नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या खेळाडूंवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. यादरम्यान बक्षीस वितरण समारंभातील एका गोष्टीने जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीतील अफाट सातत्याने सर्वांनाच थक्क करणाऱ्या संजू सॅमसनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले; तर अंतिम सामन्यात ४ षटकांत केवळ १५ धावा देत ४ बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा किताब देण्यात आला. मात्र हे पुरस्कार स्वीकारताना दोन्ही खेळाडूंच्या हातात कुठलाही धनादेश दिसला नाही. यापार्श्वभूमीवर आयसीसीच्या स्पर्धेत खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देताना रोख रक्कम का दिली जात नाही? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

इंडियन प्रीमिअर लीग अर्थाच आयपीएलसारख्या स्पर्धेत आपापल्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला जातो. सामन्यानंतर होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात त्यांना चेकद्वारे रोख रक्कम दिली जाते; परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कुठल्याही मोठ्या स्पर्धेत सामनावीर किंवा मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना रोख रक्कम न देण्याचे धोरण पाळले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा नियम पाळला जात असून तो आयसीसीच्या धोरणात्मक संरचनेचा एक भाग झाला आहे.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीने आयोजित केलेल्या कुठल्याही जागतिक स्पर्धेत खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक कामगिरीसाठी थेटपणे रोख रक्कम देण्याची पद्धत नाही. आयसीसीच्या मते, क्रिकेट हा सांघिक खेळ असल्यामुळे स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ही विजेत्या संघाला किंवा संबंधित क्रिकेट बोर्डालाच दिली जाते. या धोरणानुसार ‘प्लेअर ऑफ द मॅच’ किंवा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ यांसारखे खेळाडूंना दिले जाणारे वैयक्तित पुरस्कार हे केवळ त्यांच्या सन्मानासाठीच असतात. आयपीएलमध्ये अनेक प्रायोजक वैयक्तिक पुरस्कारांसाठी मोठी रक्कम खर्च करतात. मात्र, आयसीसी केवळ अधिकृत ट्रॉफी आणि पदकांद्वारे खेळाडूंच्या वैयक्तिक कौशल्याचा गौरव करण्यावर भर देते.

आणखी वाचा : ICC कडून T20 WC ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर; भारताच्या ४ खेळाडूंचा समावेश, पण वर्ल्डकप विजेता कर्णधार बाहेर

आयसीसीकडून बक्षीस वितरण कसे होते?

आयसीसीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी एक मोठी बक्षीस रक्कम निश्चित केली होती. ही सर्व रक्कम स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांना त्यांच्या स्थानानुसार (उदा. विजेता, उपविजेता, उपांत्य फेरीतील संघ) वितरित करण्यात आली. खेळाडूंना वैयक्तिक रोख बक्षीसे न देण्यामागे आयसीसीची काही महत्त्वाची कारणे आहेत. वैयक्तिक बक्षीस टाळल्यामुळे लाखो डॉलर्सची ही मोठी रक्कम थेट संबंधित देशाच्या क्रिकेट बोर्डाला दिली जाते. मिळालेल्या या मोठ्या रकमेचे वाटप संपूर्ण संघ, कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफमध्ये करण्याची जबाबदारी त्या-त्या क्रिकेट बोर्डाची असते. त्यामुळे संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराहला रोख रक्कम मिळाली नसली तरीही त्यांना मिळालेला मान हा कोणत्याही रोख रकमेपेक्षाही मोठा असल्याचे दिसून येत आहे.

रोख रक्कम न मिळूनही खेळाडूंना कसा फायदा होतो?

संजू सॅमसन किंवा जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या खेळाडूंना आयसीसीने थेट धनादेश दिला नसला तरीही त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे होणारे आर्थिक फायदे अफाट आहेत. आयसीसी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा किताब खेळाडूच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी देणारा ठरतो. यामुळे भविष्यात विविध देशांतील टी-२० लीगमध्ये त्या खेळाडूची बोली कित्येक पटीने वाढते. जागतिक स्तरावर मिळणाऱ्या या पुरस्कारामुळे खेळाडूची ‘ब्रँड व्हॅल्यू’ देखील वाढते. नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींमधून त्यांना मिळणारे उत्पन्न हे कोणत्याही एका सामन्याच्या बक्षीस रकमेपेक्षा कितीतरी जास्त असते. आयसीसीचे पुरस्कार हे खेळाडूला जागतिक क्रिकेटच्या सर्वोच्च श्रेणीत स्थान मिळवून देतात. त्यामुळे खेळाडूंच्या दीर्घकालीन उत्पन्नात मोठी वाढ होते आणि त्यांना मिळणारे मानधन कोणत्याही एकदाच्या रोख बक्षीसापेक्षा कितीतरी जास्त असते.

हेही वाचा : IND vs NZ: सूर्या- गंभीरचा ‘हा’ एक निर्णय ठरला भारताच्या वर्ल्डकप विजयाचा टर्निंग पॉईंट; वाचा नेमकं काय घडलं

भारतीय संघाला मिळाले कोट्यवधींचे बक्षीस

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी सुमारे १२० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. त्यानुसार, ही स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला सुमारे २९.५ कोटी रुपये इतकी इनामी रक्कम मिळाली. अर्थातच ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) दिली जाणार आहे. त्यानंतर ती संपूर्ण खेळाडूंना मॅच फी आणि इतर बक्षीस स्वरूपात वाटली जाणार आहे. दुसरीकडे अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतरही न्यूझीलंडच्या संघाला बक्षीस म्हणून सुमारे १४.७ कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली आहे.

उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांची कमाई

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मोठी रक्कम मिळाली आहे. या दोन्ही संघांना ७.२४ कोटी रुपये इतकी प्राईज मनी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सुपर ८ ची फेरी गाठणाऱ्या झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांना प्रत्येकी ३.४८ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने पात्रता फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही बक्षीस जाहीर केले आहे. त्यानुसार, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, यूएई आणि अमेरिका या संघांना प्रत्येकी २.३ कोटी रुपये देण्यात आले आहे.