परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. गेल्या दोन दशकांमध्ये परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, आता ब्रिटनमधील काही विद्यापीठांनी भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाच्या ऑफर्स मागे घेण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटन सरकारने व्हिसाचे नियम अधिकच कडक केल्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे. या निर्णयामुळे परदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील विद्यापीठांनी इतका कठोर निर्णय का घेतला? ब्रिटन सरकारने व्हिसाबाबत कोणते बदल केले? या निर्णयाचा भारतीय विद्यार्थ्यांवर किती परिणाम होऊ शकतो? त्याविषयीचा हा आढावा…
विद्यापीठे प्रवेशाच्या ऑफर्स का मागे घेत आहेत?
फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार, ब्रिटन सरकारने जून २०२६ पासून ‘बेसिक कम्प्लायन्स असेसमेंट’ (BCA) हा नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारले जाण्याचे प्रमाण विद्यापीठांना पाच टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा १० टक्के होती. त्यामुळे आता विद्यापीठांवर नियमांचे पालन करण्यासाठी अधिक दबाव आहे. नव्या नियमानुसार व्हिसा अर्ज नाकारले जाण्याचे प्रमाण ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास विद्यापीठांवर कारवाई होऊ शकते. नियमांचे पालन न केल्यास परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आवश्यक असलेला प्रायोजकत्वाचा परवाना (Student Sponsor Licence) रद्द केला जाऊ शकतो. हा परवाना रद्द झाल्यास विद्यापीठांना विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रायोजकत्व देता येणार नाही. त्यामुळे परवाना गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी तेथील काही विद्यापीठांनी भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाच्या ऑफर्स मागे घेण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
व्हिसाबाबत ब्रिटन सरकारची नेमकी योजना काय?
ब्रिटन सरकारला परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारले जाण्याचे प्रमाण कमी करायचे आहे. त्यामुळे नव्या नियमांनुसार ठरवून दिलेली मर्यादा ओलांडली जाऊ नये यासाठी काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाच्या ऑफर्स मागे घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे, अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत विद्यापीठांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी व्हिसाचा अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तेथील विद्यापीठाकडून प्रवेशाची ऑफर मिळणे आवश्यक असते. मात्र, विद्यापीठाने ही ऑफर मागे घेतल्यास विद्यार्थ्याचा व्हिसा अर्जही मागे घेतला जाऊ शकतो. फायनान्शियल टाइम्सने ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत ब्रिटनच्या विद्यार्थी व्हिसासाठी केलेल्या एकूण अर्जांपैकी १०.५ टक्के अर्ज मागे घेण्यात आल्याचे दिसून येते. २०२५ मध्ये याच कालावधीत हे प्रमाण २.३ टक्के होते. तर २०२३ मध्ये ते केवळ ०.४ टक्के होते. यावरून व्हिसाचे अर्ज मागे घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे समजते.
पाकिस्तानी-बांगलादेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
आकडेवारीनुसार पाकिस्तानी विद्यार्थ्यांकडून व्हिसा अर्ज मागे घेण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत ४०.९ टक्के पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी आपले व्हिसा अर्ज मागे घेतले होते. २०२५ मध्ये याच कालावधीत हे प्रमाण केवळ तीन टक्के होते. म्हणजेच, एका वर्षात पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या मागे घेतलेल्या अर्जांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीमुळे ब्रिटनमधील काही विद्यापीठांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. यंदा सुमारे १५ विद्यापीठांनी पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे पूर्णपणे थांबवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, बांगलादेश आणि नायजेरियातील विद्यार्थ्यांकडून व्हिसा अर्ज मागे घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. बांगलादेशी विद्यार्थ्यांचे अर्ज मागे घेण्याचे प्रमाण ७.१ टक्क्यांवरून २३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर नायजेरियातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे प्रमाण ४.५ टक्क्यांवरून २२.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
भारतीय विद्यार्थ्यांवर नेमका काय परिणाम होणार?
ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत सध्या फार गंभीर परिस्थिती नसली, तरी व्हिसा अर्जांच्या आकडेवारीत वाढलेले प्रमाण लक्षात घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतीय विद्यार्थ्यांचे १.२ टक्के व्हिसा अर्ज मागे घेण्यात आले होते. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत हे प्रमाण वाढून ५.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, या आकडेवारीचा संबंध व्हिसा नाकारण्याशी नसून मागे घेतलेल्या अर्जांशी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या बदलामुळे ब्रिटनमधील विद्यापीठे भारतीय विद्यार्थ्यांच्या अर्जांची अधिक काळजीपूर्वक तपासणी करू शकतात. विशेषतः ज्या विद्यापीठांमध्ये व्हिसा नाकारण्याचे प्रमाण ठरवून दिलेल्या मर्यादेच्या जवळ आहे, तिथे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अधिक काटेकोर छाननी होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा अर्थ भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आली आहे, असा नाही. भारतीय विद्यार्थी यापुढेही ब्रिटनच्या विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करू शकतात.
यादरम्यान व्हिसा नाकारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर २०२५ च्या अखेरीस काही विद्यापीठांनी विशिष्ट देशांतील विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाच्या ऑफर्स मागे घेण्यास सुरुवात केली होती, असे ब्रिटनमधील ईस्ट अँग्लिया विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्हन मॅकग्वायर यांनी फायनान्शियल टाइम्सला सांगितले. दुसरीकडे ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल, असे ब्रिटनचे स्थलांतर आणि नागरिकत्व मंत्री माइक टॅप यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, विद्यार्थी व्हिसाचा वापर शिक्षणाऐवजी आश्रय मिळवण्यासाठी किंवा बेकायदा नोकरी करण्यासाठी होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले आहे.
