Shashi Tharoor son Ishaan Tharoor Job Loss Washington Post : जगातील सर्वांत प्रतिष्ठित वृत्तपत्र मानल्या जाणाऱ्या वॉशिंग्टन पोस्टने मोठी नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी वृत्तपत्राने आपल्या एकूण कर्मचारी वर्गापैकी सुमारे एक-तृतीयांश (३३%) कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. वृत्तपत्राच्या जवळपास १५० वर्षांच्या गौरवशाली इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कर्मचारी कपात मानली जात आहे. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जागतिक पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कपातीचा फटका काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांचे पुत्र तथा आंतरराष्ट्रीय स्तंभलेखक ईशान थरूर यांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर कपातीमागच्या ठोस कारणांचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
नोकरकपातीचा परिणाम किती मोठा?
वॉशिंग्टन पोस्ट आणि कर्मचारी संघटनांच्या माहितीनुसार, वृत्तपत्राने एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यादरम्यान कंपनीने नेमकी संख्या जाहीर केलेली नसली तरीही शेकडो पत्रकार व न्यूज रूम कर्मचारी या कपातीच्या कचाट्यात सापडल्याचे सांगितले जात आहे. ही कपात केवळ एका विभागापुरती मर्यादित नसून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय वार्तांकन, स्थानिक बातम्या, संपादकीय विभाग, क्रीडा पत्रकारिता व सांस्कृतिक वार्तांकन अशा अनेक विभागांवरही झाला आहे. विशेष बाब म्हणजे वॉशिंग्टन पोस्टचा स्वतंत्र क्रीडा विभाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्याशिवाय रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या लेखकांच्या मुलाखती व प्रकाशन क्षेत्रातील बातम्यांसाठी ओळखला जाणारा ‘बुक वर्ल्ड’ विभागही बंद करण्यात आला आहे. कंपनीने मध्य पूर्वेतील सर्व वार्ताहर आणि संपादकांना कामावरून कमी केले आहे. त्याशिवाय जेरुसलेम आणि युक्रेनमधील रिपोर्टिंग केंद्रेही बंद करण्यात आली आहेत . त्यामुळे महत्त्वाच्या भू-राजकीय भागांतील प्रत्यक्ष वार्तांकन थांबल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले.
वॉशिंग्टन पोस्टने नोकरकपात का केली?
वॉशिंग्टन पोस्टचे कार्यकारी संपादक मॅट मरे यांनी कंपनीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना या मोठ्या प्रमाणावरील नोकरकपातीमागची कारणे स्पष्ट केली. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ही कपात टाळता न येणारी असल्याचे त्यांनी मान्य केले. तंत्रज्ञानातील बदल, वाचकांच्या सवयी व उत्पन्नाच्या पद्धती लक्षात घेता, वॉशिंग्टन पोस्टला आपली कार्यपद्धती पूर्णपणे नव्याने उभारावी लागणार आहे. आपण प्रत्येकासाठी सर्व काही करू शकत नाही, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. बैठकीनंतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक ईमेल पाठवून हा निर्णय कळवण्यात आला आहे. यादरम्यान त्यांनी न्यूज रूममधील बातम्यांच्या संख्येकडेही लक्ष वेधले. वॉशिंग्टन पोस्टमध्ये दररोज प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात फेडरल कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांवर पोस्टने केलेल्या आक्रमक वार्तांकनाचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
आणखी वाचा : बलुच बंडखोरांकडे अमेरिकन शस्त्रसाठा? पाकिस्तानला कोण करतंय लक्ष्य? संरक्षण मंत्र्याचा दावा काय?
नोकरकपातीनंतर ईशान थरूर काय म्हणाले?
वॉशिंग्टन पोस्टमधून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक अनुभवी आणि लोकप्रिय पत्रकारांचा समावेश आहे. या पत्रकारांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी हा प्रकार अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लिखाण करणारे वरिष्ठ स्तंभलेखक ईशान थरूर यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ पोस्टसाठी काम करणाऱ्या थरूर यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून नोकरकपातीची माहिती दिली. आज मला वॉशिंग्टन पोस्टमधून कामावरून कमी करण्यात आले. माझ्यासोबत आंतरराष्ट्रीय विभागातील बहुतेक कर्मचारी आणि अनेक उत्तम सहकारीही गेले, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. रिकाम्या न्यूज रूमचा फोटो शेअर करीत हा दिवस ‘वाईट दिवस’ असल्याची भावना थरूर यांनी व्यक्त केली आहे.
