सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुती बंडखोर यांच्यातील संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी हुती बंडखोरांनी सौदीची राजधानी रियाधच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला होता. मात्र हे क्षेपणास्त्र हवेतच रोखून नष्ट करण्यात आल्याची माहिती सौदीच्या संयुक्त सैन्यदलाने दिली. गेल्या आठवड्यातही हुती बंडखोरांनी रियाधमधील किंग खालिद विमानतळासह अनेक महत्वांच्या ठिकाणांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले होते. त्यात जवळपास २० लोकांचा मृत्यू आणि शेकडो जण जखमी झाले होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, १० ऑक्टोबर रोजीचा हा हल्ला सौदी अरेबियातील सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक होता. त्यामध्ये एका निष्पाप भारतीय नागरिकालाही आपले प्राण गमावावे लागले होते. यादरम्यान सौदी अरेबियासारखा बलाढ्य देश एका विद्रोही संघटनेसमोर हतबल ठरत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, त्याविषयी…

हुती बंडखोरांनी सौदीवर कसे हल्ले केले?

रविवारी हुती बंडखोरांनी किंग खालिद विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका पाकिस्तानी व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याआधी हुथी बंडखोरांच्या क्षेपणास्त्राने विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलला लक्ष्य केले होते. त्यात जवळपास १३ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावावे लागल्याची माहिती सौदी प्रशासनाने दिली होती. त्या हल्ल्यानंतर संबंधित टर्मिनल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे सल्लागार हिशाम अल-ओमायसी यांनी ‘अल जझीरा’शी बोलताना या हल्ल्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. हुथी बंडखोर भविष्यात सौदीतील मुख्य तेलवाहिन्या, ऊर्जा प्रकल्प आणि विमानतळांना लक्ष्य करू शकतात. कारण अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले झाल्यास नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होऊन घबराट पसरते असे त्यांनी सांगितले. हुथी ही आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी विद्रोही संघटना आहे, असेही अल-ओमायसी यांनी नमूद केले.

हुती बंडखोरांची नेमकी रणनीती काय?

लंडनस्थित ‘मेना ॲनालिटिका’ या जोखीम विश्लेषण संस्थेचे तज्ज्ञ अँड्रियास क्रिग यांच्या मते, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या ‘व्हिजन २०३०’ या महत्त्वाकांक्षी योजनेत रियाधला पर्यटन, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याकरिता किंग खालिद विमानतळाची भूमिकाही अत्यंत महत्वाची आहे. याची हुती बंडखोरांना पूर्णपणे कल्पना असल्याने त्यांन या विमानतळाला सातत्याने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. रियाध विमानतळावरील वाहतूक विस्कळीत केल्याने सौदीच्या लष्करी ताकदीला थेट धक्का बसणार नसला, तरी हल्ल्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि तेथील नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती ही प्रत्यक्ष भौतिक नुकसानीपेक्षाही अधिक गंभीर ठरू शकते, असा इशाराही क्रिग यांनी दिला आहे.

सौदी अरेबियाचे लष्करी सामर्थ्य किती?

लष्करी सामर्थ्याचा विचार केल्यास हुती बंडखोरांच्या तुलनेत सौदी अरेबियाचे पारडे अधिकच जड दिसते. गेल्या वर्षी सौदी प्रशासनाने आपल्या संरक्षण क्षेत्रावर सुमारे ८३ अब्ज डॉलरचा खर्च केला होता. हा खर्च देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ६.५ टक्के होता. त्यामुळे लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत सौदी अरेबिया आठव्या क्रमांकाचा देश ठरला. सद्या सौदीकडे अत्याधुनिक लढाऊ विमाने, अचूक लक्ष्य भेदणारी प्रगत क्षेपणास्त्रे आणि पाश्चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांकडून माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. याशिवाय सौदीकडे तब्बल अडीच लाख सैन्यांचा फौजफाटाही उपलब्ध आहे. मात्र, सौदीचे लष्कर ‘नॅशनल गार्ड’ आणि ‘रॉयल गार्ड’ अशा तुकड्यांमध्ये विभागलेले आहे. राजघराण्याची सत्ता सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लष्करातील विविध दलांमध्ये समन्वय साधण्यात अडचणी येऊ शकतात. गुप्तचर माहिती आणि लष्करी कारवाईच्या योजनांची देवाणघेवाणही मर्यादित राहू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इराण समर्थित हुती बंडखोर किती शक्तिशाली?

