डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Extramarital Affairs and Science Of Sexual Health: विवाहबाह्य संबंधांचा विचार करताना असे लक्षात येते की, ‘प्रेअरी व्होल’ या प्राण्यासारखी एकनिष्ठा इतर प्राण्यांमधे क्वचितच आढळते. या एकनिष्ठेला कारण असते ‘व्हाजोप्रेसीन’ हॉर्मोनच्या मेंदूतील ‘व्हेंट्रल पॅलीडम’ या भागात असणाऱ्या ‘रिसेप्टर्स’ वा ग्रहणबिदूंचे मुबलक अस्तित्व. असे ‘व्हाजोप्रेसीन’च्या ‘रिसेप्टर्स’चे घनदाट ‘एकनिष्ठ’ जाळे मनुष्यप्राण्यात क्वचितच असते. किंबहुना नसतेच. म्हणूनच अशी एकनिष्ठा निसर्गदत्त जरी नसली तरी समाजबांधणीसाठी निर्माण केलेल्या लग्नसंस्थेच्या मूलसंहितेमधे ती अभिप्रेत आहे. मुळात नैसर्गिक नसलेली एकनिष्ठा विवाहितांवर बंधनकारक केली गेली. यालाच वैवाहिक नीतिमत्ता म्हटले जाते.
कामभावनेचे लोणी
परंतु या नीतीमत्तेची सांगड लैंगिकतेशी असमान पद्धतीने घातल्याने सामाजिक गोंधळ उडाले आहेत. कारण या एकनिष्ठेला केवळ योनीपावित्र्यात अडकवल्याने व लिंगपावित्र्याचा विचार सामाजिक व्यवस्थेत पुरेशा गांभीर्याने न केल्याने ‘विवाहित पुरुष उधळणारा सांड असला, तरी विवाहित स्त्रीने मात्र स्वतःला पूजनीयच ठेवले पाहिजे, अशी सामाजिक मनोधारणा बनून गेली. गंमत म्हणजे ही धारणा बनवणारे बहुतांशी पुरुषच होते आणि स्वतःला अशा बंधनात ‘कुठल्याही स्थितीत’ धन्य मानणाऱ्या स्त्रिया आपण कामभावनेचे लोणी जवळ बाळगून आहोत हे विसरून गेल्या… फक्त पुरुषी विस्तव जवळ यायचाच काय तो अवकाश.
लग्नसिद्ध अधिकार
अशा कित्येक विवाहित केसेस माझ्याकडे आल्या आहेत ज्यांना त्यांच्या जोडीदाराकडून सेक्समधील समाधान सोडून द्या, त्याचा अनुभव देणेही टाळले जाते. अशा स्त्री-पुरुषांना मूळ समस्या असते ती म्हणजे त्यांच्या सेक्सभावनेची होणारी कुचंबणा आणि मग इतरत्र लक्ष जाऊन होणारी मनाची कुतरओढ. या समस्येला सर्वात पहिला उपाय म्हणजे त्या विवाहित दांपत्याचे काउन्सेलिंग करणे, नात्यामधे जोडीदाराला मिळालेल्या कायदेशीर व समाजमान्य ‘लग्नसिद्ध अधिकारा’ची जाणीव करून देणे, लैंगिक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी उद्युक्त करणे आणि ‘सेक्सला नकार देणे’ हा जोडीदारावर होणारा मानसिक अत्याचारच आहे हे मनावर बिंबवणे.

वैवाहिक फसवणूक
या ‘नाकारल्या गेलेल्या लग्नसिद्ध अधिकारा’मधे समाजाला कल्पनाही नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया आहेत. म्हणजेच पुरुषही असा अत्याचार करण्यात आघाडीवर आहेत. त्यातील काहीजण ‘होमोसेक्शुअल’ किंवा ‘बायसेक्शुअल’ही असून लोकलाजेखातर लग्न केलेले असतात. स्त्रीविषयी आकर्षण त्यांना नगण्य असते अथवा अजिबात नसते. अशा कुढणाऱ्या स्त्रिया जेव्हा तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्या जोडीदाराने त्यांची केलेली ‘वैवाहिक फसवणूक’ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते.
