अमेरिकेच्या माजी ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांना कर्करोगाची निदान झाल्याची बातमी समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या न्याय विभागातून बाहेर पडल्यानंतर त्या उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यादरम्यान त्यांना थायरॉईड कॅन्सरचे निदान झाल्याचे वृत्त काही अमेरिकन माध्यमांनी दिले. पाम बाँडी यांच्यावरील उपचारांबाबतची सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर थायरॉईड कॅन्सर म्हणजे नेमके काय आणि हा आजार महिलांनाच का होतोय, असा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला, त्याविषयी…

थायरॉईड कॅन्सर म्हणजे काय?

थायरॉईड कॅन्सर हा थायरॉईड ग्रंथीत सुरू होणारा कर्करोगाचा प्रकार आहे. ही ग्रंथी मानेच्या पुढील भागात असलेल्या कंठमणी खाली असते. शरीरातील चयापचय प्रक्रिया, हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे काम थायरॉईड ग्रंथीकडे असते. सामान्यतः बहुतांश लोकांमध्ये ही ग्रंथी बाहेरून दिसत नाही किंवा हाताला जाणवतही नाही. या ग्रंथीचा आकार फुलपाखरासारखा असतो आणि तिच्या उजवी आणि डावीकडे दोन भाग असतात. हे दोन्ही भाग ‘इस्थमस’ नावाच्या एका अरुंद ऊतींनी एकमेकांशी जोडलेले असतात.

थायरॉईड कॅन्सरचे किती प्रकार?

तज्ज्ञांच्या मते, थायरॉईड कर्करोगाचे अनेक प्रकार आढळतात आणि त्यातील डिफरेंशिएटेड थायरॉईड हा सर्वात घातक प्रकार मानला जाते. त्यामध्ये पॅपिलरी, फॉलिक्युलर आणि ऑन्कोसिटिक कार्सिनोमा यांचा समावेश होतो. त्याशिवाय मेड्युलरी थायरॉईड कॅन्सर
अ‍ॅनाप्लास्टिक थायरॉईड कॅन्सर हेदेखील कर्करोगाचे प्रकार आहेत. यापैकी पॅपिलरी थायरॉईड कॅन्सर हा सर्वाधिक सामान्य प्रकार मानला जातो. थायरॉईड कर्करोगाच्या दहा पैकी सुमारे आठ रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. त्यातही ‘फॉलिक्युलर व्हेरियंट’ हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा उपप्रकार मानला जातो. याशिवाय टॉल सेल, कॉलमिनर, इन्सुलर, क्लिअर सेल, ट्रॅबेक्युलर, हॉबनेल आणि डिफ्यूज स्क्लेरोसिंग हे पॅपिलरी कर्करोगाचे इतर उपप्रकार आहेत.

थायरॉईड कॅन्सरचा कोणता प्रकार घातक?

थायरॉईड कर्करोगाचे हे प्रकार फारसे आढळून येत नसले तरी ते रुग्णांच्या वेगाने वाढतात, त्यामुळे संबंधित रुग्णांवर अधिक तीव्र उपचारांची गरज भासू शकते. फॉलिक्युलर थायरॉईड कॅन्सर हा कर्करोगाचा प्रकार सुमारे दहा पैकी एका रुग्णामध्ये आढळतो. याशिवाय, ऑन्कोसाइटिक कर्करोग (पूर्वी हर्थल सेल कॅन्सर म्हणून ओळखला जाणारा) आणि मेड्युलरी थायरॉईड कर्करोग हे प्रकारही आढळून येतात. अ‍ॅनाप्लास्टिक थायरॉईड कॅन्सर हा सर्वात दुर्मिळ आणि उपचारासाठी सर्वात कठीण कर्करोगाचा प्रकार मानला जातो. थायरॉईड कर्करोग हा केवळ श्रीमंत देशांपुरता मर्यादित नसून मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो. संशोधनानुसार, गेल्या काही दशकांत या कर्करोगाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून त्यामध्ये महिलांमध्ये प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकेत थायरॉईड कॅन्सरचे वाढते प्रमाण

‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये अमेरिकेत आतापर्यंत थायरॉईड कर्करोगाची ४५ हजार २४० नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या आजाराचा धोका सरासरीने जवळपास तीन पटीने जास्त असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील थायरॉईड कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी १३ हजार २४० रुग्ण पुरुष असून ३२,००० रुग्ण महिला आहेत. मात्र, मृत्यूच्या बाबतीत पुरुष आणि महिलांचे प्रमाण तुलनेने जवळपास समान आहे. थायरॉईड कर्करोगामुळे आतापर्यंत दोन हजार ३२० जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक हजार १०० पुरुष आणि एक हजार २२o महिलांचा समावेश आहे. इतर बहुतांश कॅन्सरच्या तुलनेत थायरॉईड कर्करोगाचे निदान कमी वयातच होते. अमेरिकेत या आजाराचे निदान होणाऱ्या व्यक्तींचे सरासरी वय ५१ वर्षे आहे. तसेच, इतर कोणत्याही वांशिक गटाच्या तुलनेत कृष्णवर्णीय लोकांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी कमी आढळले आहे.

