मद्याच्या कारखान्यात तयार झालेली स्कॉच व्हिस्की थेट अंतराळात पाठवल्यास तिच्यात काय बदल होऊ शकतात, याचा शोध घेण्यासाठी जपान आणि स्कॉटलंडमधील वैज्ञानिक एक अनोखा प्रयोग करणार आहे. त्याकरिता व्हिस्की घेऊन जाणारे एक छोटे अंतराळयान २०२८ मध्ये अंतराळात पाठवले जाणार आहे. ‘स्पेस पफिन’ असे या प्रयोगाचे नाव असून त्याद्वारे अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणामुळे व्हिस्की तयार होण्याची आणि मुरण्याची प्रक्रिया कशी बदलते याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच भविष्यात पृथ्वीबाहेर व्हिस्की अधिक वेगाने तयार करता येईल का हेदेखील या प्रयोगातून तपासले जाणार आहे. सध्या ग्लासगो विद्यापीठातील डॉ. गिल्स बायलेट यांच्यासह अनेक संशोधक या प्रकल्पावर काम करत असल्याचे सांगितले जात आहे, त्याविषयी…

स्कॉच व्हिस्की अंतराळात का पाठवली जाणार?

‘स्काय न्यूज’च्या वृत्तानुसार, स्पेसएक्सच्या पुरवठा मोहिमेअंतर्गत छोटे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यात येईल. त्यानंतर जपानी मॉड्युलमधून ते पृथ्वीच्या कक्षेत सोडले जाईल. पुढील पाच वर्षे हे यान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याची शक्यता आहे. व्हिस्की मुरवण्याची प्रक्रिया लाकडाशी होणाऱ्या तिच्या संपर्कावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. मात्र, या प्रक्रियेमागील रासायनिक घडामोडींचा शास्त्रज्ञांना अद्याप पूर्णपणे उलगडा करता आलेला नाही. अंतराळात पारंपरिक जड लाकडाचे पिंप पाठवणे शक्य नसल्याने शास्त्रज्ञांकडून छोट्या आकाराच्या यानाच्या माध्यमातून ही प्रक्रिया घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता यानाच्या आत लाकडाचे लहान पिंप तयार केले जाणार असून त्यात अल्प प्रमाणात व्हिस्की साठवून ठेवली जाणार आहे. अंतराळ पाठवण्यात आलेले यान पृथ्वीभोवती सुमारे ९० मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण करेल, त्यामुळे त्यात ठेवण्यात आलेल्या व्हिस्कीच्या नमुन्यांना सतत बदलणाऱ्या तापमानाचा सामना करावा लागेल. या प्रयोगात व्हिस्कीला अंतराळातील वातावरणात मुरवण्याचा काय परिणाम होतो हे आम्हाला पाहायचे आहे, असे डॉ. गिल्स बायलेट यांनी स्काय न्यूजला सांगितले. या प्रयोगादरम्यान व्हिस्कीच्या रंगात आणि तिच्या रासायनिक घटकांमध्ये होणारे बदल तपासले जातील. त्यातून मिळणारी माहिती उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील संशोधकांकडे पाठवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतराळात व्हिस्की अधिक वेगाने मुरू शकते का?

डॉ. गिल्स बायलेट यांच्या मते, अंतराळात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊ शकतो. या बदलत्या परिस्थितीचा लाकडावर परिणाम होऊन ते पृथ्वीवरील पारंपरिक प्रक्रियेपेक्षा अधिक वेगाने आकुंचन पावू शकते. व्हिस्कीच्या नमुन्यांसाठी योग्य वातावरण तयार होईल आणि त्याचवेळी तापमानातील बदलांना लाकूडही प्रतिसाद देऊ शकेल अशा पद्धतीने अंतराळयानाची रचना केली जात आहे. या प्रक्रियेमुळे व्हिस्की मुरण्याच्या वेगात वाढ होईल आणि त्यातून काहीतरी अत्यंत रंजक व वेगळे निष्पन्न होईल, अशी आम्हाला आशा आहे. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, या प्रयोगामुळे लाकडी पिंपांमध्ये मुरताना व्हिस्कीत नेमकी कोणती प्रक्रिया होते यामागील विज्ञान उलगडण्यास मदत होईल. अंतराळात व्हिस्की अधिक वेगाने मुरत असल्याचे सिद्ध झाल्यास भविष्यात ‘स्पेस-एज्ड व्हिस्की’ नावाची एक नवी श्रेणी तयार होण्याची शक्यता आहे. अंतराळात तयार झालेल्या या व्हिस्कीची चव आणि वैशिष्ट्ये नेहमीच्या व्हिस्कीपेक्षा अधिक तीव्र असू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. या प्रक्रियेतून अत्यंत दर्जेदार चवींची व्हिस्की तयार होईल, अशी संशोधक बायलेट यांना अपेक्षा आहे.

