अमेरिका व इस्रायलने सलग आठव्या दिवशीही इराणवरील हल्ले सुरूच ठेवल्यामुळे आखाती देशांमधील तणाव आणखीनच वाढला आहे. या युद्धजन्य परिस्थितीत इराण एकटा पडला असून, त्यांच्या मदतीसाठी कोणताही देश पुढे सरसावत नसल्याचे दिसून येत आहे. इराणचा मित्रदेश असलेल्या रशियाने सुरुवातीला अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला होता; पण त्यानंतर या युद्धापासून रशिया दूर राहिल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर इराणबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असूनही रशियाकडून त्यांना मदत का केली जात नाही, असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामागील कारणांचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
इराणवरील हल्ल्यांचा रशियाकडून निषेध
२८ फेब्रुवारीला अमेरिका व इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला करून, त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाने एक निवेदन जारी करीत, या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या संघर्षामुळे अणू आपत्तीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही रशियाकडून देण्यात आला. त्यानंतरही अमेरिका व इस्रायलने इराणवरील हल्ले सुरूच ठेवल्यामुळे रशियाच्या भूमिकेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. प्रत्यक्षात मात्र युद्धाला सुरुवात होऊन आठ दिवस लोटले तरीही रशिया अद्याप तटस्थ भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रशियाची इराणला मदत का नाही?
मध्यपूर्वेतील तणावादरम्यान इराण संकटात असताना रशियाच्या भूमिकेला राजकीय विश्लेषकांनी फेअर-वेधर अॅली म्हणजेच परिस्थितीनुसार साथ देणारा मित्र, असे संबोधले आहे. यादरम्यान रशिया या युद्धापासून नेमका का दूर राहिला याची विश्लेषकांनी पाच कारणे स्पष्ट केली आहेत. त्यापैकी पहिले कारण- २०२५ मध्ये रशिया व इराणमध्ये एक सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करार करण्यात आला होता; परंतु या करारामध्ये औपचारिक लष्करी युतीचा समावेश करण्यात आला नाही. रशियाचा उत्तर कोरियासोबत जो करार आहे. त्यामध्ये एका देशावर हल्ला झाल्यास दुसऱ्याने लष्करी मदत करणे बंधनकारक आहे. मात्र, इराणबरोबरच्या करारामध्ये अशी कोणतीही अट नाही.
आणखी वाचा : इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे काय? त्यांना सुरक्षित मायदेशी कसे आणले जाणार?
रशिया युद्धात का उतरला नाही?
दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात कोणतीही शत्रुत्वाची कारवाई न करणे आणि संकटकाळी एकमेकांशी सल्लामसलत एवढीच बाब या करारात नमूद आहे. दुसरे कारण म्हणजे- रशियाने सध्या आपली लष्करी ताकद युक्रेनबरोबरच्या युद्धात वापरली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणावादरम्यान आपले लष्करी सामर्थ्य प्रभावीपणे दाखवण्यासाठी रशियाकडे अतिरिक्त राखीव सैन्याची कुमक नाही. एकाच वेळी दोन मोठ्या युद्धांत गुंतल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसह लष्करी क्षमतेवर मोठा ताण येण्याची भीती कदाचित रशियाला वाटत असावी, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. रशिया सध्या स्वतःच्या सीमांचे संरक्षण करीत असून, युक्रेनबरोबरच्या युद्धावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
रशियाची भू-राजकीय गणिते काय?
रशियाला पश्चिम आशियात आपले प्रभाव क्षेत्र टिकवून ठेवायचे आहे. त्यामुळे अमेरिकेशी थेटपणे युद्ध ओढवून घेण्याची त्यांची सध्याची मानसिकता नसल्याचे दिसून येते. इस्रायलमध्ये सुमारे २० लाख रशियन भाषिक लोक राहतात. त्यामुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे इस्रायलविरोधात कधीही उघडपणे भूमिका घेत नाहीत. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूच्या किमती भडकल्या आहेत. त्याचा थेट फायदा रशियाला होत असल्यामुळे पुतीन यांनी युद्धात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला नसावा, असा कयासही काही विश्लेषकांनी बांधला आहे.
रशियाचे इराणवरील अवलंबित्व कमी
एकेकाळी रशियासाठी इराण हा शस्त्रास्त्रांचा मुख्य पुरवठादार होता; परंतु आता मात्र परिस्थिती बदलल्याचे दिसून येत आहे. युक्रेनबरोबरच्या युद्धात इराणने रशियाला ‘शाहेद’ ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला होता. आता मात्र रशियाने स्वदेशी बनावटीचे ड्रोन्स वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता रशियाला इराणवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. इस्रायलने अलीकडेच केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे इराणच्या स्वतःच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे आणि क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे इराणची लष्करी ताकद कमकुवत झाली असून, अशा कमकुवत मित्राला लष्करी मदत देणे रशियाला सध्या फायदेशीर वाटत नसल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेचा नेमका दावा काय?
रशियाकडून इराणला महत्त्वाची गुप्त माहिती पुरवली जात असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेच्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. या माहितीचा वापर करून इराणचे समर्थक गट मध्यपूर्वेतील अमेरिकन आणि इस्रायली सैन्याला लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाने इराणला तांत्रिक साह्य आणि डेटा पुरवण्यास सुरुवात केल्यामुळे अमेरिकेच्या हालचालींवर शत्रुदेशाला लक्ष ठेवता येत आहे. रशिया आणि इराणमधील वाढती जवळीक ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अमेरिकन अधिकाऱ्याच्या या दाव्यावर रशियाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धात रशियाच्या भूमिकेवर अद्यापही संभ्रम आहे.
