इराणने दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे अमेरिका आज रात्री इराणवर पुन्हा हल्ला करेल, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (८ जुलै) इराणला दिला. त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यावसायिक तेलवाहू जहाजांवर इराणने मंगळवारी (७ जुलै) हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने इराणवर जोरदार हवाई हल्ला केला. ८० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी झालेला सामंजस्य करार संपल्याची घोषणा केली. त्यामुळे पश्चिम आशियात अमेरिका-इराण यांच्यातील तणाव विकोपाला पोहोचला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर हल्ला करून इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असा आरोप ट्रम्प यांनी टर्कीत सुरू असलेल्या ‘नाटो’ परिषदेत केला. इराणच्या नेतृत्वाला त्यांनी खोटे, फसवणूक करणारे आणि कमकुवत म्हटले आहे. इराणशी आपल्याला कोणतीही चर्चा करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणशी झालेल्या कराराच्या भवितव्याबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले, मला वाटतं आता तो संपलाय. इराण आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरलाय. इराणशी वाटाघाटी करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.

अमेरिकेने इराणवर ताजा हल्ला का केला?

इराणवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकन लष्कराने बुधवारी (८ जुलै) सकाळी ‘एक्स’वर दिली. “आंतरराष्ट्रीय समुद्रातून जाणाऱ्या तीन व्यावसायिक जहाजांवरील निष्पाप खलाशांवर इराणने हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. इराणने दाखवलेली आक्रमकता घातक असून त्यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे”, असे अमेरिकन लष्कराच्या सेंटकॉमने म्हटले आहे.

इराणने मंगळवारी (७ जुलै) तीन तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. युकेच्या मरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने या हल्ल्यांबाबत माहिती दिली. ओमानच्या किनारपट्टीजवळून जाणाऱ्या नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या जहाजाला हल्ल्यानंतर आग लागली होती. इराणी वृत्तसंस्थांनी या हल्ल्याची माहिती दिली. परंतु, त्यांनी हल्ल्याची जबाबदारी इराणने स्वीकारली असल्याचे म्हटले नाही. दरम्यान, इतर दोन जहाजांचेही हल्ल्यात मोठे नुकसान झाले. परंतु, ती जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडली.

तिन्ही जहाज ओमानच्या जवळील समुद्रातून मार्गक्रमण करत होते. कतार व सौदी अरेबिया या देशांनी इराणचा निषेध केला. तर ओमानने या हल्ल्यासाठी सर्वस्वी इराण जबाबदार असल्याचे म्हटले. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, इराणने सौदी अरेबियाच्या ‘वादयान’ या जहाजाला लक्ष्य केले. या जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली होती. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय समुद्रातील सुरक्षेला धोका असून यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यावर इराणची प्रतिक्रिया काय?

अमेरिकेच्या हल्ल्यांचा इराणने निषेध केला. “इराणचे सशस्त्र सैन्य अमेरिकेच्या या आक्रमकपणाला आणि दहशतवादी कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देईल”, असा इशारा इराणच्या टॉप जॉइंट मिलिटरी कमांड, खतम-अल-अनबियाने दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात कोणताही हस्तक्षेप सहन करणार नाही, असा इशाराही इराणने दिला. अमेरिकेने इस्लामाबादमध्ये झालेल्या सामंजस्य करारातील कलमांचे उल्लंघन केल्याचे इराणचे उपपरराष्ट्र मंत्री घरीबाबादी म्हणाले. “अमेरिकेने तोडलेल्या कराराचे गंभीर परिणाम होतील. इराणच्या राष्ट्रीय हितासाठी व संरक्षणासाठी आम्ही निर्णायक प्रत्युत्तर देऊ”, असा इशारा घरीबाबादी यांनी दिला.

अमेरिका – इराण वाटाघाटीत सहभागी इराणचे नेते मोहम्मद बाघेर गलिबाफ यांनीही अमेरिकेने कराराचे उल्लंघन केल्याचे म्हटले. होर्मुझ सामुद्रधुनीतील इराणची व्यवस्था बिघडवणे, आणखी हल्ले करण्याच्या सतत धमक्या देणे, पुन्हा इराणच्या कच्च्या तेलावर निर्बंध लादणे, दक्षिण इराण व लेबनॉनवर सतत हल्ले करणे यामुळे अमेरिकेने कराराचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचे गलिबाफ म्हणाले. दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने बहारिन व कुवैतवर हल्ले केले आहेत.

इराणवर अमेरिका पुन्हा आर्थिक निर्बंध लादणार?

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या वित्त विभागाने इराणवर निर्बंध पुन्हा लादणार असल्याची घोषणा केली. जून महिन्यात इराणला कच्चे तेल विकण्याचा परवाना अमेरिकेने दिला होता. इराणच्या कच्चे तेल विक्रीवर अमेरिकेने निर्बंध लादले होते. ते हटवण्यात आले होते. परंतु, आता ते पुन्हा लादले जाणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन इराणने दिले होते. हे आश्वासन इराणने तोडल्याने अमेरिका आता इराणवर पुन्हा निर्बंध लादणार आहे. १७ जुलैपासून हे निर्बंध लागू होतील. अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळेच इराणची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. इराणचा निम्म्याहून अधिक महसूल कच्च्या तेलाच्या विक्रीतून येतो. त्यावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमेरिका – इराण शस्त्रसंधी धोक्यात आली आहे का?

अमेरिका व इराण यांना संघर्ष थांबवण्याचे आवाहन अनेक देशांनी केले आहे, अशी माहिती सीएनएन वृत्तसंस्थेने दिली. मध्य पूर्वेचा अभ्यास करणारे व जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील सीना अझोदी ‘अल झजीरा’ या वृत्तसंस्थेला म्हणाले, “सामंजस्य करार हा शस्त्रसंधीचा करार आहे. तो शांतता करार नाही. जोपर्यंत अंतिम करार होत नाही, तोपर्यंत अमेरिका व इराण यांच्यात असे खटके उडताना दिसतील.” दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी वाटाघाटी करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असून आता सामंजस्य करार संपला असल्याचे म्हटले आहे.