Gold-Silver Price Today : काही दिवसांपासून विक्रमी घोडदौड करणाऱ्या चांदीच्या दराला अचानक लगाम लागला. जागतिक बाजारात प्रति औंस ९५.८० डॉलरची ऐतिहासिक उसळी घेतल्यानंतर गुरुवारी चांदीचे दर झपाट्याने खाली आले. अवघ्या तीन आठवड्यांत भारतीय सुवर्ण बाजारपेठेत चांदीने तब्बल ३० टक्क्यांनी अफाट झेप घेतली होती. गुरुवारी त्यात मोठी घसरण होऊन चांदीचा दर प्रति औंस ९३ डॉलरवर स्थिरावला. या घसरणीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोस येथे केलेले भाषण कारणीभूत मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर चांदीची घोडदौड कायम राहणार की दर आणखीनच घसरणार, असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

चांदीचे दर कशामुळे घसरले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी लष्करी शक्तीचा वापर करणार नसल्याचे गुरुवारी दावोस येथील भाषणात स्पष्ट केले. त्यामुळे भू-राजकीय चिंतेत घट झाली आणि मौल्यवान धातूंमध्ये नफावसुली सुरू झाली, असे मेहता इक्विटीजच्या कमोडिटीज विभागाचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘नाटो’ कराराचा एक आराखडा स्पष्ट करताना १ फेब्रुवारीपासून आठ मित्रदेशांवर लादले जाणारे संभाव्य आयात शुल्क तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निवळली असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे वळलेला गुंतवणूकदारांचा ओढा आता हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

मागणी नेमकी कशामुळे घटली?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युरोपीय देशांवरील टॅरिफची धमकी मागे घेतल्याने आणि ग्रीनलँडबाबत भविष्यातील कराराचे संकेत दिल्याने तणाव कमी झाला आहे. त्यांनी लष्करी बळाचा वापर न करण्याचे आश्वासन दिल्याने सोन्या-चांदीची सुरक्षित मालमत्ता म्हणून असलेली मागणी तत्काळ घटली. गुरुवारी गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंच्या खरेदीला प्राधान्य न देता त्यातून नफावसुली केली. परिणामी जागतिक बाजारातील सोन्याचे दर ०.९ टक्क्याने कमी होऊन ४,८१० डॉलर्सवर आले. याच कालावधीत चांदीचा दरही ०.५ टक्क्याने कमी होऊन प्रति औस ९३ डॉलर या पातळीवर स्थिरावला.

आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची भारताला धडकी? रशियन तेलाची आयात बंद? आकडेवारी काय सांगते?

चांदीच्या दराबाबत तज्ज्ञ काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोसमध्ये टॅरिफबाबत मवाळ पवित्रा घेतल्याने कॉमेक्स आणि एमसीएक्स या दोन्ही बाजारपेठांत चांदीचे दर ऐतिहासिक उच्चांकावरून खाली आले. त्यातच चीनने २०२५ मध्ये तब्बल ५,१०० टन चांदीची निर्यात केल्याने त्याचा बाजारपेठेवर आणखीनच परिणाम झाल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहारात भू-राजकीय तणाव आणि व्यापारयुद्धाची भीती कमी झाल्यामुळे एमसीएक्सवरील चांदीचा दर काही काळासाठी ३,०६,००० रुपये प्रतिकिलोच्या खाली घसरला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या जोरदार खरेदीमुळे बहुतांश नुकसान भरून निघाले. गुरुवारी भारतीय सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो ३,१७,००० रुपयांवर आला होता, असे कोटक सिक्युरिटीजच्या कमोडिटी रिसर्च विभागाच्या कायनात चैनवाला यांनी सांगितले.

चांदीचा वापर नेमका कशासाठी?

गुरुवारी चांदीच्या भावात घसरण झाली असली तरीही अलीकडच्या काळात जागतिक बाजारात या मौल्यवान धातूने झपाट्याने उसळी घेतली आहे. या वाढीमागे केवळ गुंतवणुकीची सुरक्षितता नव्हे, तर वाढती औद्योगिक गरज हेही महत्त्वाचे कारण आहे. सोन्याच्या तुलनेत स्वस्त आणि बहु-उपयोगी असलेली चांदी आता ‘औद्योगिक धातू आणि मौल्यवान धातू’ अशी दुहेरी भूमिका बजावत आहे. सध्या हरित ऊर्जेकडे जगाचा वेगाने होत असलेला कल चांदीसाठी निर्णायक ठरत आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फोटोव्होल्टेईक पॅनेल्समध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने, चार्जिंग यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सेमीकंडक्टर उद्योगातही चांदी हा अपरिहार्य घटक ठरला आहे. परिणामी, औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे.

चांदीच्या दराची आजची काय स्थिती?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे गुरुवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीच्या भावात अचानक घसरण झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोने-चांदीच्या दराने ग्राहकांना पुन्हा मोठा हादरा देत नवीन उच्चांक केला. जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी चांदीच्या दरात २५ हजार ७५० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा भाव जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ३९ हजार ९०० रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला. बुधवारीही ५,१५० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ३४ हजार ७५० रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचली होती. गुरुवारी त्यात २० हजार ६०० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह तीन लाख १४ हजार १५० रुपयांपर्यंत घसरली होती.

हेही वाचा : पाकिस्तानवर मोठं संकट! हाफिज सईदच्या संघटनेत मोठी फूट? वाद कशामुळे उफाळला?

आजचा सोन्याचा भाव काय?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ६,७९८ रुपयांची वाढ नोंदवली गेल्यामुळे सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५९ हजार ६५० रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. मात्र, गुरुवारी दिवसभरात ३,३९९ रुपयांची घट नोंदवली गेल्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५६ हजार २५१ रुपयांपर्यंत खाली आले होते. शुक्रवारी आणखी दर कमी होण्याची अपेक्षा असताना सकाळी बाजार उघडल्यावर त्यात चार हजार ६३५ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख ६० हजार ८८६ रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंनी गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षाही मोठा परतावा दिला आहे. मात्र, भू-राजकीय तणाव कमी झाल्यानंतर मौल्यवान धातूचे दर कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीत गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.