डॉ. प्राची मोघे
Why one should read Upanishad in Modern Era: वैदिक वाङमयाचा अखेरचा भाग म्हणजे उपनिषद. म्हणून त्याला वेदांत असेही म्हणतात. दोनशेहून अधिक उपनिषदे आहेत त्यातील १०८ महत्त्वाची आहेत. आदी शंकराचार्यांनी दशोपनिषदें सर्वात महत्त्वाची असे मानून त्यावर टीका लिहिली आहे. दशोपनिषदें पुढीलप्रमाणे आहेत; त्यात बृहदारण्यक, छांदोग्य, तैत्तिरीय, ऐतरेय, केन, कठ, ईश , श्वेताश्वेतर, प्रश्न, मुंडक इत्यादींचा समावेश होतो.

उपनिषद् म्हणजे काय?

‘उपनिषद्’ हा शब्द सद् या धातूला उप आणि नि हीं उपपदें लागून तयार झाला आहे. सद् याचा अर्थ बसणें. उपनिषद् याचा अर्थ जवळ बसणें असा होतो. अत्यंत भक्तिभावानें गुरूजवळ बसणें असा या ‘उपनिषद्’ शब्दाचा अर्थ होतो. कठोपनिषदावरील आपल्या भाष्याच्या आरंभी उपनिषद् या शब्दांचे निरनिराळे अर्थ शंकराचार्यांनीं दिलेले आहेत. आचार्य म्हणतात कीं, उपनिषद् या शब्दांतील सद् या धातूचे विशरण, गति व अवसादन असे तीन अर्थ होतात.

उपनिषद् शब्दाचे अनेक अर्थ

विशरण म्हणजे विध्वंसन. जे मुमुक्षू लोक विषयापासून पराङ्मुख होऊन पारमार्थिक कल्याणाच्या प्राप्तीसाठीं उत्सुक असतात त्यांना ज्या विद्येमुळें अविद्येचा विध्वंस करतां येतो व पराविद्येची प्राप्ति होते त्या विद्येला उपनिषद् असें म्हणतात. अथवा सद् याचा दुसरा अर्थ‘गति’हा घेतला तर ज्या विद्येमुळें ब्रह्माचें ज्ञान होतें त्या विद्येला (ब्रह्मविद्येला) उपनिषद् असें म्हणतात. किंवा सद् धातूचा‘अवसादन’ हा अर्थ घेतल्यास जन्म, जरा, मृत्यु या तापापासून ज्या विद्येमुळें निवारण होतें त्या विद्येलाहि उपनिषद् म्हणता येईल. अशा रीतीनें शंकराचार्यानीं उपनिषद् या शब्दाचा अर्थ‘अविद्याविध्वंसिनी ब्रह्मविद्या’ असा केला आहे. अशा रीतीनें उपनिषदांचा अर्थ ब्रह्मविद्या असा झाल्यानंतर ज्या ग्रंथांमध्यें अगर ज्या मंत्रांमध्यें ही ब्रह्मविद्या सांगितलेली असते त्या ग्रंथांनाही उपनिषद असें नांव प्राप्त होते. उप +नि+सद् अर्थात गुरूच्या जवळ जाऊन बसणे आणि ज्ञान मिळवणे.

सहज-सोप्या भाषेत परमार्थाचा मार्ग सांगणारे ज्ञान

उपनिषद म्हणजे गुप्त ज्ञान ( छांदोग्य उप. १. . ०;१. ३.;८..;४.. ;५..-४) ; गुह्य आदेश (बृहदारण्यक उप. ३.५.२) आणि परा गुह्य (कौ. उप. ३. १७,श्वेता. उप.६. २२ ). बृहदारण्यक उपनिषदात असे म्हटले आहे की उपनिषद हे सत्याचे सत्य स्वरूप आहे – ‘सत्यस्य सत्य’. याचाच अर्थ असा की, उपनिषदे म्हणजे परम सत्य. व्यक्तीकडून परम सत्याकडे जाण्याचा मार्ग. जीवाची शिवाची गाठ घालून परमेष्टीत विलीन होण्याचा मार्ग म्हणजे उपनिषद. उपनिषदांत गुरु-शिष्याच्या संवादातून, रूपकातून, छोट्या कथांमधून परमार्थाचा हा अवघड सोपान अगदी सहजरित्या उलगडला आहे.