हा प्रयोग केवळ व्हिस्कीपुरता मर्यादित नाही

स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, या प्रयोगात ग्लासगो विद्यापीठाने विकसित केलेल्या कृत्रिम ‘जिभेचा’ वापर केला जाणार आहे. व्हिस्कीच्या नमुन्याच्या रासायनिक संरचनेत होणारे बदल ओळखण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. व्हिस्की पृथ्वीभोवती फिरत असताना त्यामधील रासायनिक घटकांवर संशोधक लक्ष ठेवणार आहेत. या प्रकल्पात अंतराळात इथेनॉलची निर्मिती किंवा त्याचे शुद्धीकरण कशा पद्धतीने करता येईल, याचाही अभ्यास केला जाणार आहे. सध्या अनेक औषधांच्या निर्मितीत इथेनॉलचा वापर केला जातो, त्यामुळे पृथ्वीबाहेर रासायनिक उत्पादन कसे करता येऊ शकते, याचा अभ्यास करण्यासाठी हा व्हिस्कीचा प्रयोग एका आदर्श मॉडेलसारखा ठरणार आहे. याबाबत डॉ. बेलेट यांनी सांगितले की, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये शास्त्रज्ञांना अधिक मोठे आणि अत्यंत शुद्ध रासायनिक स्फटिक तयार करणे, तसेच प्रथिनांची रचना वेगळ्या पद्धतीने घडवून आणणे शक्य होऊ शकते, असे पूर्वीच्या संशोधनातून समोर आले आहे. मात्र, अंतराळात प्रत्यक्षात रासायनिक प्रक्रिया कशा राबवता येतील याबाबत अजूनही अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत, त्यामुळे या प्रकल्पातून त्यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भविष्यात अंतराळात तयार झालेली व्हिस्की बाजारात येणार?

विशेष म्हणजे, अंतराळात ठेवलेली या प्रयोगातील व्हिस्की पृथ्वीवर परत आणली जाणार नाही. मात्र, या संशोधनाला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास हा प्रयोग आणखी पुढे नेण्याची संधी संशोधकांना मिळणार आहे. पुढील चार ते पाच वर्षांत अंतराळात व्हिस्की तयार करण्याची आमची योजना आहे, पण त्याकरिता या संशोधनाला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे, असे डॉ. बेलेट यांनी म्हटले आहे. यादरम्यान सुरुवातीला ‘स्पेस पफिन’ या व्हिस्कीचे मोठमोठ्या आकाराचे पिंप पाठवले जाणार नाहीत. स्कॉटलंड आणि जपानमधील विविध डिस्टिलरीजकडून या प्रयोगासाठी लहान पिंप तयार केले जातील; पण नेमक्या कोणते डिस्टिलरीज यात सहभागी असतील हे अद्याप निश्चित नाही. या प्रयोगामुळे व्हिस्की निर्मिती आणि अभियांत्रिकी क्षेत्रात समृद्ध वारसा असलेल्या दोन देशांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे, असे या पथकाला सुरुवातीच्या कामात सहकार्य करणारे अ‍ॅलन असोसिएट्स संस्थेचे प्रमुख जेफ निस्बेट यांनी म्हटले आहे. दरम्यान, अंतराळात केल्या जाणाऱ्या व्हिस्कीच्या प्रयोगाकडे सध्या सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे.