Pakistan Mediation 3 Important Reasons: पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तानने मध्यस्थी केली आहे. अमेरिका व इराण यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर शस्त्रसंधीची घोषणा केली. पाकिस्तानचे आखाती देशांशी असलेले संबंध, तसेच अमेरिका व चीनशी असलेले संबंध उघड झाले आहेत. जागतिक पातळीवरील अनेक माध्यमांनी पाकिस्तानची दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला काही दिवसांपूर्वी ‘दलाल’ म्हटले होते. तर काँग्रेस पक्षाने भाजपा सरकारच्या नेतृत्वात परराष्ट्र धोरण कमकुवत झाल्याची टीका केली होती. दरम्यान, आखाती देशांनी अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीचे स्वागत केले आहे.

पाकिस्तानने अमेरिका व इराण दरम्यान मध्यस्थी का केली? कोणत्या कारणांमुळे पाकिस्तानला मध्यस्थी करणे भाग होते? याचे चीनमधील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनी विश्लेषण केले आहे. चीनमधील माध्यमे तसेच ‘चायनीज कम्युनिस्ट पार्टी’शी संलग्न असलेल्या न्यूज वेबसाइटने पाकिस्तानचे कौतुक केले आहे.

चीनमधील तज्ज्ञांनी पाकिस्तानने मध्यस्थी का केली? त्याची कारणे सांगितली आहेत.

  • १) अमेरिका व इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानात निदर्शने झाली. त्यात किमान २० नागरिकांचा मृत्यू झाला. अमेरिका व इस्रायलचा पाकिस्तानात निषेध करण्यात आला. त्यानंतर अमेरिका व आखाती देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला.
  • २) इराण व पाकिस्तान हे शेजारील देश आहेत. त्यामुळे युद्धात सहभागी व्हायचे की नाही? याबाबत पाकिस्तानमध्ये संभ्रम होता.
  • ३) इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने पाकिस्तानमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली होती. पाकिस्तानला लागणारे ८५ टक्के कच्चे तेल हे होर्मुझ सामु्द्रधुनीतूनच पुरवले जाते. पेट्रोल व डिझेलच्या किंमती ४० ते ५५ टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानवर अंतर्गत दबाव वाढत होता.
  • ४) जवळपास ५५ दशलक्ष पाकिस्तानी नागरिक आखाती देशांमध्ये कामानिमित्त वास्तव्य करतात. या नागरिकांकडून त्यांच्या पाकिस्तानमधील कुटुंबियांना पैसे पाठवले जातात. त्यातून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते. पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तानच्या परकीय चलनावर परिणाम होत होता.

दरम्यान, “इराणची संपूर्ण सभ्यता आज रात्री संपेल”, अशी धमकी ट्रम्प यांनी दिल्यानंतर पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर हे रात्रभर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या संपर्कात होते.

मध्यस्थी करणे पाकिस्तानला अपरिहार्य का होते?

अमेरिका व इराणमधील युद्धात पाकिस्तानला कोणते धोके होते? पाकिस्तानने तात्काळ मध्यस्थी करणे का गरजेचे होते? याची कारणे ‘शांघाय इन्स्ट्यिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीज’चे प्राध्यापक लियू झोंग्यी यांनी सांगितली. पाकिस्तान व इराण हे एकमेकांचे शेजारी देश आहेत. अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले चढवले होते. या संघर्षाची झळ पाकिस्तानला बसण्याची शक्यता अधिक होती, असे प्राध्यापक लियू म्हणाले. त्यांनी पाकिस्तानवरील तीन धोके सांगितले.

१) तालिबानशी संघर्ष

पहिला धोका म्हणजे पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेला संघर्ष. पाकिस्तान व अफगाणिस्तान मधील तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये चीनमधील शिन्जियांग मध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीतील चर्चा अपयशी ठरली. कोणताही तोडगा निघाला नाही. “अफगाणिस्तान मधील तालिबान पाकिस्तानी तालिबान व इस्ट तुर्केस्तान इस्लामिक मुव्हमेंट (ETIM) सारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे”, असे प्राध्यापक लियू म्हणाले.

२) अमेरिका व सौदी अरेबिया

दुसरे कारण म्हणजे पाकिस्तानचे अमेरिका व सौदी अरेबियाशी चांगले संबंध आहेत. या युद्धात या दोन्ही देशांनी इराणविरोधात पाकिस्तानला मदत मागितली असती तर पाकिस्तानला युद्धात सहभागी व्हावे लागले असते. तसेच इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताशी खेटून आहे. या दोन्ही प्रांतांमधील संस्कृतीत साधर्म्य आहे. इथेच पाकिस्तान विरोधात लढा देणारी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ही संघटना आहे. इराण युद्धाचा फायदा घेऊन या संघटनेने पाकिस्तान विरोधात युद्ध छेडून पाकिस्तानात विस्तार करण्याची शक्यता होती. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला गंभीर धोका होता.

३) युद्धात बाजू घेण्याबाबत संभ्रम

तिसरे कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये शियांची संख्या अधिक आहे. इराण हा शियाबहुल देश आहे. अमेरिकेच्या दबावामुळे इराण विरोधात पाकिस्तानला युद्धात उतरावे लागले असते तर शियांचा रोष ओढवून घ्यावा लागला असता. तसेच पाकिस्तानात अंतर्गत मोठी फूट पडली असती. तसेच इंधन टंचाईमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत होता, याकडेही प्राध्यापक लियू यांनी लक्ष वेधले.

पाकिस्तान व सौदी अरेबियातील संरक्षण करार

पाकिस्तान व सौदी अरेबियामध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये एक संरक्षण करार झाला आहे. त्यानुसार दोन्ही देशांपैकी एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल. दोन्ही देश एकमेकांच्या मदतीला येतील, असे करारात नमूद आहे. इराणने युद्ध सुरू झाल्यानंतर सौदी अरेबियावरही हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानला सौदी अरेबियाच्या मदतीला जाणे अनिवार्य होते. या कारणामुळे देखील पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानवर दबाव?

पाकिस्तानचे इस्रायलबरोबर संबंध चांगले नाहीत. तसेच अमेरिका व इराण, आखाती देशांशी पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत. पाकिस्तानने मध्यस्थी करण्यात हे कारण देखील महत्वाचे ठरले. तसेच अण्वस्त्र असलेला पाकिस्तान हा एकमेव इस्लामिक देश आहे. त्यामुळे सौदी अरेबिया व अमेरिकेने पाकिस्तानवर मध्यस्थीसाठी दबाव आणल्याचे म्हटले जाते. दरम्यान, चीनने देखील पाकिस्तानला मदत केली. पाकिस्तान व चीनने मिळून पाच कलमी शांतता प्रस्ताव तयार केला.