NEET UG Re-Exam Telegram Ban: ३ मे रोजी झालेला नीट-यूजी (NEET-UG) परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पेपर रद्द केला होता. त्यानंतर आता नीट – यूजी परीक्षा २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतात लोकप्रिय असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म ‘टेलिग्राम’वर बंदी घालण्यात आली आहे. एनटीएच्या विनंतीवरून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने टेलिग्रामवर बंदी घातली आहे. नीट-यूजी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर केंद्र सरकार व एनटीएने २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी सतर्कता बाळगली आहे. नीट-यूजी परीक्षेसाठी ‘टेलिग्राम’वर बंदी घालण्याचे नेमके कारण काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
२२ जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी
नीट – यूजीची पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घातली आहे. टेलिग्रामवर नीट-यूजीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे पेपरफुटीशी संबंधित मध्यस्थ किंवा माफिया देखील टेलिग्रामचा वापर करून अफवा पसरवत आहेत. प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी टेलिग्रामचा वापर होतो, अशी शंका एनटीएला आहे.
माहिती व तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६९ (अ) नुसार टेलिग्रामवर बंदी घालण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. टेलिग्रामवरील मेसेज एडिटिंग फिचर ३० जून पर्यंत बंद करावे, असे निर्देशही टेलिग्रामला देण्यात आले आहेत. मेसेज एडिटिंग फिचरचा वापर करून जुने मेसेज परीक्षेनंतर एडिट केले जातात. त्यातून पेपर परीक्षेच्या आधीच फुटला होता, असे दर्शवले जाते. पुरावा म्हणून त्याचे स्क्रिनशॉट शेअर केले जातात. त्यामुळे मेसेज एडिटिंग फिचर वापरकर्त्यांसाठी ३० जून पर्यंत बंद करण्यात यावेत असे आदेश टेलिग्रामला देण्यात आले आहेत.
टेलिग्रामवर बंदी का घालण्यात आली?
एनटीएने एक निवेदन जारी केले आहे. त्यात एनटीएने म्हटले, मागील काही आठवड्यांपासून काही टेलिग्राम चॅनेल्स नीट-यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा दावा करत आहेत. त्यासाठी ते पालकांना, विद्यार्थ्यांना लाखो रूपयांची मागणी करत आहेत. एनटीएने अशा काही चॅनेल्सची नावेही उघड केली आहेत. त्यानुसार ‘पेपर लिक्ड नीट’ (PAPER LEAKED NEET), ‘रि-नीट २०२६’ (Re-NEET 2026), ‘प्रायव्हेट माफिया’ (Private Mafia) आणि ‘रि नीट माफिया’ (REE NEET MAFIAA) हे टेलिग्राम चॅनेल्स प्रश्नपत्रिका देण्याचा कथित दावा करून विद्यार्थ्यांकडे पैशांची मागणी करत आहेत. दरम्यान, २१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी परीक्षेचा पेपर कुठेही उपलब्ध नाही, असे एनटीएने स्पष्ट सांगितले आहे.
अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक का केली?
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने १५ जून रोजी दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानमधून दोघांना अटक केली आहे. आपल्याकडे नीट पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचा दावा करून टेलिग्रामवर विद्यार्थी व पालकांची फसवणूक दोघे आरोपी करत होते. पुन्हा होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात टेलिग्रामवर ते पैशांची मागणी करत होते. दरम्यान, दोन्ही आरोपींकडे नीट-यूजी पुनर्परीक्षेशी संबंधित कोणतीही कागदपत्रे अथवा प्रश्नपत्रिका आढळून आलेली नाही, असे तपासानंतर पोलिसांनी सांगितले. ‘इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (14C)’ने नीट-यूजी पुनर्परीक्षेबाबत अफवा पसरवणाऱ्या टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्सला मोठ्या प्रमाणात हटवले आहे. एनटीए आणि बिहार, गुजरात, राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
मेसेज एडिटिंग फिचर बंद ठेवण्याचे आदेश का देण्यात आले?
टेलिग्रामवरील मेसेज एडिटिंग फिचरला ३० जूनपर्यंत बंद ठेवावे, असे आदेश टेलिग्रामला देण्यात आले आहेत. या फिचरचा वापर करून जुन्या मेसेजला एडिट (बदलले) केले जाते. जुन्या मेसेजमध्ये जोडलेली पीडीएफ फाइल एडिट करून बदलता येते. हा बदल केल्यानंतर मेसेज पूर्णत: बदलतो, परंतु, त्या मेसेजची मूळ तारीख बदलत नाही. टेलिग्रामवर पेपर फुटीचा दावा करणारे माफिया जुन्याच मेसेजमध्ये होऊन गेलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका जोडतात व परीक्षेआधीच पेपर फुटला असे भासवतात. त्या मेसेजचे स्क्रिनशॉट शेअर केले जातात, असे एनटीएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे नीट-यूजी पुनर्परीक्षा झाल्यानंतर ३० जूनपर्यंत टेलिग्रामचे मेसेज एडिटिंग फिचर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