भारतात थायरॉईड कॅन्सरची स्थिती काय?

भारतात दरवर्षी एक लाख लोकांपैकी सुमारे ५.४ जणांना थायरॉईड कॅन्सरचे निदान होते. ‘इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, २०२५ मध्ये भारतात थायरॉईड कॅन्सरची सुमारे ३९ हजार प्रकरणे असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे पुरुषांमध्ये थायरॉईड कॅन्सरचे सर्वाधिक, तर महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रमाण आढळून आले आहे. २००५ ते २०१६ या कालावधीत तिरुवनंतपुरममध्ये थायरॉईड कॅन्सरच्या रुग्णसंख्येत दरवर्षी ९.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या शहरात महिलांमधील थायरॉईड कर्करोगाचे प्रमाण २००६ मध्ये प्रति एक लाख महिलांमागे ६.९ इतके होते, ते २०१२ मध्ये वाढून १३.३ वर पोहोचले. म्हणजेच, दशकभराच्या आत त्यात जवळपास ९३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तिरुवनंतपुरममधील थायरॉईड कर्करोगाचे प्रमाण भारतातील अनेक शहरांच्या तुलनेत चारपट जास्त असल्याचेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने स्थिर असून प्रति एक लाख महिलांमागे ०.४ ते ०.५ इतकेच असल्याचे आढळले आहे.

थायरॉईड कॅन्सरवरील उपचार आणि उपाय

थायरॉईड कर्करोगावर उपचार करण्यासाठी ‘शस्त्रक्रिया’ हा सर्वात सामान्य मार्ग आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान शल्यचिकित्सक संबंधित रुग्णाच्या शरीरातून थायरॉईड ग्रंथी काढून टाकतात, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘थायरॉईडेक्टॉमी’ असे म्हटले जाते. काही प्रकरणांमध्ये शल्यचिकित्सक थायरॉईडचा केवळ बाधित झालेला भागच काढून टाकतात, ज्याला ‘लोबेक्टॉमी’ म्हणतात. या प्रक्रियेदरम्यान, कर्करोगाचा प्रादुर्भाव झालेले लिम्फ नोड्स (लसिका गाठी) देखील काढून टाकले जाऊ शकतात. शस्त्रक्रियेशिवाय या आजारावर इतरही अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. त्यामध्ये रेडिओआयोडीन थेरपी हा उपचार रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर दिला जातो. त्याद्वारे रुग्णाच्या शरीरात किरणोत्सर्गी आयोडीनयुक्त गोळ्या किंवा द्रव पदार्थ सोडले जातात, जे थायरॉईडच्या पेशी शोषून घेण्यास मदत करतात. त्याशिवाय रेडिएशन थेरपी या उपचार पद्धतीत मशीनद्वारे रुग्णाच्या शरीरावर किरणोत्सर्ग सोडला जातो. शस्त्रक्रियेनंतर थायरॉईडच्या पेशी किंवा गाठी पुन्हा वाढू नयेत, यासाठी हार्मोन थेरपी दिली जाते. टार्गेटेड थेरपी ही थेरपी विशिष्ट जनुकीय बदल असलेल्या कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करते. अत्यंत आक्रमक किंवा गंभीर टप्प्यावरील कर्करोगावर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. थायरॉईड कर्करोगाच्या उपचारात किमोथेरपीचा वापर अत्यंत दुर्मिळ मानला जातो. मात्र, जेव्हा कर्करोग अत्यंत आक्रमक असतो आणि इतर उपचारांना प्रतिसाद देत नाही, तेव्हा याचा वापर केला जाऊ शकतो.

ट्रम्प यांच्या अनेक निकटवर्तीयांना कॅन्सर

विशेष बाब म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांमध्ये कर्करोगाचा सामना करणाऱ्या पाम बोंडी या एकमेव व्यक्ती नाहीत. ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात घशातील ट्युमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया केल्याचे उघड केले होते. त्यानंतर थायरॉईड कॅन्सरचीही शस्त्रक्रियाही त्यांच्यावर झाली होती. यावर्षी मार्च महिन्यात ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ सुझी वाईल्स यांनी स्वतःला स्तनांचा कर्करोग झाल्याचे जाहीर केले होते. दुसरीकडे, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबार्ड यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या पतीच्या अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या हाडांच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यादरम्यान पाम बाँडी यांची अमेरिकेच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ विषयक पॅनेलवर नियुक्ती करण्यात होती. त्यानंतर अचानक त्यांच्या आजारपणाची माहिती समोर आल्याने बाँडी यांचे समर्थक चिंतेत आहे.