scorecardresearch

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अमेरिकन बुली एक्सएल जातीच्या कुत्र्यांवर बंदी का घातली?

अमेरिकन एक्सएल जातीच्या कुत्र्यांचे वजन ६० किलो आणि उंची ५४ सेमीपर्यंत वाढते. एका प्रौढ व्यक्तीवर वर्चस्व गाजविण्याइतकी त्यांची ताकद असते. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ट्विटरवरून या जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालत असल्याची घोषणा केली.

Rishi Sunak bans American XL bully
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी धोकादायक असलेल्या अमेरिकन बुली एक्सएल या कुत्र्याच्या जातीवर बंदी घातली. (Photo – Wikimedia Commons/Reuters)

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शुक्रवारी (१५ सप्टेंबर) अमेरिकन बुली एक्सएल या कुत्र्यांच्या जातीवर बंदी घालत असल्याची घोषणा केली. मागच्या काही वर्षांत या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले असून एका मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळेच या वर्षअखेरीपर्यंत या कुत्र्यांवर ब्रिटनमध्ये पूर्णपणे बंदी घातली जाईल, अशी घोषणा सुनक यांनी केली. अमेरिकन बुली एक्सएल ही जात आता आपल्या समाजासाठी धोकादायक होत चालली असून सरकार त्यावर बंदी घालण्यासाठी पावले उचलत आहे. लोकांचे हल्ल्यापासून सरंक्षण करण्यासाठी बंदीचा निर्णय घेतला जात आहे, असे ते म्हणाले.

१९९१ साली युकेमध्ये धोकादायक कुत्रे कायदा (Dangerous Dogs Act) समंत झाला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी बुली एक्सएल या जातीवर बंदी घातली जात आहे. सदर कायदा इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड याठिकाणी लागू आहे.

अमेरिकन बुली एक्सएल म्हणजे काय?

अमेरिकन बुली या चार प्रकारच्या कुत्र्यांमधील सर्वात मोठी जात म्हणून बुली एक्सएलचा उल्लेख होतो. स्टँडर्ड, पॉकेट, क्लासिक आणि एक्सएल अशा अमेरिकन बुलीच्या चार जाती आहेत. अमेरिकन पिट बुल टेरियरसह इतर जातींमधून प्रजनन करून १९९० साली अमेरिकन बुली एक्सएल जात विकसित केल्याचे मानले जाते. १९९१ साली युकेमध्ये अमेरिकन पिट बुल टेरियरवर बंदी घालण्यात आलेली आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या प्रौढ व्यक्तीवर हावी होण्याइतपत बुली एक्सएल ताकदवर असतात. त्यांचे वजन ६० किलो आणि उंची ५३ सेमीपर्यंत वाढू शकते. तसेच त्यांची हाडे आणि स्नायू अतिशय मजबूत असतात.

हे वाचा >> विश्लेषण : पिटबुल जातीचे कुत्रे धोकादायक का असतात? जाणून घ्या आक्रमक होण्यामागची नेमकी कारणं

युकेमधील ‘बुली वॉच’ नावाचा गट बुली एक्सएलवर बंदी घालण्यासाठी सातत्याने मागणी करत आहे. २०१४ किंवा २०१५ च्या आसपास बुली एक्सएल ही जात युकेमध्ये आणली गेली आणि त्यानंतर त्यांच्या संख्येत वाढ होत गेल्याचे सांगण्यात येते. एक्सएल जातीची पिले हजारो पौडांना विकली जातात, असा अंदाज आहे.

गार्डियन वृत्त संकेतस्थळाच्या माहितीनुसार, युकेमधील ‘रॉयल केनल क्लब’ने या कुत्र्याच्या जातीला अधिकृत दर्जा दिलेला नाही. बुली एक्सएलची युकेमधील संख्या नेमकी किती? याचा निश्चित आकडा नसला तरी त्यांची संख्या हजारोंमध्ये असल्याचे म्हटले जाते.

अमेरिकन बुली एक्सएल धोकादायक आहे?

युकेमध्ये या विषयावर जोरदार चर्चा झडत आहे. बुली एक्सएलच्या हल्ल्यामध्ये अनेक उच्च पदस्थ व्यक्ती जखमी झाल्यामुळे याची जोरदार चर्चा झाली. ब्रिटनमधील एका शहरात नुकतेच दोन बुली एक्सएल कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान सुनक यांनी बंदी लादण्याची घोषणा केली. मागच्या आठवड्यात बर्मिंगहॅम शहरातील एका ११ वर्षीय मुलीवर अमेरिकन बुली एक्सएल जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. दोन लोकांनी सदर मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही या कुत्र्याने हल्ला केला, ज्यामुळे त्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

काही अहवालानुसार युकेमध्ये २०२२ साली १० कुत्र्यांच्या हल्ल्यापैकी सहा हल्ले बुली एक्सएल जातीच्या कुत्र्यांचे होते आणि यावर्षी सात हल्ल्यांपैकी तीन हल्ले एक्सएलमुळे झाले आहेत.