उपनिषदांची विभागणी

उपनिषदांची साधारण विभागणी आढळते ती अशी – (१) प्रमुख उपनिषदे – अर्थात् परतत्त्वदर्षी उपनिषदे – ह्यांना दशोपनिषदे असेंही म्हणतात. यांत प्रामुख्याने ‘ब्रह्म’ विषयक विवेचन आढळते. व्यासांनी ब्रह्मसूत्रांमध्ये फक्त दश उपनिषदांचाच उल्लेख केलेला आढळतो तसेच आद्य शंकराचार्यांनी ह्या दहाही उपनिषदांवर भाष्य केलेले असल्यामुळे ह्या दश उपनिषदांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. उर्वरित ९८ उपनिषदांचे वर्गीकरण असे – (२) १४ वैष्णव उपनिषदे – राम, कृष्ण इ. विष्णू अवतारांशी संबंधित (३) १५ शैव उपनिषदे (४) ८ शाक्त उपनिषदे (५) २४ सामान्य उपनिषदे. (६) १७ संन्यास उपनिषदे आणि (७) २० योगोपनिषदे वैष्णव-शैव-शाक्त या दैवोपनिषदांच्या नांवावरूनच कल्पना करूं शकतो कीं परमेश्वराच्या त्या त्या सगुणरूपासंबंधी ही उपनिषदें आहेत. सामान्य उपनिषदांमध्ये सर्व पंथ वा संप्रदायांसाठी उपयोगी विवेचन आढळते. संन्यास उपनिषदांमध्ये संन्यास ह्या चतुर्थ आश्रमाबद्दल विवेचन आढळते. योगोपनिषदे अर्थात् ’योग’ विषयक. एका कथेनुसार उपलब्ध असलेल्या २२०-२२५ उपनिषदांपैकीं प्रभु रामचंद्रांनी हनुमंतास १०८ उपनिषदांचा अभ्यास करण्याचे सुचविले होते.

उपनिषदांची कालनिश्चिती

उपनिषदांची कालनिश्चिती करण्याबाबत आधुनिक विद्वानांचे असे मत आहे की, यांची रचना ही दोन काळात झाली. बृहदारण्यक ,छांदोग्य , तैत्तिरीय ,ऐतरेय आणि कौषीतकी ही उपनिषदे प्रारंभिक काळातील असून त्यांचा कालावधी ७०० ते ५०० इ.स.पूर्व असा आहे ही उपनिषदे प्रामुख्याने गद्य आहेत. दुसऱ्या कालखंडातील उपनिषदे म्हणजे केन, कठ , ईश , श्वेताश्वेतर ,प्रश्न, मुंडक, मांडूक्य आणि मैत्री ही उपनिषदे ३०० ते १०० इ.स.पूर्व या काळात रचली गेली. ती बहुंशी छंदोबद्ध आहेत. लघु उपनिषदे आहेत जसे योगोपनिषद, संन्यास ,शैव ,वैष्णव इ. ही सर्व उपनिषदे इ.स. २ ते १५ व्या शतकापर्यंत रचली गेली आहेत.

उपनिषदांचा विषय

उपनिषदांचा प्रतिपाद्य विषय तत्त्वज्ञान तर आहेच पण सृष्टीची निर्मितीचे मिथक, कर्मकांडाचे विश्लेषण, गुरु-शिष्य परंपरा, जादूटोणा, कथा, गुरु, शिष्य, राजा संवाद असे विविधांगी विषय आहेत. उपनिषदांचा मुख्य विषय ‘ब्रह्मविद्या’ आहे. विश्वातील अंतिम सत्य म्हणजे ‘ब्रह्म’ आणि मानवाच्या शरीरात असणारे चैतन्य म्हणजे ‘आत्मा’ होय. उपनिषदे सांगतात की, आत्मा आणि ब्रह्म हे दोन वेगवेगळे नसून एकच आहेत. ‘तत्त्वमसि’ (ते तूच आहेस) आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ (मी ब्रह्म आहे) यांसारखी महावाक्ये याच अद्वैत तत्त्वाची ग्वाही देतात. जेव्हा माणसाला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होते, तेव्हा तो सर्व बंधनातून मुक्त होतो, असे उपनिषदांचे सांगणे आहे.

  • उपनिषदांचे सार खालील चार महावाक्यांमध्ये साठवलेले आहे:
  • 1.प्रज्ञानं ब्रह्म: चैतन्य हेच ब्रह्म आहे. (ऐतरेय उपनिषद)
  • 2.अहं ब्रह्मास्मि: मी ब्रह्म आहे. (बृहदारण्यक उपनिषद)
  • 3.तत्त्वमसि: ते (ब्रह्म) तूच आहेस. (छांदोग्य उपनिषद)
  • 4.अयमात्मा ब्रह्म: हा आत्माच ब्रह्म आहे. (मांडुक्य उपनिषद)

उपनिषदात भारतीय षडदर्शनाचे बीज सापडते. खरं तर दर्शनाच्या ग्रंथात उपनिषदांचे संदर्भ जास्त आढळत नाहीत पण जी तत्त्वे या दर्शनांतून विकसित झाली त्यांची चर्चा उपनिषदांत सापडते. आजच्या तणावपूर्ण जीवनातही उपनिषदांची शिकवण अत्यंत प्रासंगिक आहे. बाह्य जगात आनंद शोधण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावण्याचा मार्ग उपनिषदे दाखवतात. उपनिषदे आपल्याला ‘स्व’ कडे वळायला शिकवतात. आपण बाह्य प्रगती केलेली असली तरी आंतरिक सुख आणि शांती गमावून बसलो आहोत म्हणूनच प्राप्त परिस्थितीत उपनिषदांमधील तत्त्वज्ञान महत्त्वाचे ठरते.