India-Malaysia Relations : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२६ मध्ये विदेश दौऱ्यासाठी पहिला देश निवडला तो म्हणजे मलेशिया. मलेशियात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथील नागरिकांना संबोधित करताना हिंदी व इंग्रजी भाषेचा आधार घेतला नाही. मोदी यांनी तमिळ भाषेत मलेशियातील नागरिकांना संबोधित केले. “तमिळ भाषेवरील प्रेमाने भारत व मलेशियाला एकत्र आणले आहे. मलेशियातील शिक्षण, संस्कृती आणि माध्यमांमध्ये तमिळ भाषेचा प्रभाव आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (८ फेब्रुवारी) मलेशियात दिलेल्या भाषणात म्हटले. मलेशियात तमिळ भाषा व भारतीय संस्कृतीचा प्रभाव कसा पडला त्याबाबत हा आढावा.

मलेशियात जवळपास ३० लाख भारतीय वंशाचे नागरिक आहेत. शेकडो वर्षांपूर्वी तमिळ नागरिक मलेशियात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले होते. मलेशियातील शाळा, मंदिर, टिव्ही, वर्तमानपत्र आणि सिनेमा हॉलमध्ये तमिळ ही भाषा ऐकू येते. तमिळ ही स्थलांतरितांची भाषा नसून आता ती मलेशियातील सामान्य जनतेची भाषा झाली आहे. मलेशिया हा देश स्थापन होण्याआधी तसेच वसाहतवादाच्या आधी तमिळ भाषेचा प्रभाव पडणे सुरू झाले होते. आग्नेय आशियातील या देशात तमिळ भाषेचा बोलबाला असल्याने भारत व मलेशियात जुने संबंध आहेत.

समुद्रामार्गे तमिळ नागरिकांचा मलेशियाशी व्यापार

मलेशियात तमिळ भाषेचा प्रभाव हा ब्रिटिशांच्या वसाहती येण्याआधीच पडला होता. अभ्यासक कार्ल वादिवेला बेल्ले यांच्या ‘थाईपुसम इन मलेशिया: अ हिंदू फेस्टिवल इन द तमिळ डायस्पोरा’ या पुस्तकात याबाबत उल्लेख आढळतो. इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून भारत व मलेशियात संबंध निर्माण झाले होते. तमिळनाडू व आंध्र प्रदेशातील कोरोमंडल किनाऱ्यावरून मलेशियातील केदाह या राज्यात आणि स्ट्रेट ऑफ मलाक्का या ठिकाणी समुद्रामार्गे व्यापार होत होता. मसाले, कपडे, वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती यांची दोन्ही देशांमध्ये देवाणघेवाण व्हायची.

भारतातून मोठ्या प्रमाणात तमिळ नागरिक मलेशियात स्थलांतरित झाले होते. त्यामुळे मलेशियात तमिळ भाषेत काही मजकूर लिहिलेले मंदिर आढळून येतात. तसेच हिंदू व बौद्ध धर्म मानणाऱ्यांची संख्या मलेशियात वाढली होती. तमिळ मुस्लीमदेखील मोठ्या संख्येने मलेशियात स्थलांतरित झाले आहेत. ते तिथेच विवाह करून स्थायिक झाले आहेत. मलेशियात ब्रिटिश येण्याआधीच तमिळ नागरिक मोठ्या संख्येने मलेशियात होते.

तमिळनाडूतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर

व्यापारामुळे पहिल्यांदा तमिळ नागरिक मलेशियात पोहोचले, परंतु, त्यानंतर मलेशियातील राजवटींना कामगारांची आवश्यकता होती. त्यामुळे तमिळनाडूतील थंजावर, तिरूनेलवेली आणि रामनाथपुरम या जिल्ह्यांमधून तमिळ नागरिक मलेशियात स्थायिक झाले. मलेशियातील रबर उद्योग, रेल्वे, खाण आणि बंदर या ठिकाणी काम करण्यासाठी कामगारांची आवश्यकता होती. ती तमिळ नागरिकांनी पूर्ण केली. बेल्ले यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले, “१९ व्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीची काही दशके भारतातून मलेशियात मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. त्यामुळे एक मलेशियन भारतीय समाजच तिथे उदयास आला.”

मलेशियात मंदिरे उभारली, शाळा सुरू केल्या

तमिळ नागरिकांनी मलेशियात कालातंराने मंदिरे उभारली. शाळा सुरू केल्या. तसेच स्थानिक वर्तमानपत्रे सुरू केली. तमिळ नेते देखील उदयास आले. तसेच तमिळ नागरिक थाईपुसम हा सण साजरा करत होते. सिनेमागृहांमध्ये देखील तमिळ चित्रपट दाखवले जात होते. मलेशियाला १९५७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कामगार म्हणून मलेशियात गेलेल्या तमिळ नागरिकांनी चांगल्या रोजगाराच्या व शिक्षणाच्या शोधात शहरांकडे धाव घेतली होती. तिथे शिक्षक, क्लर्क, व्यापारी, प्रोफेशनल म्हणून तमिळ नागरिकांनी नावलौकिक मिळवला होता.

मोदींकडून डिजिटल पेमेंट इंटरफेसची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात भारत व मलेशियातील शेकडो वर्ष जुन्या संबंधांचा उल्लेख केला. मलेशियातील तीस लाख भारतीय वंशाचे लोक हे दोन्ही देशांतील संबंध वाढण्यास कारण ठरले आहेत, असे मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. तसेच सोशल सेक्युरिटीबाबत करार, दोन्ही देशांतील नागरिकांना सहज सुलभपणे व्हिसा मिळणे तसेच भारताचे डिजिटल पेमेंट इंटरफेस मलेशियात सुरू करणे अशा काही महत्वाच्या घोषणा मोदी यांनी भाषणात केल्या. दरम्यान, भारत व मलेशियात वर्षानुवर्षे होत असलेल्या व्यापारामुळे आज दोन्ही देशांतील संबंध दृढ असल्याचे मानले जाते.

मलेशियात भारतीय व मलेशियन नागरिक ओळखणे कठीण?

मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालालंपूरच्या व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तमिळ भाषिक लोक आढळून येतात. त्यामुळे तिथे भारतीय व मलेशियन नागरिक ओळखणे अवघड होऊन बसते. मलेशियात सहा ते सात पिढ्यांपासून राहणारे भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. मलेशियात बोलली जाणारी तमिळ भाषा ही बाहेरील भाषा नसल्याचे मलेशियन नागरिक मानतात. त्यांना तमिळ ही भाषा मलेशियाची भाषा असल्याचे वाटते. पहिल्यांदा समुद्रामार्गे व्यापारासाठी तमिळ लोक मलेशियात गेले होते. त्यानंतर मलेशियातील राजवटींना कामगारांची गरज भासल्यानंतर भारतीय कामगार तिथे गेले. आज मलेशियात तमिळ नागरिकांची संख्या वाढली असून दोन्ही देशांमधील संबंध, भागीदारी वाढवण्यासाठी त्याचा फायदा दोन्ही देश करून घेत आहेत.