स्त्रीचाही तेवढाच अधिकार
मुळात अशांचा तो ‘विवाह’ संपन्नच झालेला नसतो. त्यामुळे संपूर्ण वैवाहिक जीवनाविषयी वा केवळ कामजीवनाविषयी हवा तो निर्णय घेण्यास त्यांना पूर्ण मोकळीक मिळालेली असते. कारण वैवाहिक जीवनातील सेक्सची ‘मागणी’ हा केवळ पुरुषाचा अधिकार नसून तो स्त्रीचाही तेवढाच अधिकार आहे, याविषयी स्त्री आता जास्त जागरूक झालेली आहे. तिने तसे असायलाही पाहिजे. प्रत्येक विवाहित स्त्रीने जाणून घेतले पाहिजे की, सेक्स ही तिच्याही आनंदाची, मनशांतीची व शरीरस्वास्थ्याची गोष्ट आहे.
‘काम’चुकार पती
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील १७९ व्या सूक्तामधे लोपामुद्रा आणि तिचा ‘काम’चुकार पती अगस्त्यमुनी यांच्यातील जो संवाद आहे तो सध्याच्या स्त्रीच्या मानसिकतेलाही लागू आहे. विशिष्ट पारमार्थिक उद्देश नजरेसमोर ठेवून जेव्हा अगस्त्यमुनी आपल्या गृहस्थाश्रमी ‘काम’धर्माला टाळत होते तेव्हा त्यांच्यावर चिडून लोपामुद्रा म्हणते की, वयाप्रमाणे स्त्रीचे आकर्षक शरीर नष्ट होत असते. तेव्हा मला समाधान देणे हे तुमचे कर्तव्य आहे. लोपामुद्राने जसे ठामपणे सांगून पतीदेवांना प्रवृत्त केले तसे काही स्त्रियांना सध्याच्या काळातही करावे लागते.
सेक्स आणि गिल्ट
नुकतीच तिशी-पस्तिशीच्या विनया व विनयची केस आली होती. लग्न होऊन तीन वर्षे झाली होती, पण कामजीवन हे ढेपाळले होते. एरवी विनय तिच्याशी तसा व्यवस्थित वागायचा. पण महिन्या-दोन महिन्यांतून कधीतरी विनयाने पुढाकार घेतला तरच या ‘कामा’त विनय लक्ष घालायचा व तेसुद्धा मोजून पाच मिनिटे. विनया त्याला वारंवार सांगून थकली व शेवटी तिने तिचा एक मित्र निवडायचा विचार पक्का केला. हा मित्र तिच्याच मित्रमंडळींपकी होता. त्याला तिच्याविषयी कधीपासूनच ‘सॉफ्ट कॉर्नर’ होता. तिला तो समजून घ्यायचा. तिला धीर द्यायचा. एक दिवस तिने तिचे दुख त्याला ऐकवलेच. विनयाविषयी त्याच्या मनाचा ओलावा जास्तच वाढला आणि विनयाही त्यामुळे ‘कोरडी’ राहू शकली नाही. विनयाला सुरुवातीला ‘गिल्टी’ वाटले पण नंतर तो अधिकारच आहे हे मानून तिने ते स्वीकारले.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
माझ्याकडे येण्याचा तिचा उद्देश होता जे चालले आहे ते योग्य आहे का व त्यातून एचआव्ही, एड्सची शक्यता किती हे विचारणे एवढेच होते. पहिल्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच तिचे तिनेच शोधले असल्याने ‘माझे मत’ तिच्या दृष्टीने गौणच होते. ते बरोबरही होते म्हणा. ‘पाण्यामधे मासा राहतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ या प्रमाणे तिचे दुःख तिलाच माहीत व त्याची तीव्रताही तिलाच भोगावी लागत असल्याने तो प्रश्न सापेक्षच होता. व्यक्तिनिष्ठ होता. तीच योग्य निर्णय घेऊ शकणारी व्यक्ती होती. दुसऱ्याचे उत्तर मित्राच्या ‘कॅरॅक्टर’वर असल्याने तिला त्याची खात्री होती. माझ्याकडून केवळ शिक्कामोर्तब. बाकी काय?
माधवरावांची ट्रॅजेडी
पंचावन्न वर्षांच्या माधवरावांची गोष्ट ही जरा ‘ट्रजेडी’च होती. गेली कित्येक वर्षे त्यांच्या बायकोने त्यांचे कामजीवन उद्ध्वस्त करून टाकले होते. आणि त्याला कारण होती ती ‘सासू’. माधवराव एकुलते एक. वडील नाहीत. आता आईचे वय झालेले. माधवरांवाच्या दृष्टीने बायकोच भांडखोर स्वभावाची. बायकोने सेक्स काय, पण साधा संपर्कसुद्धा कित्येक वर्षे टाळला होता.