नोकरकपातीनंतर पत्रकारांच्या भावनिक प्रतिक्रिया
वॉशिंग्टन पोस्टचे नवी दिल्ली ब्यूरो प्रमुख प्रांशू वर्मा यांनीही आपली नोकरकपात झाल्याची पुष्टी केली. वॉशिंग्टन पोस्टमधून मला कामावरून कमी करण्यात आले आहे आणि हे सांगताना मन हेलावून गेले आहे. माझ्याबरोबरच अनेक गुणी मित्रांनाही कामावरून काढून टाकल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. युक्रेनमधून वार्तांकन करणाऱ्या लिझी जॉन्सन यांनीही आपली नोकरी गेल्याचे सांगितले. युद्धग्रस्त भागातून, वीज, उष्णता व पाणी नसताना वार्तांकन केल्यानंतरही आपल्याला काढून टाकण्यात आले, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. यादरम्यान वॉशिंग्टन पोस्टने क्रीडा विभागही बंद केल्याने अमेरिकन क्रीडा पत्रकारितेतील एक महत्त्वाचे पर्व संपुष्टात आले आहे. या विभागातून जॉन फाइनस्टाईन, मायकेल विल्बन, शर्ली पोविच, सॅली जेनकिन्स व टोनी कोर्नहायझर यांसारख्या नामवंत लेखकांनी गेल्या अनेक दशकांत लिखाण केले होते.
वॉशिंग्टन पोस्टमध्ये कसे बदल झाले?
२०१३ मध्ये जेफ बेझोस यांनी ग्रॅहम कुटुंबाकडून २५ कोटी डॉलर्सना वॉशिंग्टन पोस्ट कंपनी विकत घेतली होती. त्यावेळी पत्रकारितेची परंपरा जपण्याचे आणि दैनंदिन संपादकीय निर्णयांपासून दूर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतरच्या दोन वर्षांतच अमेरिकेतील वाचकांनी बेझोस यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. नोव्हेंबर २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवाराला पाठिंबा न देण्याच्या निर्णयानंतर कंपनीने सुमारे दोन लाख डिजिटल सदस्य गमावल्याचे सांगितले जाते. यादरम्यान वृत्तपत्राच्या मतप्रदर्शन विभागातही बदल करून ‘वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मुक्त बाजारपेठ’ याकडे विशेष लक्ष देण्यात आले. परिणामी कंपनीतील कर्मचाऱ्यांसह वाचकांचीही नाराजी वाढली.
हेही वाचा : अँथ्रॉपिकच्या एका AI टूलमुळे आयटी कंपन्यांचे शेअर्स का कोसळले? कारण काय?
वॉशिंग्टन पोस्टला मोठा आर्थिक फटका
२०२३ मध्ये वॉशिंग्टन पोस्टला सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सचा तोटा झाल्याचे समोर आले होते. २०२५ मध्ये दैनिक छापील प्रसारसंख्या सुमारे ९७ हजारांवर आली. त्याचवेळी रविवार आवृत्तीची संख्या सुमारे १.६ लाखांपर्यंत घसरली. २०२० मध्ये ही संख्या २.५ लाखांच्या आसपास होती. वॉशिंग्टन पोस्टचे अंदाजे २० लाख वाचक असल्याचे सांगितले जाते; पण कंपनीने कधीही त्याबाबतचे अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत. १८७७ मध्ये स्थापन झालेल्या वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राला वॉटरगेट घोटाळ्याच्या तपासामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाली होती. बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन यांच्या पत्रकारितेने कंपनीचे नाव लौकिक केलेले आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्राने क्रीडा, संस्कृती, पुस्तक आणि परदेशी वार्तांकन विभाग केल्यामुळे ही ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. जेफ बेझोस यांच्या निर्णयामुळे लोकशाहीच्या स्तंभाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार अॅशली पार्कर यांनी दिला आहे.

