दिग्दर्शक ओम राऊत आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सगळीकडे याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. ५०० कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर एका कार्टूनप्रमाणे वाटत असल्याने प्रेक्षकांनी यावर टीका करायला सुरुवात केली. एखादी गोष्ट प्रेक्षकांच्या मनातून उतरली की त्याबद्दल फक्त नकारात्मक गोष्टीच आपल्याला दिसतात याचं ताजं उदाहरण म्हणजे या चित्रपटाला होणारा विरोध आणि त्यामागची कारणं. चित्रपटाचे व्हीएफएक्स आणि इतर गोष्टी याबद्दल तर लोकांनी निराशा व्यक्त केली आहेच पण प्रेक्षक आता हळूहळू त्यातल्या बारीक सारीक चुकादेखील निदर्शनास आणून देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुतेक असं प्रथमच होत आहे की एखाद्या चित्रपटाबद्दल सगळ्यांच्याच भावना आणि मतं ही सारखीच आहेत. ‘आदिपुरुष’च्या टीझरला सरसकट सगळ्यांनीच नापसंती दर्शवली आहे. व्हीएफएक्स मध्ये गडबड होणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण चित्रपटातील कित्येक दृश्यं ही इतर कलाकृतीची भ्रष्ट नक्कल आहे, तसेच रामायणासारख्या महाकाव्याला बीभत्स पद्धतीने मांडले आहे असेही आरोप लोकांनी केले आहेत. काही अंशी त्या आरोपांशी आपणही सहमत आहोत हे मान्य करावं लागले.

आता तर भाजपा आमदार राम कदम यांनीही या चित्रपटावर भाष्य केलं आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, तसेच हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा असा अपमान खपवून घेणार नाही असं म्हणत राम कदम यांनी या चित्रपटाचा निषेध केला आहे. शिवाय केवळ माफी मागून किंवा दृश्यं हटवून चालणार नाही, अशा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही राम कदम यांनी केली आहे. एकूणच या चित्रपटाच्या विरोधात ज्याप्रकारचं वातावरण तयार होत आहे ते पाहता याच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित होऊ शकतं. केवळ या एका टीझरवरुन या चित्रपटावर एवढी टीका का होत आहे? याचा आढावा आपण आजच्या लेखातून घेणार आहोत.

व्हीएफएक्स मधली गडबड :

चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सर्वप्रथम या टीझरमध्ये दाखवलेल्या स्पेशल इफेक्टबद्दल लोकांनी टीका करायला सुरुवात केली. यामधील व्हीएफएक्स आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने झाला नसून अत्यंत बालिश अशी दृश्यं लोकांसमोर मांडल्याने त्यांचा हिरमोड झाला. २०२२ मध्ये ५०० कोटी खर्च करून असे चित्रपट पुढे येणार असतील तर लोकांनी तरी या गोष्टीला का प्रोत्साहन द्यावं ही गोष्ट तशी विचार करायला लावणारी आहे. हा टीझर पाहून लोकांनी यापेक्षा ‘ब्रह्मास्त्र’मधले स्पेशल इफेक्ट उत्तम होते असं म्हणत यावर टीका केली.

भ्रष्ट नक्कल केल्याचे आरोप :

टीझरमधील बहुतांश दृश्यं ही जपानी रामायण एनिमेशन सीरिजवरुन घेतल्याचे आरोप लोकांनी केले आहेत. इतकंच नाही तर दोन्ही दृश्यांची तुलना करणारे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. ‘आदिपुरुष’मधील वानरसेनेचं चित्रण आणि हॉलिवूडमध्ये बनलेल्या ‘प्लॅनेट ऑफ एप्स’ या चित्रपटामधील बरंच साम्य लोकांनी दाखवून दिलं आहे. रावणाच्या पुष्पक विमानाऐवजी जो प्राणी दाखवला आहे त्याची तुलना प्रेक्षकांनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील ड्रॅगनशी केली आहे. अशा असंख्य गोष्टी लोकांनी पुराव्यासह सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यामुळे ही भ्रष्ट नक्कल बघण्यापेक्षा रामानंद सागर यांचं जुनं रामायण बघणं अधिक उत्तम असंही लोकांनी म्हंटलं आहे.

