विमानाने प्रवास करताना बहुतांश प्रवाशांच्या मनात तिथे मिळणाऱ्या जेवणाचा विचार सुरू असतो. चिकन बिर्याणी घ्यायची की पास्ता, नेहमीचे जेवण घ्यायचे की खास जेवण, याभोवतीच त्यांची चर्चा फिरत असते. विमानातील जेवणाचे मर्यादित पर्याय पाहता कॉकपिटमध्ये बसलेले दोन्ही वैमानिकही हेच अन्न खात असतील असा अनेकांचा समज असतो. मात्र, प्रत्यक्षात तसे नसते. एकाच विमानातील दोन वैमानिकांना कधीही एकच प्रकारचे जेवण दिले जात नाही. तसेच दोन्ही वैमानिक एकाच वेळेला जेवणही करत नाही. यामागचे नेमके कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ…
दोन्ही वैमानिक कधीही एकच जेवण का करत नाहीत?
गेल्या आठवड्यात दुबई येथून तेल अवीवला जाणाऱ्या प्लायदुबईचे विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे अपहरणकर्त्याचा हा डाव फसला. या घटनेनंतर विमान प्रवास आणि त्याच्या अनेक पैलुंबाबत समाजमाध्यमांवर विविध प्रश्न विचारला जात आहे. त्यामध्ये एकाच विमानात ड्युटीवर असलेले दोन्ही वैमानिक कधीही एकसारखे जेवण का करत नाहीत? या प्रश्नाचाही समावेश आहे. यादरम्यान एका विमानात कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्याने यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानाचे पूर्ण नियंत्रण हे दोन्ही वैमानिकांच्या हातात असते. उड्डाणादरम्यान त्यांना कोणतीही वैद्यकीय समस्या निर्माण होऊ नये म्हणून विमान कंपन्यांकडून त्यांची खास काळजी घेतली जाते.
दोन्ही वैमानिकांनी एकच जेवण करणे कसे धोक्याचे?
विमानातील अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना तशा दुर्मीळ असल्या, तरी दोन्ही वैमानिकांनी एकच अन्न खाल्ल्यास त्याचा एकाच वेळी परिणाम होण्याचा धोका असतो. समजा, दोन्ही वैमानिकांनी दूषित अन्न खाल्ले आणि त्यामुळे ते एकाच वेळी आजारी पडले, तर विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे बहुतांश एअरलाइन्स कंपन्या आपल्या वैमानिकांना वेगवेगळे जेवण देण्याची काळजी घेतात. उड्डाणादरम्यान एखाद्या वैमानिकाची अचानक तब्येत बिघडल्यास दुसरा वैमानिक सुरक्षितपणे परिस्थिती हाताळण्यास सक्षम राहायला हवा, असा त्यामागचा मुख्य उद्देश असतो, असेही विमान कंपनीत काम करणाऱ्या त्या वरिष्ठ कर्मचाऱ्याने सांगितले.
दोन्ही वैमानिक एकाच वेळी जेवणही का करत नाहीत?
विशेषतः लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये दोन्ही वैमानिकांच्या जेवणाची वेळही ठरवून दिलेली असते. जर पहिल्या वैमानिकाला जेवल्यानंतर लगेच अस्वस्थ वाटायला लागल्यास दुसरा वैमानिकाला ते अन्न खाणे टाळता येऊ शकते. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळू शकतो. विशेष म्हणजे, वैमानिकांनी वेगवेगळे जेवण घेणे हा जगभरातील विमान वाहतूक प्राधिकरणांनी लागू केलेला कठोर कायदेशीर नियम नाही. बहुतांश विमान कंपन्यांच्या अंतर्गत सुरक्षा कार्यपद्धतीचा हा एक भाग आहे. संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने हा उपाय अतिशय सोयीचा आणि सुरक्षित वाटल्याने अनेक एअरलाइन्स कंपन्यांनी स्वतःच्या नियमावलीत याचा समावेश केला आहे.
विमानातील इतर कर्मचाऱ्यांसाठी हा नियम का नसतो?
वैमानिकांसाठी जेवणाचा एवढा कडक नियम असताना विमानातील इतर कर्मचाऱ्यांसाठी असा कोणताही नियम का नसतो, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो. याचे थेट उत्तर विमानातील कर्मचाऱ्यांच्या संख्येशी जोडलेले आहे. विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच अनेक केबिन क्रू सदस्य उपस्थित असतात. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली तरी इतर सहकारी सहजपणे जबाबदारी सांभाळू शकतात. मात्र, विमानातील कॉकपिटमध्ये परिस्थिती वेगळी असते. तिथे फक्त दोन वैमानिक असतात. त्यामुळे दोन्ही वैमानिक एकाच वेळी आजारी पडणे ही विमानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब ठरू शकते. म्हणूनच दोन्ही वैमानिकांना एकाच वेळी आजारी पडण्याची शक्यता टाळण्यासाठी त्यांना वेगवेगळे जेवण दिले जाते.
वैमानिकांना वेगवेगळे जेवण देण्याची पद्धत कधी सुरू झाली?
वैमानिकांना वेगवेगळे जेवण देण्याची ही पद्धत अचानक सुरू झालेली नाही. विमान वाहतुकीच्या इतिहासात दूषित अन्नामुळे एकाच उड्डाणातील अनेक प्रवासी आणि क्रू सदस्य आजारी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. १९७० च्या दशकातील एका प्रसिद्ध घटनेत खराब जेवणामुळे विमानातील अनेक लोक एकाच वेळी आजारी पडले होते. या घटनेनंतरच वैमानिकांच्या जेवणाच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर नियम करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली. तेव्हापासून, विमानातील कोणत्याही एका चुकीमुळे किंवा समस्येमुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प होऊ नये यासाठी विमान कंपन्या अतिरिक्त खबरदारी घेतात. अगदी जेवणासारख्या मूलभूत बाबीमध्येही ही दक्षता बाळगली जाते.
दोन्ही वैमानिकांचे जेवणात प्रत्यक्षात काय असते?
वैमानिकांना सहसा विशेष तयार केलेले दिले जाते. काही वेळा हे जेवण प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणापेक्षा वेगळे असते. अनेकदा वैमानिकांसाठीचे जेवण स्वतंत्र बॅचमध्ये तयार केले जाते. मात्र, याबाबतची पद्धत संबंधित विमान कंपनीच्या नियमांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, एका वैमानिकाला शाकाहारी जेवण दिले जाऊ शकते, तर दुसऱ्याला चिकन किंवा मासे असलेले जेवण दिले जाऊ शकते. तसेच हे दोन्ही पर्याय प्रवाशांना मिळणाऱ्या जेवणापेक्षाही वेगळे असू शकतात. हा कोणत्याही राजेशाही थाटाचा किंवा सुविधांचा भाग नसून, केवळ विमान सुरक्षेचा आणि नियमावलीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे विमान कंपन्यांचे म्हणणे आहे.