या विषयावर काम करणाऱ्या काही गटांनी सांगितले की, बुली एक्सएल ही जात स्वाभाविकपणे आक्रमक आहेच आणि त्याशिवाय या जातीचे इतर जातींशी संभाव्य प्रजनन घडवून आणल्यास ही आक्रमकता आणखी जास्त वाढलेली पाहायला मिळू शकते. या कुत्र्यांची शरीरयष्टी आणि ताकद पाहता, त्यांचा एक चावा किंवा हल्ला एखाद्या व्यक्तीला गंभीररित्या जखमी करू शकतो, अशी माहिती गार्डियनने दिली आहे.

ब्लू क्रॉस सारख्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे की, कुत्र्यांच्या जातीवरून एखादे अनुमान न काढता त्यांच्या सवयीवरून पारख करायला हवी. बुली एक्सएलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हल्ल्याच्या संख्येत वाढ झाल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. लोकप्रियतेमुळे बुली एक्सएलच्या पिलांचे मौल्यवान वस्तूमध्ये रूपांतर झाले आहे. ज्यामुळे बेजबाबदार प्रजनन, संगोपन आणि मालकी याचा एकत्रित परिणाम होऊन बुली एक्सएल कुत्र्यांमध्ये आक्रमकता वाढल्याचे दिसून येत आहे.

हे पहा >> Top Dangerous Dogs : हे जगातील सर्वात धोकादायक कुत्रे आहेत

युकेमध्ये इतर कोणत्या जातींवर बंदी आहे?

युकेमध्ये असलेल्या धोकादायक कुत्रे कायद्यानुसार जे कुत्रे धोकादायक आणि नियंत्रणाबाहेर असतात त्यांच्यावर निर्बंध लादले जातात. या कायद्याद्वारे आतापर्यंत चार कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पिट बुल टेरियर्स, जपानी टोसा, डोगो अर्जेंटिनोस आणि फिला ब्रासिलिरो या कुत्र्यांच्या जातीचा समावेश आहे.

या बंदीमुळे फायदा होतो?

द गार्डियनच्या अहवालानुसार, कुत्र्याच्या जातीवर निर्बंध घातल्यामुळे त्यांची संख्या कमी होईल, पण ते पूर्णपणे संपणार नाहीत. लंडन महानगर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, १९९१ साली धोकादायक कुत्रे कायद्याद्वारे पिटबुल जातीवर बंदी घालूनही २०१५-१६ साली म्हणजे कायद्याच्या २५ वर्षांनंतर शहरातील एकूण कुत्र्यांच्या हल्ल्यातील घटनांपैकी १९ टक्के हल्ले पिट बुल जातीपासून झाले होते.

द गार्डियनने ‘द रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऑफ ॲनिमल्स (RSPCA)’ या संस्थेच्या एका दाव्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, कुत्र्यांच्या काही जातींवर बंदी घालूनही १९९९ ते २०१९ या वीस वर्षांच्या कालावधीत कुत्र्यांच्या चाव्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या १५४ टक्क्यांनी वाढली आहे.

आणखी एक चिंतेची बाब अशी आहे की, एका जातीवर बंदी घातल्यानंतर त्याचप्रकारच्या इतर जातीची संख्या वाढू शकते. जसे की, पिट बुल टेरियर्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकन बुली एक्सएल ही जात विकसित करून त्याची संख्या वाढली होती.

आणखी वाचा >> Video: ११ वर्षीय चिमुकल्यावर पिटबूलचा हल्ला; चेहऱ्यावर पडले २०० टाके; अंगावर काटा आणणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

भारतात काय परिस्थिती आहे?

युकेप्रमाणे भारतात कुत्र्यांच्या जातीवर बंदी घालणारा कोणताही कायदा अस्तित्त्वात नाही. मागच्यावर्षी गुरुग्राम महानगरपालिकेने ११ परदेशी जातींवर बंदी घातली होती. अमेरिकन पिट बुल टेरियर्स, डोगो अर्जेंटिनो, रॉटव्हीलर, नेपोलिटन मास्टिफ, बोअरबोएल, प्रेसा कैनारियो, वुल्फ डॉग, अमेरिकन बुलडॉग, कॅन कॉर्सो आणि फिला ब्रासिलिरो या जातींचे कुत्रे पाळण्यास महानगरपालिकेने बंदी घातली होती.

एक महिन्यापूर्वी गाझियाबाद महानगरपालिकेने पिट बुल, रॉटव्हीलर आणि डोगो अर्जेंटिनो या तीन जातीचे कुत्रे पाळण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. गुरुग्राम आणि गाझियाबादमध्ये वरील जातीच्या कुत्र्यांकडून अनेक हल्ल्यांची नोंद झाल्यानंतर सदर बंदी निर्णय घेण्यात आले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 19:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×