पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून आपल्या दोन दिवसीय इस्रायल दौऱ्याला सुरुवात केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बेन गुरियन विमानतळावर मोदींचे थाटामाटात स्वागत केले. भारतीय पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे सध्या सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे भारत व इस्रायल यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना आणखीनच बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान मोदी इस्रायलमध्ये दाखल होताच पाकिस्तानच्या गोटात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. भारत आणि इस्रायलमधील या वाढत्या मैत्रीवर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला असून, त्याला मुस्लीम समुदायाविरोधी गट, असे म्हटले आहे. त्याविषयीचा हा आढावा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०१७ नंतरचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापारासह संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमता (एआय) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताबरोबरच्या संरक्षण भागीदारीसाठी ‘हेक्सागन ऑफ अलायन्स’ ही संकल्पना मांडली आहे. त्यामध्ये भारत, इस्रायल, ग्रीस व सायप्रससह काही आशियाई व आफ्रिकी देशांचा समावेश असणार आहे. कट्टरतावाद्यांचे निर्दालन करण्यासाठी हा गट उभारण्याची इच्छा इस्रायलच्या पंतप्रधानांनी बोलून दाखवली आहे. पाकिस्ताननने याच संकल्पनेवर तीव्र आक्षेप घेतला असून, त्याला मुस्लीम समुदायविरोधी गट, असे संबोधले आहे.
हेक्सागन ऑफ अलायन्स म्हणजे नेमके काय?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मांडलेल्या नवीन संकल्पनेला ‘हेक्सागन ऑफ अलायन्स’ (सहकाराचा षटकोन), असे नाव देण्यात आले आहे. भारताने या महत्त्वाकांक्षी गटामध्ये सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. नेतान्याहू यांच्या मते, हा गट पश्चिम आशियाभोवती एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल. कट्टरपंथी शक्तींचा (प्रामुख्याने इराणप्रणीत शिया अक्ष आणि उदयास येत असलेला कट्टर सुन्नी अक्ष) एकत्रितपणे सामना करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या गटात इस्रायल, भारत, ग्रीस आणि सायप्रससह काही अरब, आफ्रिकी आणि आशियाई देशांचा समावेश असणार आहे. या प्रस्तावित गटाची रचना नेमकी कशी असेल याबाबत नेतान्याहू यांनी अधिक तपशील दिलेला नाही. इराणचा वाढता प्रभाव आणि त्यांच्या समर्थित संघटना (लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी व इराकमधील कताइब हिजबुल्ला) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा गट तयार केला जाणार असल्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
‘सहकाराचा षटकोन’ आताच का?
इस्रायलमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार असल्याने नेतान्याहू यांनी ही खेळी खेळल्याचा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. कट्टरपंथीयांविरोधात लढताना आपण राजनैतिक दृष्ट्या एकटे पडलो नसून, जगातील अनेक मोठ मोठे देश आपल्या पाठीशी उभे असल्याचे नेतान्याहू यांना दाखवून द्यायचे आहे. पॅलेस्टाईनबरोबर झालेल्या गाझामधील युद्धामुळे आधीच इस्रायलची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्यातच देशात गुंतवणूक कमी झाल्याने बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेतान्याहू त्यांनी जागतिक आघाड्यांची स्वप्ने दाखवत आहे, असे राजकीय विश्लेषक ओरी गोल्डबर्ग यांनी अल जझिंराला सांगितले.
भारत या गटात सहभागी होईल का?
नेतान्याहू यांनी भारताला या गटात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले असले तरीही पंतप्रधान मोदी त्यासाठी तयार असतील का? याबाबत साशंकता आहे. भारताने सुरुवातीपासून तटस्थ धोरणाचा वापर केला असून , कोणत्याही एका गटात सामील होणे टाळले आहे. भारताचे इराणशी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत. सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांशीही भारताचे संबंध चांगले राहिलेले आहेत. त्याशिवाय आखाती देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात, जे दरवर्षी अब्जावधी डॉलर्स भारतात पाठवतात. त्यामुळेच भारत या गटात सामील होणार नसल्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानमध्ये खळबळ का उडाली?
बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताला ‘हेक्सागन ऑफ अलायन्स’ या गटात भारताला सामील होण्याचे निमंत्रण दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारत या गटात सहभागी होण्यापूर्वीच पाकिस्तानने त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘हेक्सागन ऑफ अलायन्स’ गटाचा पाकिस्तानने निषेध केला आहे. त्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्य धोक्यात येईल, असा दावा त्यांनी केला आहे. यादरम्यान पाकिस्तानच्या संसदेत एकमताने एक ठराव मंजूर करण्यात आला. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवाशा मोहम्मद झाई खान यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावात इस्रायलकडून जागतिक मुस्लिम समुदायाची एकता आणि अखंडता कमी करण्याचा कुटील प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. इस्रायलची ही संकल्पना मुस्लीम राष्ट्रांची प्रादेशिक स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर निकषांना कमकुवत करणारी असल्याचे पाकिस्तानी खासदारांनी म्हटले.
हेही वाचा : महिलांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘या’ कॅन्सरचा धोका; केंद्राची लसीकरण मोहीम का महत्त्वाची?
पाकिस्तान इतका का घाबरलाय?
इस्रायल पश्चिम आशियातील इतर मुस्लीम राष्ट्रांशी यशस्वीपणे संबंध प्रस्थापित केल्यास या प्रदेशात आपले राजकीय महत्त्व कमी होण्याची भीती पाकिस्तान सरकारला वाटत आहे. ‘हेक्सागन ऑफ अलायन्स’ गटाची स्थापना झाल्यास कट्टर पंथीयांना आळा बसेल आणि मुस्लीम समुदायविरोधी गट निर्माण होईल, असेही पाकिस्तानला वाटत आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ कतार आणि इतर आखाती देशांशी आर्थिक संबंध सुधारण्यासाठी धडपडत आहेत. इस्रायलच्या या नव्या गटामुळे त्यांच्या या प्रयत्नांत अडथळे येऊ शकतात. त्याशिवाय या गटात भारताचा सहभाग असणे हे पाकिस्तानसाठी आव्हानात्मक ठरू शकते. नेतान्याहू यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात येण्याआधीच पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत आणि इस्रायलच्या या वाढत्या जवळीकीमुळे काही दहशतवादी संघटनाही अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.

