Popping Bubble Wrap: तुम्हाला पण बबल रॅप फोडायला आवडतं का? आपलं एखादं ऑनलाइन पार्सल आलं की नवीन वस्तू बघण्याआधी ती वस्तू ज्या बबल रॅपमध्ये गुंडाळून येते ते फोडत बसण्यात कितीतरी मजा येते! बरं असं ‘बालिश’ वागण्यासाठी आपण विशिष्ट वयोगटात असणं गरजेचं नाही बरं का? आपण कितीही मोठे झालो तरी बबल रॅप बघितल्यावर आपल्यातली ही खेळकर वृत्ती आपोआप जागी होते. मग काही जणांचा थोडे फार बबल फोडल्यावर जीव शांत होतो किंवा काही जण तर अक्षरशः त्या प्लास्टिकचा जीव काढल्याशिवाय शांत राहत नाहीत. आता या कृत्याला काहीजण बालिशपणा म्हणतील किंवा अगदी काहींना असं कृत्य करणं विचित्रसुद्धा वाटत असेल. पण, तुम्हाला या कृत्यामागचं कारण माहिती आहे का?

मानसशास्त्र असे सुचवते की, वरवर बघता जरी ही गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी वाटली तरी यातून काही रंजक बाबी समोर येतात. स्पर्श, आवाज आणि त्वरित मिळणारा प्रतिसाद (फीडबॅक) यांचा मिलाफ असणाऱ्या साध्या, वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींमुळे मानसिक शिथिलता (रिलॅक्सेशन), एकाग्रता आणि आनंदाशी संबंधित मानसिक प्रक्रिया सक्रिय होऊ शकतात. याचे आकर्षण केवळ बबल रॅपपुरतेच मर्यादित नसते, तर मानवी मेंदू अंदाज लावता येण्याजोग्या संवेदी अनुभवांना आणि छोट्या-छोट्या यशाच्या क्षणांना कसा प्रतिसाद देतो हे यातून दिसून येते.

अर्थात, प्रत्येकालाच बबल रॅप फोडायला आवडतं असं नाही आणि ज्यांना ते आवडतं त्या सर्वांमागील प्रेरणा किंवा कारणे सारखीच असतात असेही नाही. तरीही ही साधीशी वाटणारी कृती इतकी आश्चर्यकारकपणे समाधानकारक का वाटते, हे समजून घेण्यासाठी अनेक प्रस्थापित मानसशास्त्रीय सिद्धांत मदत करतात.

मेंदूला ओळखीचे अनुभव का आवडतात?

याचं एक कारण म्हणजे आपला मेंदू स्पर्श, आवाज आणि डोळ्यांनी पाहून गोष्टी समजून घेत असतो. बबल रॅप फोडताना या तिन्ही गोष्टी एकत्र होतात. बोटांनी दाब पडतो, फटाक्यासारखा आवाज येतो आणि बबल फुटताना डोळ्यांना दिसतो. मेंदूला लगेच याचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे ही कृती करायला खूप मजा येते आणि मन शांत होतं.

छोट्या आनंदामुळे उत्साह वाढतो:

मानसशास्त्रज्ञांच्या मते, छोट्या-छोट्या यशांमुळेही आपल्या मेंदूला आनंद होतो. प्रत्येक फुटणारा बबल म्हणजे एक छोटं काम पूर्ण केल्यासारखं असतं. यातून लगेच समाधान मिळतं, जसं आपण कामाच्या यादीवर एकामागून एक टिक मार्क करतो. बबल रॅप अवघ्या काही मिनिटांत असा खूप सारा झटपट आनंद देऊन जातो.

एकच कृती पुन्हा पुन्हा केल्याने ताण कमी होतो:

संशोधन सांगतं की, एकच हालचाल वारंवार केल्याने ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते. जसं स्ट्रेस बॉल दाबणं, कागदावर रेघोट्या मारणं किंवा बोटं वाजवणं. बबल रॅप फोडतानाही हातांना एक साधं काम मिळतं, ज्यामुळे काही वेळासाठी मनातील चिंता आणि थकवा दूर होतो.

उत्सुकतेमुळे आपण ती कृती करतो:

माणसाला जन्मतःच नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. जरी आपल्याला माहीत असतं की बबल दाबल्यावर काही बदलणार नाही आहे, तरीही प्रत्येक बबल फोडताना आधी थोडी उत्सुकता वाटते आणि नंतर तो फुटल्याचा आनंद मिळतो, यामुळे आपले लक्ष त्यात गुंतून राहते.

मोठे झाल्यावरही खेळकरपणा जिवंत राहतो:

खेळणं फक्त लहान मुलांसाठीच असतं असा कुठे नियम आहे का? बिलकुल नाही! संशोधनानुसार, मोठे झाल्यावरही खेळकर स्वभाव माणसाला मनातून आनंदी ठेवतो. खेळण्यासाठी नेहमी खेळण्यांची गरज नसते. बबल रॅप फोडण्यासारख्या साध्या गोष्टीही व्यस्त दिवसात मनाला आराम देतात.

मनातून येणारा आनंद:

काही गोष्टी आपण कोणत्याही फायद्याशिवाय, फक्त स्वतःच्या आवडीसाठी करतो. बबल रॅप फोडण्यासाठी कोणाला पैसे मिळत नाहीत किंवा बक्षीस मिळत नाही. तरीही लोक ते करतात, कारण ती कृती स्वतःच खूप आनंद देते.

बबल रॅप आवडणं म्हणजे बालिशपणा नाही:

बऱ्याच लोकांना वाटतं की, मोठे झाल्यावरही बबल रॅप फोडणं म्हणजे बालिशपणा आहे; पण मानसशास्त्र असं मानत नाही. ऑफिसमध्ये मोठी आणि अवघड कामं सांभाळणारी व्यक्तीही एखादं पार्सल उघडल्यावर बबल रॅप पाहून हसू शकतं. खेळकर स्वभाव असणं आणि समजदार असणं, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी एका माणसात असू शकतात, त्यामुळे यापुढे पार्सल आल्यावर बबल रॅप फोडण्याआधी संकोच करू नका… बिनधास्त खेळा!