मध्ययुगीन भारतात काही मुद्दे मंदिरांवर होणारे हल्ले किंवा नासधूस यांपेक्षाही अत्यंत महत्त्वाचे होते. त्या मुद्द्यांबाबत त्या काळच्या शासकांच्या भावना तीव्र होत्या. पुराव्यांच्या खोलात गेल्यानंतर मंदिरांच्या इतिहासाबाबत काही गोष्टी उलगडतात. मध्ययुगीन भारतातील मंदिरांना त्यावेळच्या राजकारणापासून वेगळे करता येत नाही, असे दिसून येते. मंदिरांकडे बघण्याचा आजचा जो दृष्टीकोन आहे, तिथेच मुख्य समस्या आहे. आधुनिक भारतातील (आज) लोक मंदिरांकडे प्रामुख्याने एक प्रार्थनास्थळ म्हणून पाहतात. मध्ययुगीन भारतात मंदिरांना यापेक्षाही अधिक महत्त्व होते. मंदिरं म्हणजे आर्थिक केंद्रस्थान, जमिनीवर मालकी, राजांकडून मिळणारी शाही देणगी, अनेक लोकांच्या रोजगाराचे साधन आणि एखाद्या राज्याचे किंवा साम्राज्याचे प्रतिक होते.
काही मंदिरं ही एखाद्या राजाची शाही मंदिरं होती. त्यामुळे ती राज्यापासून वेगळी करता येत नसत. त्यामुळे अशा एखाद्या मंदिरावर हल्ला करण्याकडे धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले जात नसत. ती एक राजकीय घडामोड मानली जात असे. या विषयावर इतिहासकार मोहम्मद हबीब, डीएन झा, रिचर्ड इटन, इरफान हबीब आणि तारापदा मुखर्जी यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांनी केलेला अभ्यास हा या विषयावरून उद्भवणाऱ्या वाग्युद्धाच्या पलिकडील आहे.
हिंदू शासकांकडूनही मंदिरांवर स्वारी?
गझनीच्या महमदचे उदाहरण आपण घेऊ. इतिहासकार मोहम्मद हबीब यांनी युक्तिवाद केला आहे की, ‘गझनवीद’ शासक महमदचे राज्य अफगाणिस्तान आणि पूर्व इराणमध्ये होते. त्यांचे सैन्य अत्यंत प्रगत होते. अशा सैन्याला जोपासण्यासाठी धन आवश्यक असते. भारतातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले धन होते.
इतिहासकार डीएन झा यांनी एका महत्वाच्या पैलूकडे लक्ष वेधले आहे. इतिहास कायम हल्ला किंवा चढाई करणाऱ्याला लक्षात ठेवतो. पण त्या हल्ल्यात मदत करणाऱ्या स्थानिक शक्तींकडे मात्र दुर्लक्ष करतो. मध्ययुगीन भारतात झालेली अनेक आक्रमणे फक्त सैन्याच्या बळावर यशस्वी होणे क्वचितच शक्य होते. स्थानिक गट, बंडखोरांचे प्रमुख नेते, राजकीय खबरी आणि असे काही गट जे स्वत:च्या स्वार्थासाठी आक्रमण करणाऱ्यांना जाऊन मिळत यांची भूमिका अशी आक्रमणं यशस्वी होण्यात महत्त्वाची होती. त्यामुळे सोमनाथ मंदिर ते पूर्व भारतातील बौद्ध विहार किंवा मठ जसे की नालंदा, विक्रमशिला आणि ओदंतपुरी यांच्या कथा या फक्त बाहेरील आक्रमणकर्ते आणि येथील समाज यांच्यातील वाद म्हणून पाहता येत नाहीत.
इतिहासकार रिचर्ड इटन यांनी नोंदवलेले मत अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यांच्या मते, मुस्लिम शासकांनी मंदिरांची केलेली नासधूस ही खूप वेगळी अशी घटना नव्हती. तुर्क भारतात येण्याच्या फार पूर्वीच भारतीय राजांनी शत्रू साम्राज्याशी संबंधित मंदिरांना लक्ष्य केले होते. पल्लवांनी चालुक्यांच्या मूर्ती जिंकल्या होत्या. तर राष्ट्रकुटांनी जिंकलेल्या राज्यांमधील राजाच्या मूर्ती स्वत:च्या राज्यात नेल्या होत्या. चोळांनी एखादे राज्य जिंकल्यानंतर तेथील राजाच्या मूर्तींना स्वत:च्या राज्यात नेऊन विजयाचे प्रतिक म्हणून ठेवले होते. त्या काळात मंदिरं ही सार्वभौमत्वाचे प्रतिक होती. त्यामुळे मंदिरांवर हल्ला करून सत्ता मिळवली जात होती.

मंदिरांची नासधूस करण्याचे किंवा पाडण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पण, ऐतिहासिक दृष्टीकोनातून व्यापकपणे याकडे पाहिले असता दिसून येते की, या घटना राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी होत होत्या. धर्मशास्त्राच्या दृष्टीकोनातून या घटनांकडे पाहिले जात नव्हते.
दिल्ली सल्तनतने हाच पॅटर्न पुढे सुरू ठेवला. उपलब्ध असलेल्या पुराव्यांमधून असे दिसून येते की, मंदिरांची नासधूस ही सर्वत्र किंवा ऐच्छिकपणे झालेली नाही. जेव्हा नवीन राज्य स्थापन केले जाते त्याचवेळी प्रामुख्याने मंदिरं पाडण्यात आल्याचे दिसून येते. पराभूत झालेल्या एखाद्या साम्राज्याच्या मंदिराला सर्वाधिक धोका असतो. कारण ते मंदिर त्या साम्राज्याचे एकेकाळी शक्तीस्थळ असते. ज्या मंदिरांना राजकीय महत्त्व कधीच प्राप्त झालेले नव्हते त्या मंदिरांना इतिहासात धक्काही लागलेला नाही, असे दिसून येते. मंदिर पाडणाऱ्याच एखाद्या शासकाने त्या मंदिरातील पुजाऱ्यांना किंवा संतांना संरक्षण दिल्याचे तसेच भारतातील इतर धार्मिक संस्थांमध्ये त्यांना संधी उपलब्ध करून दिल्याचे इतिहासात दिसून येते.

