विश्लेषण : भारतीय केळ्यांना मागणी का? | why there is huge demand for indian banana print exp scsg 91 | Loksatta

विश्लेषण : भारतीय केळ्यांना मागणी का?

देशातून होणाऱ्या केळ्यांच्या निर्यातीत राज्याचा वाटा कायमच पन्नास टक्क्यांहून अधिक राहिला आहे.

विश्लेषण : भारतीय केळ्यांना मागणी का?
जागतिक अन्न संघटनेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, केळी हे सर्व देशांमध्ये आवडीने आणि मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे फळ आहे. (फाइल फोटो सौजन्य – रॉयटर्स)

-दत्ता जाधव

जगाच्या कानाकोपऱ्यात केळी आणि केळ्यांवर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ चवीने आणि आवडीने खाल्ले जातात. भारत जगातील सर्वांत मोठा केळी उत्पादक देश असून, महाराष्ट्रात केळीचे सर्वाधिक उत्पादन होते. देशातून होणाऱ्या केळ्यांच्या निर्यातीत राज्याचा वाटा कायमच पन्नास टक्क्यांहून अधिक राहिला आहे. त्या विषयी…

जगभरात केळी का खाल्ली जातात ?

जागतिक अन्न संघटनेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, केळी हे सर्व देशांमध्ये आवडीने आणि मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे फळ आहे. त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, अ, ब, क ही जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे असतात. त्यामुळे केळी खाणे आरोग्यदायी आहे. जगभरात दरवर्षी सुमारे ५१ लाख हेक्टरवर केळीची लागवड होऊन सुमारे ११ कोटी ३२ लाख १२ हजार ४५२ टन केळीचे उत्पादन होते. आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडात प्रामुख्याने केळीचे उत्पादन होते. आशिया खंडात सरासरी ६.३० कोटी टन, अमेरिका खंडात २.९० कोटी टन आणि आफ्रिका खंडात २.१० कोटी टन केळींचे उत्पादन होते. 

केळींचे उत्पादन करणारे प्रमुख देश कोणते ?

भारतात जगातील सर्वाधिक ३ कोटी टन केळी उत्पादन होते. त्याखालोखाल चीनमध्ये १.४ कोटी टन, इंडोनेशियात ८० लाख टन, तर ब्राझील आणि इक्वेडोरमध्ये प्रत्येकी ७० लाख टन, तर फिलिपिन्स ६० लाख टन, ग्वाटेमाला ४५ लाख टन, मध्य आफ्रिकेतील अंगोलामध्ये ४० लाख टन, टांझानियात ३५ लाख टन केळीचे उत्पादन होते. भारतात एकूण सुमारे आठ लाख हेक्टरवर केळींची लागवड होऊन सुमारे ३ कोटी टन केळींचे उत्पादन होते. देशात केळी सर्व हंगामात आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम आदी राज्यांत केळींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यापैकी महाराष्ट्र आणि तमिळनाडूत सर्वाधिक क्षेत्र लागवडीखाली असते. 

केळीच्या जाती, लागवडीचे हंगाम कोणते?

जगभरात एक हजारांहून अधिक केळींच्या जाती आहे. त्यापैकी भारतात बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, लाल केळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरूपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमिशेल, पिसांग लिलीन, जायंट गव्हर्नर, कॅव्हेन्डीशी, ग्रॅन्ड नैन, राजापुरी, बनकेळ, भुरकेळ, मुधेली, राजेळी आदी जातींच्या केळींची लागवड भारतासह जगभरात होते. केळीच्या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलतो. हवामानाचा परिणाम केळीच्या वाढीवर, घड बाहेर पडण्यावर व केळी पक्व होण्यावर होतो. जळगाव जिल्हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्या सुरुवातीस सुरू होतो. या वेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या बागेस मृगबाग म्हणतात. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत होणाऱ्या लागवडीस कांदेबाग म्हणतात. जून – जुलै लागवडीपेक्षा फेब्रुवारीमध्ये केलेल्या लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळते. या लागवडीमुळे केळी १८ महिन्यांऐवजी १५ महिन्यांत काढणीयोग्य, पक्व होतात. 

जळगाव, सोलापूरची केळी उत्पादनात आघाडी?

देशात सुमारे आठ लाख हेक्टरवर केळींची लागवड होते, त्यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात साठ हजार हेक्टरवर केळींची लागवड केली जाते. रावेत आणि यावल हे दोन तालुके निर्यातक्षम केळींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, माढा आणि पंढरपूर तालुक्यांत सुमारे आठ हजार हेक्टरवर केळींची लागवड होते. देशातून होणाऱ्या केळी निर्यातीत राज्याचा वाटा सुमारे ६५ टक्के आहे, तर राज्यातून होणाऱ्या केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्याचा वाटा सरासरी ६० टक्के आहे. जळगावातील लागवड क्षेत्र आणि सोलापूरचे लागवड क्षेत्राची तुलना करतात कमी लागवड होऊनही सोलापुरातून होणारी निर्यात अधिक आहे. सोलापुरातील शेतकऱ्यांना जागेवर प्रतिकिलो २७ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. देशातून होणारी निर्यात प्रामुख्याने आखाती देशांना होते. 

केळी निर्यात का वाढली ?

राष्ट्रीय पातळीवर ‘अपेडा’च्या माध्यमातून केळीच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते. तर राज्याच्या पातळीवर पणन मंडळ, कृषी विभागाच्या वतीने शेतीमाल, फळांच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते. याशिवाय स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, खासगी व्यापारी आणि कंपन्यांच्या माध्यमातून निर्यात केली जाते. देशातून होणारी निर्यात प्रामुख्याने आखाती देशांना होते. आखाती देशांचे शेतीमाल, फळांच्या आयाती विषयीचे नियम युरोपिय देशांच्या तुलनेत शिथिल आहेत. त्याचा फायदा देशातील व्यापारी आणि शेतकऱ्यांना होताना दिसतो. सोलापूर आणि जळगावात स्थानिक पातळीवर निर्यातीसाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. त्यात सरकार, सहकारी संस्था आणि खासगी संस्था, कंपन्या आघाडीवर आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून केळींच्या निर्यातीत मोठ्या वेगाने वाढ होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : राज्यातील जमिनींच्या लाखो मोजण्या कशामुळे रखडल्या?

संबंधित बातम्या

“आधी कॅमेरा…”, पंतप्रधान मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करत अभिनेते प्रकाश राज यांचं खोचक ट्वीट!
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळी भीमशक्ती माझ्याबरोबर असल्याने…”
सात वर्षांपूर्वी खून झालेली मुलगी सापडली जिवंत; आरोपी अजूनही तुरुंगात; कुटुंबीयांची कोर्टात धाव!
Gujarat Election Exit Polls: गुजरातमध्ये ‘सातवी बार भाजपा सरकार’चा अंदाज! केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एका नव्या…”
विश्लेषण : बाईक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, कंपनी Rapido Drivers ची भरती कशी करते?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बाबा दुचाकीसाठी सासरचे लोकं मला…”, मृत्यूपुर्वी मुलीची वडिलांना साद
FIFA WC 2022: “मी घाबरलो होतो…” दुखापतीनंतर सावरलेल्या नेमारने शेअर केला वेदनादायी अनुभव
“…म्हणून तिची बाजू घेतलीच नाही” रोहित शिंदेने सांगितले रुचिराला बिग बॉसमध्ये पाठिंबा न देण्याबद्दलचे कारण
मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन तेवढ्यात…