Why people die in their sleep: रात्री झोपताना आपण उद्याची स्वप्नं पाहत असतो. घरातले सगळे शांत झोपलेले असतात आणि सकाळी सगळे पुन्हा उठतील, हीच अपेक्षा असते. पण काही वेळा ही झोपच एखाद्यासाठी शेवटची ठरते. बाहेरून पाहता झोपेत मृत्यू येणं शांत किंवा वेदनामुक्त वाटतं; मात्र वैद्यकीयदृष्टीने पाहिलं तर असा मृत्यू अनेकदा गंभीर, निदान न झालेल्या किंवा दुर्लक्षित आरोग्यविषयक समस्यांचा इशारा असतो. म्हणूनच ‘झोपेत मृत्यू’ हा विषय वेदना नसलेला वाटत असला तरी तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

संशोधन काय सांगतं?

वैद्यकीय संशोधन स्पष्ट सांगतं की, झोपेत होणारे बहुतेक अचानक मृत्यू हे हृदय, फुफ्फुस किंवा मेंदूशी संबंधित आजारांमुळे होतात. Journal of the American College of Cardiology मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया (OSA) असलेल्या व्यक्तींमध्ये अचानक हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरीत्या अधिक असतो. विशेषतः ज्यांना तीव्र स्लीप ॲप्निया अर्थात झोपेदरम्यान श्वसन थांबण्याचा विकार आहे त्यांच्या झोपेदरम्यान रक्तातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते, अशा रुग्णांमध्ये हा धोका अधिक असतो, असे आढळून आले आहे.

झोपेत मृत्यू होण्यामागील सर्वात मोठं कारण

झोपेत मृत्यू होण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे अचानक हृदयविकाराचा झटका. यालाच Sudden Cardiac Arrest म्हटलं जातं. या स्थितीत हृदयाचे ठोके अचानक थांबतात. विशेषतः झोपेत असताना अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न मिळता हा प्रकार घडतो. कॉरोनरी आर्टरी हृदयाला रक्तपुरवठा करणारी महत्त्वाची धमनी, हृदयातील अनियमित ठोके किंवा हृदयाच्या झडपांचे विकार असलेल्या लोकांमध्ये हा धोका जास्त असतो. झोपेत हृदयविकाराचा झटका आल्यास वेळेत मदत मिळणं कठीण होतं आणि त्यामुळे काही मिनिटांतच मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, हृदयाच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं, नियमित तपासण्या करणं आणि त्याद्वारे जोखीम ओळखणं या माध्यमातून हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

Death in sleep
निद्रानाश हे अनेकदा हृदयविकाराचे कारण ठरते…

स्लीप ॲप्निया

स्लीप ॲप्निया हा झोपेत होणाऱ्या मृत्यूशी जोडलेला एक अत्यंत गंभीर विकार आहे. या आजारात झोपेत श्वास वारंवार थांबतो, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ही ऑक्सिजनची कमतरता हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर सतत ताण निर्माण करते. दीर्घकाळ असा ताण राहिल्यास हृदयविकार, स्ट्रोक किंवा झोपेत अचानक मृत्यूचा धोका वाढतो. मात्र, योग्य वेळी निदान झाल्यास CPAP थेरपी, वजन नियंत्रण आणि झोपेच्या सवयींमध्ये बदल केल्याने या धोक्यांपासून संरक्षण मिळू शकतं.

Death in sleep
हृदयविकाराचा झटका अनेकदा केव्हा येतो?

डेड-इन-बेड सिंड्रोम

मधुमेह, विशेषतः टाइप 1 डायबेटीस झालेल्या व्यक्तींमध्येही झोपेत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. काही रुग्णांमध्ये झोपेदरम्यान रक्तातील साखरेची पातळी अत्यंत कमी होऊ शकते. या स्थितीला ‘डेड-इन-बेड सिंड्रोम’ असं म्हटलं जातं. अशा वेळी रुग्णाला जाग येत नाही आणि गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखरेची नियमित तपासणी, इन्सुलिनचे योग्य डोस आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कुटुंबीयांनाही अशा रुग्णांमधील धोक्याची लक्षणं ओळखता येणं तितकंच महत्त्वाचं ठरतं.

Epilepsy: अपस्मार

अपस्मार म्हणजेच Epilepsy असलेल्या रुग्णांमध्ये झोपेत होणारा अचानक मृत्यू, ज्याला SUDEP म्हटलं जातं, हा देखील एक गंभीर धोका आहे. विशेषतः ज्या रुग्णांमध्ये Epilepsy चे झटके नियंत्रणात नाहीत, अशा रुग्णांना हा धोका जास्त असतो. औषधं नियमित घेणं, झटक्यांची नोंद ठेवणं आणि झोपेदरम्यान निरिक्षण करणारी उपकरणं वापरणं यामुळे हा धोका कमी करता येतो. झोपेत येणारे स्ट्रोक वा झटका आणि मेंदूशी संबंधित आजार हेही अनेकदा जीवघेणे ठरू शकतात. उच्च रक्तदाब, धमन्यांमध्ये साठलेली चरबी किंवा अॅन्युरिझम यांसारख्या कारणांमुळे रात्री स्ट्रोक येण्याची शक्यता असते. म्हणूनच रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, औषधांचं नियमित सेवन आणि वेळोवेळी तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे.

याशिवाय, COPD, तीव्र दमा किंवा न्यूमोनिया यांसारख्या श्वसनविकारांमध्ये हा धोका अधिक वाढतो. झोपेदरम्यान श्वसनाची गती मंदावते आणि त्यामुळे आधीच कमकुवत असलेल्या फुफ्फुसांवर अतिरिक्त ताण येतो. योग्य उपचार, प्रदूषण आणि धुरापासून दूर राहणं आणि धोकादायक लक्षणं आढळल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणं यामुळे हा धोका कमी करता येतो.

या सगळ्या वैद्यकीय कारणांबरोबरच घातक जीवनशैली हेदेखील झोपेत येणाऱ्या मृत्यूमागचे महत्त्वाचे कारण आहे. धूम्रपान, अतिमद्यसेवन आणि लठ्ठपणा हे घटक हृदयरोग, श्वसनविकार आणि स्लीप ॲप्नियाला चालना देतात. धूम्रपान सोडणं, मद्यसेवन मर्यादित ठेवणं आणि आरोग्यदायी वजन राखणं यासारखे बदल केल्यास धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. झोपेत मृत्यू टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिबंधात्मक दृष्टिकोन राखणं. नियमित आरोग्य तपासण्या, झोपेची गुणवत्ता सुधारणे, दीर्घकालीन आजार नियंत्रणात ठेवणे आणि झोपेशी संबंधित कोणताही त्रास जाणवताच तज्ज्ञांचा सल्ला घेणं या उपाययोजनांमुळे झोपेत असताना येणारा मृत्यू टाळता येऊ शकतो.

झोप ही विश्रांतीसाठी असावी. झोपेत मृत्यू येणं जरी शांत वाटत असलं, तरी ते बहुतेक वेळा गंभीर आजारांकडे दुर्लक्ष केल्याचेच लक्षण असते. योग्य माहिती, वेळेवर निदान आणि सजग जीवनशैली यामुळे सुरक्षित झोप आणि दीर्घ आणि निरोगी आयुष्य नक्कीच शक्य आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.