मुघल आणि मंदिर यांच्यातील संबंध कसा होता?
याची प्रचिती मुघल कालखंडातही आली. अकबराच्या काळात एकत्रितपणे वास्तव्यावर भर देण्यात आला होता. ब्रज भागात मिळालेल्या ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास इरफान हबीब व तारापदा मुखर्जी यांनी केला. त्यातून असे दिसून आले की, अकबराने मंदिरांसाठी जमिनी दिल्या होत्या. मंदिरांच्या संपत्तीचे रक्षण केले होते. तसेच शाही व्यवस्थेत महत्त्वाच्या धार्मिक संस्थांची स्थापना केली होती. वृंदावन मधील मंदिरांकडे मुघल कालखंडात विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यामुळे त्या मंदिरांची भरभराट झाली होती.
आपण निरपेक्ष आहोत, फक्त हेच दाखवून देण्यासाठी अकबराने असे केले नव्हते, तर त्यामागे त्याचा राजकीय उद्देशही होता. मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती असते. त्यांचा प्रभाव असतो व सामाजिक महत्त्व मंदिरांना असते. मंदिरांना महत्त्व देऊन अकबराने राजपूत शासक, व्यापारी समूह आणि स्थानिक प्रतिष्ठीत लोक यांच्याशी संबंध सुधारले होते.
जहांगीर व शाह जहान यांनी हे धोरण पुढे कायम ठेवले. परंतु, त्यांनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या राजांशी संबंधित मंदिरे पाडण्याचे आदेशही दिले होते. औरंगजेबाच्या कार्यकाळात हे प्रमाण अधिक वाढले. भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरं औरंगजेबाच्या कार्यकाळात पाडण्यात आली हे तथ्य कोणीही नाकारू शकत नाही. १६७० साली मथुरेतील केशव राय मंदिराची नासधूस आणि १६६९ साली वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचा विध्वंस औरंगजेबाने केला. दरम्यान, या कृती देखील राजकीय दृष्टीने विचार न केल्यास समजून घेता येऊ शकत नाहीत.
मथुरा भागात अराजकता माजली होती. जाट व सतनामी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केशव राय मंदिर पाडण्यात आले. राजकीयदृष्ट्या अशांत असलेल्या प्रदेशात पुन्हा एकदा राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने तिथे घडामोडी घडल्या होत्या. याचप्रमाणे, राजस्थानमधील मारवाड येथील राठोड राजवटीशी संबंधित मंदिरांना जसवंत सिंह यांच्या मृत्यूनंतर झालेल्या बंडाळीमुळे लक्ष्य करण्यात आले होते. जोपर्यंत राठोड हे मुघलांशी निष्ठा बाळगून होते तोपर्यंत त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. ज्यावेळी राज्याचे सार्वभौमत्व व वारशाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी मुघलांबरोबर राठोडांचे युद्ध झाले. वाराणसीतील प्रकरण देखील असेच होते. पूर्वीच्या मुघल शासकांनी वाराणसीतील मंदिरांना संरक्षण दिले होते, औरंगजेबाने सुरूवातीला अनेक धार्मिक संस्था स्थापन करण्यास परवानगी दिली होती. ज्यावेळी विश्वनाथ मंदिराशी संबंधित प्रभावी गट दारा शुकोह व इतर राजकीय विरोधकांशी संबंधित असल्याचा संशय औरंगजेबाला आला तेव्हा तिथे उपद्रव झाला.
याचा अर्थ औरंगजेबाच्या धोरणांमध्ये धर्माची भूमिका काहीच नव्हती असा होत नाही. अकबराच्या पूर्णपणे विरूद्ध, औरंगजेबाने स्वत:ला इस्लामिक कायद्यातील तत्वाने चालणारा शासक म्हणून दर्शवले होते. तसेच त्याच्या कृतीही इस्लामनुसार असल्याचे तो समजत होता. हे वगळले, तर संपूर्ण पॅटर्न असे दर्शवतो की, राजकीय गणिते केंद्रस्थानी होती. बंडखोर, राजद्रोही आणि सत्तेची प्रतिस्पर्धी केंद्रे यांच्याशी संबंधित मंदिरांना धोका अधिक होता. तर अनेक मंदिरांना संरक्षण देण्यात आले होते.
मध्ययुगीन भारतातील शासक मंदिरांकडे फक्त प्रार्थना स्थळ म्हणून पाहत नव्हते असा महत्त्वाचा धडा यातून मिळतो. ते मंदिरांकडे एक सत्ताकेंद्र म्हणून पाहत असत. मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात धनसंचय होत असे, त्यांचे जमिनींवर नियंत्रण असत. निष्ठेचे प्रतिक व एखाद्या राज्याचा वारसा म्हणून मंदिरांकडे पाहिले जात असत. या कारणांमुळे मंदिरांना आश्रयही देण्यात आला तसेच त्यांना लक्ष्यही करण्यात आल्याचे दिसून येते.
सईद अली नदीम रेझवी ( लेखक मुघल इतिहासाचे अभ्यासक असून अलिगढ मुस्लीम विद्यापीठात अध्यापन करतात. )
