अन्वी कामदार या इन्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा कुंभे येथील धबधब्या जवळ रिल करत असताना, तीनशे फूट दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर कुंभे परिसरातील वर्षा सहलींवर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर पोलादपूर, खालापूर आणि कर्जत मधील पर्यटनस्थळे बंद झाली. ती का, या विषयाचा आढावा… रायगड जिल्ह्यातील वर्षा पर्यटन स्थळे… वर्षा पर्यटनासाठी रायगड जिल्हा हा पर्यटकांच्या विशेष पसंतीचा समजला जातो. कर्जत, माणगाव, महाड, पोलादपूर, रोहा तालुके वर्षा सहलींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दर शनिवार-रविवारी धबधबे आणि धरणामधील पाण्यात मनसोक्त भिजण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत असतात. कर्जतमधील पेब किल्ला, इरशाळगड, माणिक गड, कोथळी गड, सोलनपाडा धरण, सागरगड, ताम्हाणी घाट, देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट, कुंभे धबधबा आणि परिसर, कोथेरी धबधबा, रायगड किल्ला, मोरझात धबधबा आणि कुडपण ही प्रमुख वर्षा पर्यटनस्थळे आहेत. पण गेल्या काही वर्षात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अनियंत्रित पद्धतीने वाढत चालली आहे. त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न आणि दुर्घटना यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. अन्वी कामदारचा मृत्यू कसा झाला? प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार ही तिच्या सहा सहकाऱ्यांसमवेत मागणाव तालुक्यातील कुंभे येथे वर्षा सहलीसाठी आली होती. कुभे धबधब्याच्या शेजारी असलेल्या कड्यावर रिल करत असतांना तिचा तोल गेला आणि ती ३०० फूट दरीत कोसळली. बचाव पथकाने जखमी झालेल्या अन्वीला खोल दरीतून दोरीला स्ट्रेचर बांधून बाहेर काढले. तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला होता. स्थानिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करत कड्यावर धोकादायक ठिकाणी जाणे अन्वीसाठी जीवघेणे ठरले. हेही वाचा >>>राहुल गांधींकडून सद्य राजकारणाला चक्रव्यूहाची उपमा; काय आहे महाभारतातील चक्रव्यूह नि अभिमन्यूचा पराक्रम? या घटनेचा परिणाम काय झाला? अन्वी कामदारच्या दुर्घटनेनंतर माणगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी कुंभे परिसरातील वर्षा पर्यटन स्थळांवर बंदी आदेश लागू केले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये बंदी घालण्यात आली. पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे माणगाव तालुक्यातील कुंभे, देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट ही स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. या ठिकाणी पर्यटन पूरक व्यवसाय करणाऱ्यांचे रोजगार अडचणीत आले. जिल्हा प्रशासनाची प्रतिबंधात्मक पावले… पावसाळ्याच्या सुरवातीला जिल्हा प्रशासनाने वर्षा पर्यटन केंद्रे खुली ठेवण्याचे धोरण स्वीकारले होते. स्थानिकांचे रोजगार अडचणीत येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. मात्र अलिबाग, खालापूर, माणगाव, रोहा तालुक्यातील वर्षासहलीसाठी आलेल्या काही पर्यटकांचे मृत्यू झाले. यानंतर प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली. कर्जत, खालापूर, माणगाव, रोहा आणि पोलादपूर तालुक्यात प्रशासनाने पर्यटकांवर बंदी घालण्याचे आदेश काढले. हेही वाचा >>>विश्लेषण: महिलांच्या विभागात ‘पुरुष’ बॉक्सर? ऑलिम्पिकमध्ये या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काय आहे? बंदी घालण्यामागची कारणे कोणती? पर्यटकांना स्थानिक भौगोलिक परिस्थितीची माहिती नसते. पाण्याच्या प्रवाहांचा अंदाज नसतो. स्थानिकांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. अचानक पाऊस वाढला तर धबधब्यांतील पाण्याचा प्रवाह वाढतो आणि खाली असलेले पर्यटक वाहून जाण्याचा धोका असतो याची जाणीव पर्यटकांना नसते. वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटक मद्यप्राशन करून धबधब्याखाली जातात. मद्यप्राशन करून वाहने चालवतात. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केले जाते. महिलांशी असभ्य वर्तन केले जाते. धोकादायक ठिकाणी चढण्याचा प्रयत्न केला जातो. तर धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो सेशन केले जाते. पाण्याच्या खोलीचा बरेचदा पर्यटकांना अंदाज नसतो. यावर्षीचे आकडे काय सांगतात? या वर्षी मे महिन्यान खालापूर तालुक्यातील जांभिवली गावात दोन चिमुकल्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. जुन महिन्याच्या सुरवातीला उरण तालक्यातील पिरकोन येथे दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर आळंदी येथील एक पर्यटक अलिबाग येथे बुडाला २१ जुनला रिझवी महाविद्यालयातील ४ पर्यटक खालापूर येथील धरणात बुडाले. २२ जुनला महाड येथे दोघांचा बुडून मृत्यू झाला. २३ जूनला अलिबाग मुनवली येथे दोन मुले दगावली. जुलै महिन्यात रायगड परिसरात धबधब्याखाली भिजण्यासाठी गेलेला तरुण प्रवाहात वाहून गेला. कुंभे येथे अन्वी कामदार ही तरुणी दरीत पडून मृत्युमुखी पडली. याशिवाय माथेरान येथे पेब किल्ल्यावर ट्रेकींगसाठी आलेली एक तरुणी दरीत पडून गंभीर जखमी झाली. तीन महिन्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.