MH370 Missing Flight १२ वर्षांपूर्वी मलेशियन एअरलाइन्सचे एक विमान प्रवासी आणि क्रूसह बेपत्ता झाले होते. क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे मलेशिया एअरलाइन्सचे MH370 हे विमान ८ मार्च २०१४ रोजी गायब झाले. त्या विमानाचे रहस्य आजही तसेच आहे. इतिहासातील ही रहस्यमयी दुर्घटना असल्याचे मानले जाते. मलेशियाने बुधवारी जाहीर केले की, बेपत्ता विमानाचा शोध याच महिन्यात पुन्हा सुरू होईल. मलेशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, ओशन इन्फिनिटी ही अमेरिकेची सागरी रोबोटिक्स कंपनी MH-370 या बेपत्ता विमानाच्या अवशेषांना शोधण्यासाठी समुद्राच्या तळाची पाहणी पुन्हा सुरू करील.

MH370 हे विमान क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (KLIA) येथून २२७ प्रवासी व १२ क्रू सदस्यांसह बीजिंगसाठी निघाले होते आणि ते गायब झाले. मलेशिया सरकारने सांगितले की, ३० डिसेंबर रोजी पुन्हा सुरू होणारा हा शोध ५५ दिवसांसाठी सुरू राहील. सरकारने या वर्षीच २५ मार्च रोजी ‘ओशन इन्फिनिटी’सोबतच्या सेवा करारावर स्वाक्षरी केली आहे. परंतु, जवळजवळ १२ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या ‘MH370’ साठी मलेशिया सरकार पुन्हा शोध मोहीम का सुरू करीत आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

नक्की काय घडले?

मलेशिया सरकारने ‘MH370’ साठी नवीन शोधमोहीम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. २३९ प्रवाशांना क्वालालंपूर येथून बीजिंगला घेऊन जाणारे विमान अचानक रडारवरून बेपत्ता झाले होते. या विमानातील प्रवाशांचे काय झाले, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. दक्षिण चीन समुद्रावरून उड्डाण केल्यानंतर ३८ मिनिटांत त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. लष्करी रडारने नंतर विमानाचा मागोवा घेतला. कारण- ते त्याच्या नियोजित मार्गापासून भरकटले होते.

त्यापूर्वी ते मलय द्वीपकल्प आणि अंदमान समुद्र ओलांडून पेनांग बेटाच्या वायव्येस २०० नॉटिकल मैलावर आढळून आले होते. विमानाने व्हिएतनामी हवाई हद्दीत प्रवेश करताच कॅप्टन झाहरी अहमद शाह यांनी “शुभ रात्री, मलेशियन ३७०”, असा संदेश दिला आणि थोड्याच वेळात त्याचे ट्रान्सपाँडर बंद झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे हे विमान सहजपणे ट्रॅक करणे शक्य नव्हते. विमानातील २३९ प्रवाशांपैकी बहुतांश चिनी नागरिक होते.

२०२१ मध्ये हे विमान कुठे कोसळले याचा शोध घेतल्याचा दावा रिचर्ड गॉडफ्रे या ब्रिटिश वैमानिक अभियंत्याने केला होता. त्यांनी वर्षभर या प्रकरणाचा अभ्यास केला होता. त्यांनी विमान पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थपासून दोन हजार किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांनी ४० नॉटिकल मैलांच्या परिघाचादेखील अंदाज व्यक्त केला होता. विमानाचा ढिगारा समुद्रात खोलवर असू शकतो, असेही त्यांनी सांगितले होते.

१२ वर्षांनंतर शोध सुरु करण्याची कारणे काय?

१. MH370 च्या बळींच्या कुटुंबीयांसाठी प्रयत्न

मलेशियन सरकारला त्या दुर्दैवी विमानातील २३९ लोकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रियजनांबरोबर नक्की काय घडले हे सांगणे महत्त्वाचे आहे. २०१४ ते २०१७ दरम्यान मलेशिया, ऑस्ट्रेलिया व चीनने संयुक्तपणे दक्षिण हिंदी महासागरात १,२०,००० चौरस किलोमीटरच्या एका आयताकृती क्षेत्राचा शोध घेतला; परंतु त्यांना काहीही सापडले नाही. २०१८ मध्ये ‘ओशन इन्फिनिटी’ने शोध हाती घेतला आणि २५,००० चौरस किलोमीटरचा एक लहान भाग स्कॅन केला.

तज्ज्ञांच्या मते, हा भाग विमानाचे अवशेष मिळण्याची अधिक शक्यता असलेला भाग होता. मात्र, या कंपनीचे तीन महिन्यांचे प्रयत्नदेखील अपयशी ठरले. अनेक नातेवाईक, विशेषत: चीनमधील १५३ नागरिक या विमानात होते. त्यांनी मलेशियाला हा शोध न थांबवण्याची वारंवार विनंती केली आहे. अवशेष मिळाल्यास त्यातून नातेवाइकांना त्यांच्या प्रियजनांबरोबर काय आणि कसे घडले हे समजून घेण्यास मदत होईल.

२. विमान न सापडल्यास मलेशियासाठी कोणताही आर्थिक धोका नाही

शोधमोहीम पार पाडण्याच्या करारामध्ये विमान न सापडल्यास मलेशियासाठी कोणताही आर्थिक धोका किंवा अतिरिक्त गुंतवणूक नाही. परिवहन मंत्री अँथनी लोके यांनी गेल्या डिसेंबरमध्ये माहिती दिली होती की, ओशन इन्फिनिटी ‘नो फाइंड, नो फी’ (अवशेष न सापडल्यास कोणतेही शुल्क नाही) या तत्त्वावर काम करील. विमानाचे विश्वसनीय अवशेष सापडल्यास मलेशिया सरकार पैसे देईल. MH370 चे अवशेष सापडल्यास मलेशिया ‘ओशन इन्फिनिटी’ला ७० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५८० कोटी रुपये) देईल.

३. कोणत्या ठिकाणी शोधमोहिम राबवली जाणार?

यंदाच्या शोधमोहिमेदरम्यान शोध एका सुधारित क्षेत्रावर केंद्रित केला जाईल. त्याचाच अर्थ असा की, जिथे यश मिळण्याची सर्वाधिक चांगली संधी असेल, तिथे शोध घेतला जाईल. मंत्रालयाने म्हटले आहे, “विमान शोधण्याची सर्वाधिक संभाव्यता असलेल्या लक्ष्यित क्षेत्रात हा शोध घेण्यात येईल.” ‘ओशन इन्फिनिटी’ने २०१८ पासून उपग्रह डेटा, समुद्रातील प्रवाह आणि प्रवाहाचे मॉडेलिंग यांचे विश्लेषण करणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे कंपनीला प्राधान्य क्षेत्रे माहीत आहेत.

‘ओशन इन्फिनिटी’ ६,००० मीटरपेक्षा जास्त खोलीवर काम करण्यास सक्षम असलेली आणि मोठे क्षेत्र वेगाने कव्हर करणारी पाण्याखालील स्वयंचलित वाहने तैनात करील. विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या रहस्यांपैकी एकाचा शोध या नव्या शोधमोहिमेत लागणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.