दुसऱ्या बाजूला हुथी बंडखोरांचा विचार केल्यास या इराण समर्थित गटाकडे तब्बल ३,५०,००० लढवय्ये असून त्यांच्याकडे प्रत्यक्ष रणांगणात लढण्याचे प्रशिक्षणही मिळाले आहे. बीबीसीचे सुरक्षा विषयाचे वार्ताहर फ्रँक गार्डनर यांच्या मते, या विद्रोही गटातील अनेक लढवय्ये सुरुवातीपासूनच डोंगराळ भागात राहणारे असल्यामुळे त्यांच्याकडे त्या प्रदेशात लढणाचे विशेष कौशल्य आहे. इराणच्या सर्व प्रादेशिक मित्रगटांमध्ये हुती बंडखोर हे सर्वाधिक आक्रमक असल्याचा दावा त्यांच्यावर दीर्घकाळ अभ्यास करणारे न्यूयॉर्कमधील संशोधक मायकेल नाइट्स यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना केला आहे. इराणमधील राजकीय शक्तींनी हुतींची लष्करी ताकद अत्यंत वेगाने विकसित केली आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाला या संघटनेला आपली लष्करी क्षमता विकसित करण्यासाठी तब्बल २० वर्षे लागली होती. मात्र, तेवढीच ताकद हुती बंडखोरांनी अवघ्या पाच वर्षांत उभी केली. सध्या हुतींकडे अनेक अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा प्रचंड मोठा साठा आहे. त्यातील अनेक शस्त्रे इराणने विकसित केलेल्या शस्त्र प्रणालीशी तंतोतंत जुळतात. ही क्षेपणास्त्रे संपूर्ण आखाती देशांसह इस्रायलपर्यंत थेट मारा करण्याची क्षमता ठेवतात, असेही मायकेल यांनी म्हटले आहे.

हुतींचे हल्ले रोखण्यात सौदीची का होतेय दमछाक?

अफाट लष्करी ताकद असूनही येमेनमधील हुथी बंडखोरांकडून होणारे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले थांबवणे सौदी अरेबियासाठी कठीण होत चालले आहे. या अपयशामागे अनेक लष्करी आणि धोरणात्मक कारणे असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातील पहिले महत्वाचे कारण सौदीचा अवाढव्य भौगोलिक विस्तार असल्याचे सांगितले जात आहे. सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ सुमारे २२ लाख चौरस किलोमीटर आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या भूभागाचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करणे हे त्यांच्यासाठी कठीण ठरत आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे- हुती बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्राचा मारा रोखण्यासाठी सौदीकडे सध्या प्रगत क्षेपणास्त्रे नसल्याचे द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय हुती बंडखोर हे गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर करून सौदीतील महत्वाचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यांच्या रणनीतीचा अंदाज बांधणे सौदीच्या सैन्यदलाला कठीण जात आहे. काही संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हुतींना सौदी अरेबियाच्या कोणत्याही प्रदेशावर ताबा मिळवायचा नाही. फक्त त्या देशातील प्रशासन नेमके किती असुरक्षित आहे, हे दाखवून द्यायचे आहे. सौदीला मोठा आर्थिक भुर्दंड देऊन अस्थिर करणे हाच हुती बंडखोरांचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे सौदीचे प्रशासन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमकी काय रणनीती आखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.