सौदी अरेबियाने भारतासह ४० देशांतील चिकन आणि अंड्यांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आणखी १६ देशांमधून होणाऱ्या पोल्ट्रीच्या आयातीवरही सौदीने निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, बेल्जियम व भूतान यांसारख्या देशांचा समावेश आहे. भारतातून आखाती देशांत मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उत्पादने निर्यात केली जातात. त्यामुळे या निर्णयाचा कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याविषयीचा हा आढावा…

काय आहेत नवीन निर्बंध?

सौदी अरेबियाने चिकन व अंड्यांच्या आयातीवर निर्बंध लादताना सार्वजनिक आरोग्याचे कारण दिले आहे. बंदीचा निर्णय हा प्रामुख्याने बर्ड फ्लूसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. आयात होणाऱ्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सौदी अरेबियाच्या अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या देशांच्या यादीत भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, ब्रिटन, चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, जर्मनी, व्हिएतनाम, इजिप्त, इराण, इराक, मेक्सिको, नेपाळ व सुदान यांसारख्या ४० देशांचा समावेश आहे.

हा निर्णय का घेण्यात आला?

चिकन आणि अंड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही. यादीतील ४० पैकी काही देशांतील पोल्ट्री उत्पादनाच्या आयातीवर २००४ पासूनच बंदी आहे. आंतरराष्ट्रीय अहवाल आणि अद्ययावत जोखीम मूल्यांकनांच्या आधारे इतर देशांना टप्प्याटप्प्याने या यादीत समाविष्ट करण्यात येत आहे. ज्या देशांतून आयात होणाऱ्या चिकनमध्ये बर्ड फ्लूसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला, त्यांनाच बंदीच्या यादीत टाकण्यात आले आहे. हा निर्णय स्थानिक बाजारपेठेतील अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या प्रशासनाने सांगितले आहे.

आणखी वाचा : पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यामुळे पाकिस्तानात खळबळ का उडाली? कारण काय?

प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना सूट

चिकन व अंडी आयातीच्या बंदीबाबत स्पष्टीकरण देताना सौदी अरेबियातील अधिकारी म्हणाले की, काही उत्पादनांना यातून सूट दिली जाऊ शकते. ज्या पोल्ट्री उत्पादनांवर ठरावीक तापमानावर उष्णता प्रक्रिया करण्यात आली आहे, त्यांच्यावरील बंदी उठवण्याचा विचार केला जाऊ शकतो. पूर्णपणे प्रक्रिया केलेली उत्पादने या बंदीतून वगळली जाऊ शकतात; परंतु ही प्रक्रिया ‘बर्ड फ्लू’ किंवा ‘न्यूकॅसल डिसीज’ यांसारखे विषाणू नष्ट करण्यासाठी पुरेशी आहे, याची खात्री होणे आवश्यक आहे. सवलत मिळवण्यासाठी काही अटींचे पालन करणे अनिवार्य आहे.

अटी आणि नियम काय?

पोल्ट्रीच्या उत्पादनाबरोबरच निर्यातदारांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैध आरोग्य प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. आयात केलेल्या मालाची सौदीच्या सीमांवर कसून तपासणी केली जाईल. उत्पादने केवळ सौदीच्या नियामकांनी मान्यता दिलेल्या निर्यातदार संस्थांकडूनच आलेली असावीत. सौदी अरेबियाकडून ग्राहकांची सुरक्षितता आणि अन्नपुरवठ्याच्या अखंडतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. संभाव्य धोके कमी करण्यासाठी जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा आयातीवर अशा प्रकारचे निर्बंध लादले जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय निर्यातदारांसमोर आव्हान

सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे आता भारतीय निर्यातदार आणि व्यापारी संस्थांना या बंदीच्या परिणामांचे मूल्यमापन करावे लागणार आहे. भारतातून आखाती देशांत मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उत्पादने निर्यात केली जातात. त्यामुळे या निर्णयाचा कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौदीच्या अद्ययावत नियमांचे पालन करण्यासाठी निर्यातदारांना आपल्या व्यापार धोरणांचा आणि पाठवल्या जाणाऱ्या मालाचा फेरआढावा घ्यावा लागेल. तज्ज्ञांच्या मते, या बंदीमुळे प्रादेशिक व्यापार प्रवाहावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. विशेषतः अशा निर्यातदारांना याचा मोठा फटका बसेल, जे आपल्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर सौदी अरेबियाच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत.

१६ देशांवर अंशतः निर्बंध

सौदी अरेबियाने केवळ संपूर्ण बंदीच घातलेली नाही, तर १६ देशांमधील विशिष्ट प्रांत आणि शहरांना लक्ष्य करून अंशतः निर्बंधही लादले आहेत. त्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, इटली, बेल्जियम, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, रोमानिया, पोलंड, भूतान, फिलिपिन्स, मलेशिया, टोगो, झिम्बाब्वे व डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांचा समावेश आहे. या १६ देशांच्या बाबतीत ही बंदी संपूर्ण देशासाठी नसून, केवळ त्या देशांतील ठरावीक राज्ये किंवा शहरांपुरतीच मर्यादित आहे. ज्या भागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे, त्याच भागातून होणारी आयात रोखली जाईल, असे सौदी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : महिलांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘या’ कॅन्सरचा धोका; केंद्राची लसीकरण मोहीम का महत्त्वाची?

जागतिक स्तरावर बर्ड फ्लूचा धोका

सौदी अरेबियाने लागू केलेल्या नव्या आयात निर्बंधांची पार्श्वभूमी जागतिक स्तरावर वाढलेल्या बर्ड फ्लूच्या चिंतेशी जोडली जात आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणांनी चिकन व अंडी आयातीची तपासणी आणि नियमावली अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू हा जगभरात चिंतेचा विषय ठरत असून, त्यामध्ये महामारी घडवून आणण्याची क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे. २००३ सालापासून आग्नेय आशियातील पक्षी आणि पोल्ट्रीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव नियमितपणे दिसून येत आहे. आता हा प्रसार आफ्रिका आणि युरोपच्या अनेक भागांपर्यंत पोहोचला आहे. ज्या देशांमध्ये अद्याप हा रोग पोहोचलेला नाही, त्यांनीदेखील सतर्कता बाळण्यास सुरुवात केली आहे. पोल्ट्री व्यवसायात या घातक विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून अनेक राष्ट्रे खबरदारी घेत आहेत. जागतिक स्तरावर बर्ड फ्लूचा धोका वाढत असल्याने सौदी अरेबियाने घातलेली ही बंदी केवळ व्यापाराशी संबंधित नसून, ती एक महत्त्वाची उपाययोजना मानली जात आहे.