International Girlfriend’s Day: १ ऑगस्ट म्हणजेच ‘International Girlfriend’s Day’. आजचा दिवस म्हणजे सोशल मीडियावर स्टोरीजचा पाऊस, रोमँटिक रील्सचा ट्रेंड आणि शेवटी कॅप्शनमध्ये एक ठरलेला मेसेज – “Happy Girlfriend’s Day! I Love You!” पण कधी विचार केलाय का, की आजच्या दिवशी एखादी छान अशी इंस्टाग्रॅम स्टोरी टाकून त्यात इंग्रजीत “I Love You” लिहिणं जेवढं सोपं वाटतं, तेवढंच तिच्या डोळ्यात डोळे घालून “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे मराठीत व्यक्त करताना घशाला कोरड का पडते? वरवर पाहता हा फक्त एका सोशल मीडिया ट्रेंडचा किंवा दोन भाषांमधील निवडीचा प्रश्न वाटू शकतो. मात्र, या ‘International Girlfriend’s Day’च्या निमित्ताने प्रेम व्यक्त करताना दडलेलं उच्चारशास्त्र (phonetics), भाषिक मानसशास्त्र (psycholinguistics) आणि डिजिटल संस्कृतीचं एक रंजक वास्तव पाहूया. 

अशी कल्पना करा… एखादी शांत संध्याकाळ आहे, तुम्ही तुमच्या प्रियकर/प्रेयसीसोबत समुद्रकाठी बसले आहात. तुमच्या दोहोंच्याही मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना दाटून आलेली आहे; पण तुम्ही अजून एकमेकांसमोर आपली ती भावना व्यक्त केलेली नाही! निदान विषय तरी काढावा त्यानं… किंवा मी काही बोललो तर, ती अनकम्फर्टेबल तर होणार नाही ना?… तिने काहीतरी खूण तरी द्यावी त्या क्षणाला… अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. 

कल करें सो आज, आज करें सो अब! या निश्चयातून जेव्हा आपण प्रेमाची भावना व्यक्त करायला जातो तेव्हा कोणते शब्द ओठांवर येतात? बहुतेकांचं उत्तर असेल – ‘I LOVE YOU.’ पण हेच जर मराठीत ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, असं म्हणायचं ठरवलं, तर संकोच का वाटावा? घशाला कोरड का पडते? हार्टबीट्स का वाढतात? वरवर पाहता, हा फक्त दोन वेगवेगळ्या भाषांमधील निवडीचा प्रश्न वाटू शकतो. मात्र, या दोन वाक्यांच्या मागे दडलेलं उच्चारशास्त्र (phonetics), भाषिक मानसशास्त्र (psycholinguistics) आणि मानवी स्वभावाचं एक रंजक गुपित समोर येतं. 

जिभेची कसरत आणि उच्चारशास्त्र:

कोणते शब्द बोलायला किती कष्ट लागतात, याचा अभ्यास भाषाशास्त्रात ‘Articulatory Phonetics’मध्ये केला जातो. जर आपण इंग्रजीतील ‘I love you’ या वाक्याचे विश्लेषण केले, तर लक्षात येईल की, हे तिन्ही शब्द अत्यंत मऊ, प्रवाही आणि ‘एक-अक्षरी’ (Monosyllabic) आहेत. हे वाक्य उच्चारताना ओठ आणि जिभेची हालचाल अगदी सहज होते. श्वासाचा प्रवाह कुठेही अडखळत नाही. हे वाक्य एखाद्या गुळगुळीत रस्त्यावरून गाडी घसरून जावी, इतक्या सहजतेने ओठांवरून निसटून जाते.

आता याच्या अगदी उलट ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे वाक्य म्हणून पाहा. हे केवळ वाक्य नाही, तर ती एक पूर्ण व्याकरणिक संरचना (Full Syntactic Structure) आहे. यात ‘तुझ्यावर’ या जोडशब्दाचा उच्चार करताना जिभेला कसरत करावी लागते. ‘प्रेम’ मधील ‘प्र’ आणि ‘आहे’ मधील ‘ह’ या महाप्राणाचा उच्चार करताना फुप्फुसांतून येणाऱ्या हवेवर आणि श्वासावर अधिक नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणजेच शारीरिक आणि उच्चारशास्त्राच्या पातळीवर इंग्रजी बोलणे कमी कष्टाचे आणि जास्त सोपे आहे.

मानसशास्त्रीय अंतर आणि भावनिक आडोसा

भाषिक मानसशास्त्राचा एक साधा नियम आहे : माणसाची प्रथम भाषा किंवा मातृभाषा (L1) ही त्याच्या थेट भावनांशी जोडलेली असते, तर त्याची दुसरी भाषा (L2 – जसे की इंग्रजी) ही प्रामुख्याने त्याच्या बुद्धी किंवा व्यवहाराशी जोडलेली असते. या दोन्ही भाषांमध्ये एक ‘भावनिक अंतर’ असते.