प्रभासने साकरलेले प्रभू श्रीराम :

चित्रपटात प्रभास गारू हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण टीझरमधून श्रीराम आणि प्रभास यांच्यात कोणतंही साम्य प्रेक्षकांना आढळून आलेलं नाही. श्रीराम यांची शरीरयष्टी काटक होती, आजही आपल्या देशातील श्रीराम यांची कोणतीही प्रतिमा बघितली तरी आपल्याला ते स्पष्ट होतं. या चित्रपटात मात्र प्रभासची बलदंड शरीरयष्टी लोकांना खटकली आहे. याबरोबरच त्याने ठेवलेल्या मिशीमुळेही प्रचंड वाद निर्माण होत आहे. इतकंच नाही तर लोकं आता यामध्ये बारीक सारीक चुकाही काढू लागले आहेत. एका दृश्यात प्रभास आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या पायात विशिष्ट प्रकारच्या चपला आपल्याला पाहायला मिळतात, यावरूनही लोकांनी रामायणातले अनेक संदर्भ देत प्रभासच्या या लूकवर आणि ओम राऊतवर सडकून टीका केली आहे.

रावण की इस्लामी आक्रमणकर्ता?

सैफ अली खानने यामध्ये साकारलेली ‘लंकेश’ ही भूमिका रावणावरुन प्रेरित आहे. याबाबतीत मात्र सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू आहे. या पात्रामध्ये काढलेल्या त्रुटि बहुतेक सगळ्याच लोकांना पटल्या आहेत. रावणाच्या लंकेचं चित्रीकरण आणि आदिपुरुषमध्य दाखवलेली लंका यामध्ये प्रचंड फरक लोकांना आढळून आला आहे. रावणाची वेशभूषा, हेअर स्टाइल, डोळ्यात लावलेले काजळ आणि या पात्राला दिलेला एक गडद रंग यावरून हा रावण एक इस्लामी आक्रमक वाटत असल्याची जोरदार टीका होऊ लागली आहे. शिवाय सैफ अली खानने हे पात्र साकारल्याने त्याच्यावर वैयक्तिक टीका होताना दिसत आहे. सैफच्या रावणाची तुलना लोकांनी तैमुर आणि खिलजी यांच्याशी केली आहे.

हनुमानाच्या लूकवरुनही चर्चा :

चित्रपटात हनुमानाची भूमिका मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यांनी साकारली आहे. नागे यांची शरीरयष्टी जरी या भूमिकेसाठी योग्य असली तरी हनुमानाचा चेहेरा हा ज्यापद्धतीने दाखवला आहे तो प्रेक्षकांना चांगलाच खटकला आहे. मनुष्यरूपी वानर असल्याकारणाने हनुमानाच्या तोंडाजवळ फुगवटा आहे ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहेच. या टीझरमध्ये हनुमानाची जी दृश्यं आहेत त्यात आपल्याला तो फुगवटा पाहायला मिळतो, पण नागे यांनी साकारलेल्या हनुमानाला असलेली दाढी आणि सफाच केलेली मिशी यामुळे तो हनुमान मौलवी वाटत असल्याचं लोकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. हनुमानाची दाढी ठेवून मिशी उडवण्यामागे नेमकं ओम राऊत यांचं लॉजिक यावर प्रेक्षक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

आणखी वाचा : धनुष-ऐश्वर्या घटस्फोटावर करणार पुनर्विचार? खुद्द रजनीकांत करणार मध्यस्थी

एकूणच ओम राऊतचा ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून हा चित्रपट बनवण्यामागची मानसिकता योग्य नसल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. इतर कलाकृतींची केलेली भ्रष्ट नक्कल, रामायणासारख्या महाकाव्याचं अयोग्य चित्रण आणि पात्रांना विशिष्ट धर्माची छटा देण्याचा प्रयत्न यामुळे सध्या ‘आदिपुरुष’वर बंदी घालावी अशी मागणी होताना आपल्याला दिसत आहे. नुकतंच ओम राऊत यांनीही या सगळ्या प्रतिक्रियांवर त्यांची नाराजी दर्शवली आहे. सध्यातरी या चित्रपटाला होणारा विरोध पाहता याचं भवितव्य फारसं चांगलं नसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why people want to boycott prabhas starrer om rauts upcoming movie adipurush avn
First published on: 06-10-2022 at 13:31 IST