Why Smoking Darkens Your Lips: सिगारेट ओढणाऱ्यांचे ओठ अनेकदा काळसर पडल्याचे दिसते. धूम्रपान करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये ओठ, हिरड्या आणि तोंडातील आतील त्वचा (श्लेष्मल त्वचा /Oral Mucosa) काळसर किंवा तपकिरी झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय ग्रंथांमध्ये नोंदवले गेले आहे. तरीही ओठ काळे आहेत म्हणून एखादी व्यक्ती नक्कीच धूम्रपान करत असणार असा निष्कर्ष काढणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठरणार नाही. धूम्रपानामुळे होणाऱ्या अशा रंगबदलाला ‘स्मोकर्स मॅलॅनोसिस’ (Smoker’s melanosis) किंवा ‘स्मोकिंग-असोसिएटेड ओरल पिगमेंटेशन’ (Smoking-associated oral pigmentation) असे म्हणतात. हा रंग बदल नेमका कशामुळे होतो तसेच ओठाचा रंग पाहिल्यासारखा होण शक्य आहे का? याचा घेतलेला हा आढावा.
तंबाखूच्या धुरातील रसायनांमुळे ‘मॅलॅनोसाइट्स’ (Melanocytes) पेशी सक्रिय होऊन ‘मॅलेनिन’ (Melanin) या रंगद्रव्याची निर्मिती वाढते; हीच या रंगबदलामागील प्रमुख प्रक्रिया मानली जाते. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या ओठांचा काळसरपणा केवळ धूम्रपानामुळेच असतो, असे म्हणता येत नाही.
मॅलेनिन (Melanin) आणि मॅलॅनोसाइट्स (Melanocytes) यांची भूमिका
ओठ आणि तोंडाच्या आतील भागाचा नैसर्गिक रंग प्रामुख्याने ‘मॅलेनिन’ नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. हे मॅलेनिन तयार करण्याचे काम ‘मॅलॅनोसाइट्स’ नावाच्या पेशी करतात. शरीरात या पेशींची संख्या न वाढताही त्यांनी जर मॅलेनिन तयार करण्याचा वेग वाढवला, तर त्वचा किंवा तोंडाचा आतील भाग आधीपेक्षा जास्त गडद दिसू लागतो. फेलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (Feller et al.) केलेल्या अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, तंबाखूचा धूर, विशिष्ट औषधे, शरीरातील हार्मोन्सचे बदल आणि इतर बाह्य घटकांमुळे मॅलेनिन तयार होण्याच्या या प्रक्रियेला गती मिळते. तसेच, गोंडाक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या (Gondak et al.) मते, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये मॅलेनिनचे प्रमाण वाढून ‘स्मोकर्स मॅलॅनोसिस’ची समस्या निर्माण होते. हा काळसरपणा प्रामुख्याने हिरड्यांवर दिसून येत असला, तरी तो ओठांवर आणि तोंडातील इतर भागांवरही पसरू शकतो.
सिगारेटच्या धुरामुळे पिगमेंटेशन (Pigmentation) कसे वाढते?
