर येणार आहे. या घटनेमुळे सध्या पाकिस्तानमधील अनेक शहरांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
खोमेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अधिकृतपणे शोक व्यक्त केला. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी खामेनी यांच्या मृत्यूला शहादत असे म्हटले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या शहादतीवर आम्ही शोक व्यक्त करतो. या कठीण काळात पाकिस्तान सरकार आणि जनता इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे शरीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. यादरम्यान त्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या या कारवाईवर टीका करीत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली. कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला किंवा प्रमुखाला अशा प्रकारे लक्ष्य न करण्याची जुनी परंपरा आहे. अशा कारवाया आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचे मत शरीफ यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी पाकिस्तानी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
