Japan Plastic Shortage: पश्चिम आशियातील युद्धामुळे जपानमध्ये कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जपानमध्ये प्लास्टिक मिळवणे अवघड झाले आहे. प्लास्टिकचे साहित्य किंवा वस्तू तयार करण्यासाठी नाफ्थाची आवश्यकता असते. कच्च्या तेलातून नाफ्था मिळवले जाते. जपानमध्ये सध्या कच्च्या तेलाचा तुटवडा असल्याने नाफ्थाची निर्मिती थांबली आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या, फूड ट्रे, रबरचे हातमोजे आणि पॅकेजिंग मटेरिअल यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता प्लास्टिकपर्यंत येऊन पोहोचली आहे. जपानमधील व्यावसायिकांवर या परिस्थितीचा कसा परिणाम झाला, जाणून घेऊयात.

जपानमध्ये प्लास्टिकचा तुटवडा का आहे?

जपानमध्ये प्लास्टिकचे साहित्य किंवा वस्तू मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने प्लास्टिकच्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे. ‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या माहितीनुसार, जपान हा मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलासाठी पश्चिम आशियातील देशांवर अवलंबून आहे. होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने जपानची चिंता वाढली आहे. प्लास्टिक, प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी शाई, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित उत्पादने तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून नाफ्था वापरले जाते. प्लास्टिक निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल असलेले नाफ्था हे कच्च्या तेलापासून (क्रूड ऑईल) बनवले जाते. सध्या नाफ्था कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्याच्या सूचना

अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये नाफ्था नसल्याचे परिणाम दिसून येत आहेत. बेकरी व्यवसाय व किराणा दुकानदारांचे जपानमध्ये मोठे नुकसान होत आहे. त्यांचा वस्तू विक्रीचा खर्च वाढला आहे. तसेच अनेक प्लास्टिकशी संबंधित अनेक उत्पादनांचा तुटवडा झाला आहे. टोक्योमध्ये रेस्तराँ चालवणाऱ्या एका व्यक्तीने ‘सीसीटीव्ही’ या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रबरचे हातमोजे मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे खर्च खूप वाढला आहे.

किरकोळ विक्रेत्यांनाही कठीण काळाचा सामना करावा लागत आहे. ‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, कावासाकी येथील एका सुपरमार्केटमध्ये, वाढत्या किंमती आणि घटत्या पुरवठ्यामुळे कर्मचाऱ्यांना फळे आणि भाज्यांसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतीतील फळभाज्या विकण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक ट्रे आता अजिबात उपलब्ध नाहीत. कोलेकोव्हेर सुपरमार्केटचे व्यवस्थापक ताकेशी ताकानोहिरा म्हणाले, “गेल्या महिन्यापासून, आम्ही उत्पादनांसाठी वापरत असलेले लहान प्लास्टिक ट्रे आम्हाला मिळू शकलेले नाहीत, त्यामुळे आम्हाला आता त्यांच्याशिवायच काम चालवावे लागत आहे.”

‘जपान पेट्रोकेमिकल इंडस्ट्री असोसिएशन’च्या आकडेवारीवरून या समस्येची भीषणता दिसून येते. खरेदीच्या आणि कचऱ्याच्या पिशव्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पॉलीथिलीन’चे उत्पादन २०२५ मधील याच कालावधीच्या तुलनेत मार्च महिन्यात ६२ टक्क्यांनी घसरले आहे. अशीच घसरण इतर प्लास्टिक साहित्यामध्येही पाहायला मिळाली आहे.

जपानमध्ये दरवर्षी ८० लाख टन प्लास्टिकचा वापर

प्लास्टिकच्या तुटवड्यामुळे जपानमध्ये दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, सुपरमार्केट्स, टेक-अवे आउटलेट्स आणि बेकरींमध्ये प्लास्टिक पिशव्या, ट्रे आणि अन्नपदार्थ हाताळण्यासाठी लागणाऱ्या हातमोज्यांची कमतरता भासत आहे. काही व्यवसायांनी तर स्वतःच्या पिशव्या किंवा डबे आणणाऱ्या ग्राहकांना सूट देण्यासही सुरुवात केली आहे.

आपल्या पतीसोबत बेकरी चालवणाऱ्या शिसौ तनोशिरी यांनी सांगितले, “आम्हाला मे महिन्याच्या मध्यात प्लास्टिक उत्पादने मिळाली होती, परंतु आमचा पुरवठादार म्हणतोय की पुढची बॅच कधी येईल हे त्यांना ठाऊक नाही. आणि अन्नपदार्थ हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या हातमोज्यांचा पुरवठा देखील खूप कमी होत आहे. जपानी लोक स्वच्छता आणि आरोग्याबाबत अत्यंत जागृत असतात आणि अनेकांना अन्नपदार्थांचा थेट स्पर्श झालेल्या पिशव्या पुन्हा वापरणे आवडत नाही.” जपानमध्ये दरवर्षी सुमारे ८० लाख टन प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यापैकी साधारण एक तृतीयांश प्लास्टिक खाद्य क्षेत्रात अन्नपदार्थ हाताळण्यासाठी वापरले जाते.

दातांच्या डॉक्टरांनाही हातमोजे मिळेना?

“आजकाल विविध वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, आणि स्वच्छता व धुण्याशी संबंधित खर्चही वाढले आहेत. मला कामासाठी लागणारे रबरी हातमोजे मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे मला बऱ्याच दुकानांमध्ये फिरावे लागले”, असे जपानमधील एका व्यावसायिकाने सांगितले. दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितले, “दंत चिकित्सालयांनाही हातमोजे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मी माझ्या डेंटिस्टकडून ऐकले की त्यांच्याकडे आता हातमोजेही उरलेले नाहीत. ते ऐकल्यानंतर, ही परिस्थिती खरोखर किती गंभीर झाली आहे याची मला जाणीव झाली.”

जपानमधील सर्वात प्रसिद्ध स्नॅक्स उत्पादकांपैकी एक असलेल्या ‘कॅल्बी’ कंपनीने बटाटा चिप्स आणि झिंगा स्नॅक्ससह अनेक उत्पादनांचे पॅकेजिंग रंगीबेरंगीऐवजी काळ्या आणि पांढऱ्या पिशव्यांमध्ये करण्यास सुरवात केली आहे. पिशव्यांवर प्रिंटिंगसाठी लागणारी शाई देखील नाफ्थापासून तयार केली जाते.

छोटे उद्योग अडचणीत?

जपानमध्ये प्लास्टिक तुटवड्यामुळे मुख्यत: छोटे उद्योग अडचणीत आले आहेत. ‘एनएचके’च्या वृत्तानुसार, फुकुई शहरातील आईस्क्रीम आणि पॉपसिकल्स विकणाऱ्या एका मिठाईच्या दुकानदाराला जून अखेरपर्यंत प्लास्टिक पिशव्या संपण्याची भीती सतावत आहे. पुरवठादारांकडून कोणतीही स्पष्ट वेळमर्यादा न मिळाल्याने या दुकानाने ग्राहकांना स्वतःच्या पिशव्या आणण्याची विनंती करण्यास सुरुवात केली आहे. ‘एनएचके’ने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम आशियातील संकटामुळे पेट्रोलियमपासून बनवले जाणारे साहित्य मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.