सिगारेटच्या धुरात निकोटिन, पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आणि इतर अनेक रासायनिक घटक असतात. या रसायनांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मॅलॅनोसाइट्स पेशी उत्तेजित होतात आणि मॅलेनिन निर्मितीचे प्रमाण वाढल्याने ओठांवर तपकिरी किंवा काळसर डाग पडतात. उपलब्ध वैद्यकीय संदर्भामध्ये सिगारेटच्या धुरातील हानिकारक रसायने तसेच धूम्रपानाशी संबंधित उष्णता मॅलॅनोसाइट्सना उत्तेजित करून मॅलेनिनचे उत्पादन वाढवू शकतात, अशी शक्यता मांडण्यात आली आहे. मात्र, ही प्रक्रिया पेशींच्या पातळीवर नेमकी कशी घडते, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
धूम्रपान आणि ओठांच्या पिगमेंटेशनमधील प्रत्यक्ष संबंध
हरेसाकू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (Haresaku et al.) धूम्रपान, ओठांचा रंग आणि हिरड्यांमधील काळसरपणा (मॅलेनिन पिगमेंटेशन) यांविषयी अभ्यास केला. या अभ्यासात धूम्रपान करणे आणि ओठांचा रंग गडद होणे यांमध्ये थेट संबंध असल्याचे दिसून आले. यावरून असे स्पष्ट होते की, तंबाखूच्या संपर्कामुळे मॅलॅनोसाइट्स पेशी लगेच प्रभावित किंवा संवेदनशील होतात. तसेच, मुलतानी (Multani) यांच्या अभ्यासातही धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या ओठांवर आणि हिरड्यांवर मोठ्या प्रमाणावर काळसरपणा आढळला. तंबाखूच्या धुरामुळे या पेशी अधिक वेगाने मॅलेनिन तयार करू लागतात, हेच यामागचे मुख्य कारण असावे असे संशोधकांचे मत आहे. याशिवाय, तोंडातील काळसरपणा आणि धूम्रपान यांच्या संबंधावर झालेल्या इतर अनेक अभ्यासांमधूनही हीच बाब समोर आली आहे की, धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये तोंडाच्या आतील भागाचा रंग गडद होण्याचे (Oral mucosal pigmentation) प्रमाण खूप जास्त असते.

धूम्रपानाचे प्रमाण आणि त्याचा परिणाम
ओठांच्या काळसरपणाची तीव्रता व्यक्तीच्या आनुवंशिक त्वचेच्या रंगावर, ती रोज किती सिगारेट ओढते आणि किती वर्षांपासून धूम्रपान करत आहे, या गोष्टींवर अवलंबून असते. ज्या व्यक्तींचा तंबाखूशी संपर्क जास्त येतो, त्यांच्यात हा काळसरपणा अधिक तीव्र असल्याचे काही अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. मात्र, हा नियम प्रत्येक व्यक्तीला सारखाच लागू होतो असे नाही. ज्यांच्या त्वचेमध्ये नैसर्गिकरीत्याच मॅलेनिनचे प्रमाण जास्त असते, किंवा जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात, विशिष्ट औषधे घेतात आणि ज्यांना इतर काही वैद्यकीय कारणे आहेत, अशा व्यक्तींचे ओठही गडद दिसू शकतात. त्यामुळे केवळ ओठ काळे आहेत म्हणून ती व्यक्ती नक्कीच धूम्रपान करते असा निष्कर्ष काढणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठरणार नाही.
धूम्रपान बंद केल्यानंतर ओठांचा रंग पुन्हा सामान्य होतो का?
या विषयातील एक महत्त्वाचा पुरावा काटो आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या (Kato et al.) अभ्यासातून समोर येतो. त्यांनी धूम्रपान सोडल्यानंतर हिरड्यांवरील काळसरपणात (मॅलॅनोसिस) कसे बदल होतात, याचे छायाचित्रांच्या मदतीने मापन केले. धूम्रपान पूर्णपणे बंद केल्यानंतर हा काळसरपणा हळूहळू कमी होत असल्याचे त्यांच्या पाहणीत दिसून आले. अलीकडील संशोधनात, पूर्वी धूम्रपान करणाऱ्या (Former smokers) व्यक्तींच्या हिरड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून असे स्पष्ट झाले की, धूम्रपान थांबवल्यामुळे तंबाखूमुळे उत्तेजित झालेली ‘मॅलॅनोसाइट्स’ पेशींची क्रिया मंदावते आणि त्यामुळे ओठ व हिरड्यांचा काळसरपणा कमी होऊ लागतो. हा काळसरपणा किती वेगाने कमी होईल किंवा ओठांचा मूळ नैसर्गिक रंग पूर्णपणे परत येईल का, हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकते. कारण, व्यक्तीने किती वर्षे धूम्रपान केले आहे, तिचा नैसर्गिक त्वचेचा रंग कसा आहे, तसेच सूर्यप्रकाश आणि इतर बाह्य घटक या सर्वांचा या प्रक्रियेवर परिणाम होत असतो.