जेव्हा तुम्ही मराठीत ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःचा संपूर्ण भावनिक ताबा समोरच्या व्यक्तीच्या हातात देत असता. तिथे कोणताही पडदा नसतो. ते शब्द थेट काळजाला भिडतात. त्यामुळे दुसऱ्या बाजूने मिळणाऱ्या नकाराची किंवा रिजेक्शनची भीतीही तेवढीच तीव्र असते.

याउलट, ‘I love you’ बोलताना इंग्रजी भाषा एका ‘भावनिक आडोशासारखं’ (Emotional Buffer) काम करते. ही आपण स्वीकारलेली किंवा शिकलेली भाषा असल्याने, त्यातील शब्दांची तीव्रता आपल्याला वैयक्तिक पातळीवर तितकी खोलवर टोचत नाही. “इंग्रजीत बोललोय, नकार मिळाला तरी फारसं मनाला लावून घ्यायचं नाही” अशी आपल्या मनाची समजूत आपण घालत असतो. थोडक्यात, इंग्रजी तुम्हाला एक सुरक्षित एक्झिट देते, जी मराठीत मिळत नाही.

पॉप कल्चर आणि शब्दांचे ‘कॅज्युअल’ अवमूल्यन :

जागतिकीकरण आणि सोशल मीडियाने ‘I love you’ या वाक्याचे प्रचंड कॅज्युअल स्वरूप (Casualization) केले आहे. फोन ठेवताना ‘Bye, love you’, मित्रांना मेसेज करताना ‘Love you bro’, अगदी लाडक्या कुत्र्या-मांजराशी खेळतानाही लोक हे वाक्य सहज बोलतात. सततच्या वापरामुळे या वाक्याचे ‘रोमँटिक गांभीर्य’ काहीसे सौम्य झाले आहे.

पण, मराठी संस्कृतीत ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे वाक्य अत्यंत काळजीपूर्वक वापरले जाते. आपण ते रोजच्या जगण्यात सहजपणे वापरत नाही. जोपर्यंत नाते एका अत्यंत परिपक्व आणि गंभीर वळणावर येत नाही, तोपर्यंत मराठी माणूस हे शब्द तोंडून काढत नाही. मराठीत प्रेम व्यक्त करण्याला एक सुप्त सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी जोडलेली असते. त्यामुळेच या वाक्याचा सामाजिक वापर (Pragmatics) खूप मर्यादित आणि वजनदार राहिला आहे.

‘मेलोड्रामा’ विरुद्ध ‘कूलनेस’ (Code-Switching):

आजची पिढी मोठ्या प्रमाणावर ‘Code-switching’ (मराठी बोलताना इंग्रजी शब्द मिसळणे) करते. आजच्या महानगरीय संस्कृतीत अगदी शुद्ध आणि भारदस्त मराठीत भावना व्यक्त करणे अनेकांना ‘डेली सोप’ संवादासारखे (Melodramatic) वाटू शकते. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे वाक्य आजच्या पिढीला थोडे ओव्हर-द-टॉप वाटू शकते, तर ‘I love you’ हे वाक्य आधुनिक, सुटसुटीत आणि ‘Cool’ वाटते. भावना तितकीच तीव्र ठेवून, संकोच टाळण्याचा इंग्रजी हा एक सोपा मार्ग बनला आहे.

भावना सोप्या असाव्यात की सखोल?

ही दोन्ही वाक्य तपासताना आपण एका सुंदर निष्कर्षापाशी येतो. ‘I love you’ बोलणं जिभेसाठी सुलभ आहे, मानसशास्त्रीयदृष्ट्या ते सुरक्षित आहे आणि सामाजिकदृष्ट्या ते कॅज्युअल आहे. म्हणूनच ते बोलणं ‘जास्त सोपं’ वाटतं.

पण, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे वाक्य बोलणं जितकं कठीण, तितकीच त्याची अनुभूती सखोल आहे. इंग्रजी वाक्य तुमच्या भावनांना ‘ग्लोबल’ आणि सुलभ बनवतात, तर मराठी वाक्य भावनांना ‘लोकल’ आणि अत्यंत वैयक्तिक बनवतात. या ‘International Girlfriend’s Day’ला जागतिक स्तरावर ‘I love you’चा वरचष्मा असला तरी मातृभाषेतील संकोचाची भिंत ओलांडून जेव्हा एखादी व्यक्ती ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणते, तेव्हा त्या शब्दांचे वजन आणि त्या नात्याची परिपक्वता कोणत्याही ट्रेंडपेक्षा नक्कीच अतुलनीय असते.