सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आमरण उपोषण संपवण्याची शक्यता आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने व आंदोलकांच्या संसदेवरील मोर्चाने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यामुळे वांगचुक हे उपोषण संपवू शकतात. दरम्यान, १८ जुलै रोजी अभिजीत दीपके यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले होते. परंतु, नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या विनंतीमुळे दीपके यांनी त्यांचे उपोषण संपवले. या परिस्थितीत सोनम वांगचुक यांचे उपोषण पुढील काही दिवस सुरू राहू शकते.

उपोषण संपवल्यानंतर त्याच दिवशी सोनम वांगचुक लगेचच सामान्यपणे जेवण करू शकतील का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. सोनम वांगचुक यांना पुढील ७ ते १० दिवस सामान्य जेवण करता येणार नाही. जाणून घेऊयात.

नड्डांची आंदोलकांशी चर्चा

केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा (जेपी नड्डा) यांनी काल (२० जुलै, सोमवार) कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. नड्डा यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत या भेटीची माहिती दिली. ते म्हणाले, “आज सकाळी पहिल्यांदा आंदोलकांकडून चर्चेसाठी प्रस्ताव आला आणि सकाळी ११ वाजून ५० मिनिटांपासून आमची चर्चा सुरू आहे. सौहार्दपूर्ण वातावरणात आमची भेट झाली. त्यांच्या शिष्टमंडळाशी मौखिक रूपात सखोल चर्चा झाली आणि त्यांच्याकडून ४ वाजता मला एक लेखी याचिका दिली गेली. मी सगळ्या आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन समाप्त करावे आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी.” , असे ट्विट नड्डा यांनी केले. दरम्यान, त्यांचे हे ट्विट दुपारी ४ वाजून ३७ मिनिटाला आले होते.

सोनम वांगचुक यांना ‘रिफिडिंग सिंड्रोम’ होण्याचा धोका?

उपोषण संपवल्यानंतर सोनम वांगचुक यांना लगेचच जेवण करता येणार नाही. अनेक आठवडे अन्नाविना राहिल्याने त्यांच्या शरीराला ‘रिफिडिंग सिंड्रोम’ होण्याचा धोका अधिक आहे. ही एक प्राणघातक अवस्था असते. शरीराची चयापचय क्रिया बदलल्यानंतर घातक इलेक्ट्रोलाइट आणि फ्ल्युएड इम्बॅलन्स शरीरात तयार होते. दीर्घकाळ सुरू असलेले उपोषण संपवल्यानंतर अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात होणे महत्वाचे असते.

पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवसापर्यंत : रुग्णाला स्पष्ट द्रव पदार्थ, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (ORS), थोडे पाणी मिसळलेले फळांचे ज्यूस किंवा भाज्यांचे पातळ सूप दिले जाते. तसेच या काळात त्यांच्या पोटॅशियम, फॉस्फेट आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणावर वैद्यकीय पथकाद्वारे बारीक लक्ष ठेवले जाते.

चौथ्या दिवसापासून ते सहाव्या दिवसापर्यंत : डॉक्टर अगदी कमी प्रमाणात आणि वारंवार पचायला हलके, कमी चरबीयुक्त (low-fat) अर्ध-घट्ट पदार्थ देण्यास सुरुवात करतात; जसे की पातळ पेज (कांजी), दही किंवा फळांची प्युरी (गर).

सातव्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत : रक्ताच्या चाचण्यांमध्ये इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून आल्यास, उकडलेल्या भाज्या, वरण आणि खिचडी यांसारखे मऊ अन्नपदार्थ देण्यास सुरुवात केली जाते आणि हळूहळू उष्मांक (कॅलरी) वाढवले जातात.

दहाव्या दिवसानंतर : एकदा चयापचय स्थिरता सुनिश्चित झाली की, जटिल कर्बोदके (complex carbohydrates), मेद (fats) आणि जास्त प्रथिनेयुक्त (denser proteins) पूर्ण नेहमीचे जेवण सुरक्षितपणे पुन्हा सुरू केले जाते.

दीर्घकाळ चाललेले उपोषण सोडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला सुरक्षितपणे नेहमीचे, घट्ट जेवण घेता येण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली अन्न देण्याची ही प्रक्रिया सहसा ७ ते १० दिवसांची असते. याचा अचूक कालावधी उपवास किती दिवस चालला, शरीरातील स्नायूंचे प्रमाण किती कमी झाले आणि सुरुवातीच्या द्रवरूप आहाराला शरीर कसा प्रतिसाद देते, यावर पूर्णपणे अवलंबून असतो.

सोनम वांगचुक उपोषण का करत आहेत?

सोनम वांगचुक यांनी दोन मागण्या केल्या. एक म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि दुसरी म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा द्यावा व सहाव्या परिशिष्टात समावेश करावा अशा दोन मागण्या त्यांनी ठेवल्या. या मागण्या मान्य करण्यासाठी वांगचुक यांनी केंद्र सरकारला २७ जून पर्यंतचा अवधी दिला. यातील एक जरी मागणी पूर्ण झाली तर आपण उपोषण संपवू असेही ते म्हणाले होते. परंतु केंद्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. वांगचुक म्हणाले, “मी इथे आहे कारण माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. मागील ४० वर्षांपासून शिक्षण हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिला. जेव्हा तरूणाई शिक्षण व्यवस्थेतील अडचणींबाबत आवाज उठवत आहे, त्यावेळी मी शांत कसा राहू शकतो?”

सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा

जंतर-मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी कडेलोट झाला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो तरुण-तरुणी पोलीस आणि निमलष्करी दलाचे बहुस्तरीय सुरक्षाकवच मोडून संसदेवर धडकले. पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तमाम मंत्री, खासदार संसदेत उपस्थित असताना आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे संसदेच्या मुख्य द्वारावर येऊन दाखल झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा जवानांनी केलेला लाठीमार आणि अश्रुधुराचा माराही संतप्त तरुण वर्गाला थोपवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर राजधानी दिल्ली तणावाखाली राहिली.