काळसर ओठांचे प्रत्येक प्रकरण ‘स्मोकर्स मॅलॅनोसिस’ असतेच असे नाही
ओठांचा रंग गडद होण्यामागे धूम्रपाना व्यतिरिक्त इतरही अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आनुवंशिक घटक, सूर्यप्रकाशाचा प्रभाव, ओठांची जुनी जळजळ, ॲलर्जी, सूज, काही औषधांचे दुष्परिणाम, संप्रेरकांमधील (Endocrine) विकार तसेच ‘मॅलॅनोटिक मॅक्युएल’ यांसारख्या बाबींचा समावेश होतो. अलावी (Alawi) तसेच ताराकजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (Tarakji et al.) स्पष्ट केल्यानुसार, तोंडातील डागांचे योग्य निदान करताना नैसर्गिक पिगमेंटेशन, औषधामुळे झालेला काळसरपणा, स्मोकर्स मॅलॅनोसिस आणि इतर गंभीर आजार यांतील फरक ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः ओठांवर किंवा तोंडात अचानक एखादा नवीन काळा डाग आला असेल, त्याचा आकार किंवा रंग वेगाने बदलत असेल, त्यातून रक्त येत असेल, वेदना होत असतील किंवा एखादी न भरणारी जखम झाली असेल, तर त्याला केवळ धूम्रपानाचा परिणाम समजून दुर्लक्ष करू नये. अशा वेळी दंतचिकित्सक, ओरल मेडिसिन तज्ज्ञ किंवा त्वचारोगतज्ज्ञांकडून (Dermatologist) तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
उपलब्ध संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचे ओठ आणि तोंडाचा आतील भाग काळसर होण्यामागे तंबाखूच्या धुरामुळे मॅलॅनोसाइट्स पेशी सक्रिय होऊन मॅलेनिनचे उत्पादन वाढणे हीच मुख्य प्रक्रिया मानली जाते. या बदलाला ‘स्मोकर्स मॅलॅनोसिस’ म्हणतात. विविध अभ्यासांतून धूम्रपान आणि तोंडातील काळसरपणा यांचा स्पष्ट संबंध दिसून आला असून, धूम्रपान पूर्णपणे बंद केल्यानंतर काही व्यक्तींमधील हा काळसरपणा हळूहळू कमी होऊ शकतो.
परंतु, ओठांचा काळसर रंग हा केवळ धूम्रपानाचाच निश्चित पुरावा असू शकत नाही. आनुवंशिकता, सूर्यप्रकाश, औषधे आणि इतर वैद्यकीय कारणांचा योग्य विचार करूनच अंतिम निष्कर्ष काढणे आवश्यक आहे.
- संदर्भ:
Feller L, et al. Melanin: the biophysiology of oral melanocytes and physiological oral pigmentation. Head & Face Medicine. 2014;10:8. - Gondak RO, et al. Oral pigmented lesions: Clinicopathologic features and review of the literature. Med Oral Patol Oral Cir Bucal. 2012;17:e919–e924.
- Haresaku S, et al. Association of lip pigmentation with smoking and gingival melanin pigmentation. Oral Diseases. 2007;13:71–76.
- Multani S. Interrelationship of Smoking, Lip and Gingival Melanin Pigmentation, and Periodontal Status. 2013.
- Kato T, et al. Measurement of Reduced Gingival Melanosis after Smoking Cessation. International Journal of Environmental Research and Public Health. 2016;13:598.
- Alawi F. Pigmented Lesions of the Oral Cavity: An Update. Dental Clinics of North America. 2013;57:699–710.
- Tarakji B, et al. Diagnosis of oral pigmentations and malignant transformations. Singapore Dental Journal. 2014;35:39–46.
- Black and Brown: Non-neoplastic Pigmentation of the Oral Mucosa. Head and Neck Pathology. 2019;13:16–26.