कामसौख्यासाठी…
जन्माला घातलेल्या एका मुलासाठी केवळ ती माधवरावांबरोबर राहात होती. माधवराव तसे शांत व सालस स्वभावाचे दिसत होते. बरीच वर्षे स्वतःचा ‘कामनिर्वाह’ स्वतःच करीत होते. पण कंटाळले असतानाच त्यांच्या संपर्कात अचानक एक मैत्रीण आली, तीही विनापाश. मग काय? त्यांची ही शारीरिक, मानसिक व भावनिक गरज जोडीदार मुद्दामूनच नाकारत असेल तर त्यांना दुसरा मार्गच काय होता? मैत्रीण त्यांना हवी तशी मिळाल्याने तिला आपल्याकडून कामसौख्य व्यवस्थित मिळावे म्हणून माधवराव सल्ल्यासाठी माझ्याकडे आले होते.
सेक्सची ‘मिसिंग कडी’
म्हणजेच विनया काय किंवा माधवराव काय विवाहित असूनही ‘निकामी’ जोडीदारामुळे पती, पत्नी ऐवजी ‘वो’ कडे ओढले गेले होते. त्याचे त्यांना वैषम्य जरी वाटत होते तरी त्यांना ते क्षम्यच वाटत होते. या सर्व घडणाऱ्या गोष्टींना आपण कारणीभूत नसून आपला जोडीदारच आहे हे ठाम मानल्यामुळे त्यांची ‘अपराधी भावना’ही नष्ट होत होती व काळाच्या ओघात ते दोघेही जीवनातील ‘मिसिंग’ कडी मिळाल्याच्या आनंदात होते.
असमाधानी लैंगिक जीवन
केवळ सेक्सची ‘मिसिंग कडी’ असल्यानेच नव्हे तर ‘वो’ चा शोध इतर कारणांनीही घेतला जातो. पण स्त्री व पुरुष यांची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. पुरुषामधे असमाधानी लैंगिक जीवनच नव्हे तर रटाळ बनलेले, नीरस कामजीवन हेही महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून येते. तर स्त्रीला तिच्या भावविश्वाला पतीने ‘अस्पृश्य’ मानल्यास प्रचंड दुःख होत असते. पतीकडून होणाऱ्या सततच्या दुर्लक्षामुळे वैफल्यग्रस्त होऊन सुयोग्य ‘वो’ शोधला जाऊ शकतो.
पती-पत्नीमधे वैवाहिक पोकळी
वैवाहिक बंधन हे शारीरिक, मानसिक व भावनिक अशा त्रिबंधात न राहाता जर साखळदंड बंधनच बनू लागले तर मात्र त्या पती-पत्नीमधे वैवाहिक पोकळी निर्माण होऊन ती भरून काढण्यासाठी त्यात ‘वो’चा प्रवेश होतो. किंबहुना तो अटळच असतो. आणि मग अशा परिस्थितीत संबंधितांना समाजमान्यतेची गरज वा कोणाच्याही संमतीची आवश्यकता वाटत नाही.
नातेसंबंधातील गोंधळ स्वाभाविकच
विवाहासारखे नातेच नैसर्गिक नाही, ते निवडलेले असते व त्या नात्यात अभिप्रेत असणारी ‘एकनिष्ठा’ही मानवात ‘व्हाजोप्रेसीन’च्या ‘रिसेप्टर्स’चे घनदाट जाळे मानवी मेंदूत निसर्गाने बनवले नसल्याने निसर्गदत्त नाही (ती जाणीवपूर्वक ठेवावी लागते), त्यावेळी नातेसंबंधात गोंधळ होणे स्वाभाविकच मानले पाहिजे आणि हजारो वर्षांचा मानवी इतिहास याला साक्ष आहे. म्हणूनच शारीरिक, मानसिक व भावनिक अशा त्रिबंध कामजीवनासाठी ‘विवाहपूर्व काउन्सेलिंग’ व ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ची तत्त्वे शिकणे ही काळाची गरज आहे. नाहीतर जोडीदार नाठाळ असल्यास घटस्फोटांची मागणी किंवा अफेअर्सच्या ‘ओअॅसिस’चा शोध घेतला जाणे यात आश्चर्य ते काय?
