Titanic Wreck Human Remains: हिमनगाला धडक दिल्यानंतर १५ एप्रिल १९१२ रोजी आरएमएस टायटॅनिक या जहाजाला उत्तर अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली आणि त्यात १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मात्र, १९८५ साली संशोधक रॉबर्ट बॅलार्ड यांनी सुमारे ३८०० मीटर खोल समुद्रात या जहाजाचे अवशेष शोधून काढले, तेव्हा त्यांना सांगाड्यांऐवजी फक्त बूट, कपडे आणि वैयक्तिक वस्तूच आढळल्या असे का, याचा घेतलेला शोध.
समुद्राच्या अतिखोल भागातील scavengers (मांसभक्षक जीव) यांनी मृतदेहावरील मांस लवकरच खाल्ले, तर विशिष्ट रासायनिक प्रक्रियांमुळे हाडेही नष्ट झाली. कॅल्शियम कार्बोनेट कॉम्पेन्सेशन डेप्थ (CCD) या स्तराखाली हाडे टिकून राहत नाहीत. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी सांगितले की, त्यांनी ३३ वेळा त्या ठिकाणी भेट दिली, पण त्यांना कोणतेही मानवी अवशेष दिसले नाहीत. त्यामुळे काळाच्या ओघात अनेक वदंता निर्माण झाल्या.
टायटॅनिकचे अवशेष: जहाजात सांगाडे का सापडले नाहीत?
टायटॅनिकचे अवशेष सापडल्यानंतर अनेक वेळा पाणबुडे आणि सबमर्सिबल्सनी त्या ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. टायटॅनिकचे अवशेष शोधणारे महासागरशास्त्रज्ञ रॉबर्ट बॅलार्ड यांनी त्या ठिकाणाचे वर्णन स्वच्छ पण ओसाड असे केले आहे. त्यांनी २००९ साली NPR ला सांगितले होते, “टायटॅनिक आणि बिस्मार्क ही दोन्ही जहाजे कॅल्शियम कार्बोनेट कॉम्पेन्सेशन डेप्थच्या खाली आहेत. त्यामुळे समुद्रातील जीवांनी मांस खाल्ल्यानंतर हाडे उघडी पडतात आणि नंतर ती विरघळून जातात.”
टायटॅनिक या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनीही त्या ठिकाणी अनेक वेळा भेट दिली आहे. त्यांनी जहाजाच्या कॅप्टनपेक्षाही जास्त वेळ तिथे घालवला. त्यांनी २०१२ साली New York Times ला सांगितले की, “मला एकही मानवी अवशेष दिसला नाही… आम्हाला कपडे दिसले, बुटांचे जोड दिसले. यामुळे तिथे कधीतरी मृतदेह होता हे स्पष्ट होते. पण कोणतेही मानवी अवशेष आम्हाला कधीच दिसले नाहीत.

टायटॅनिक हे White Star Line कंपनीचे जहाज होते आणि Olympic-class मधील ऑलिम्पिक, टायटॅनिक आणि ब्रिटॅनिक तीन जहाजांपैकी एक होते. दरम्यान, सागरी पुरातत्त्वज्ञ जेम्स डेलगाडो (SEARCH Inc.चे वरिष्ठ उपाध्यक्ष) यांच्या मते, काही अत्यंत सूक्ष्म मानवी अवशेष अस्तित्वात असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यांनी Mail Online ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “काही प्रमाणात मानवी अवशेष असण्याची शक्यता असू शकते, पण सध्याच्या मोहिमांमध्ये ते आढळलेले नाहीत.”
टायटॅनिकमधील मृतदेह समुद्रातील scavengers खातात का?
सुमारे ३८०० मीटर खोल समुद्रात टायटॅनिकचे अवशेष अत्यंत थंड आणि कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यात होते. अशा वातावरणात सूक्ष्मजीव (microorganisms) मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि काही दिवसांतच ते मृतदेहातील मऊ ऊती (soft tissues) विघटित करण्यास सुरुवात करतात. या ठिकाणी उंदीर, मासे किंवा खेकडे यांसारखे मोठे स्कॅव्हेंजर्स (scavengers- मृत किंवा कुजलेले पदार्थ खाणारे प्राणी) नसले तरी सूक्ष्मजीव आणि लहान समुद्री जीव मृतदेहातील अवयव आणि स्नायू खाऊन टाकतात. त्यामुळे शरीर लवकरच विघटित होऊन विखुरले जाते. टायटॅनिक दुर्घटनेनंतर फक्त ३३७ मृतदेहच सापडले. उर्वरित मृतदेह समुद्रात वाहून गेले किंवा जहाजासोबत बुडाले, त्यामुळे ते अटलांटिक महासागरातील scavengers साठी सहज उपलब्ध झाले.
रॉबर्ट बॅलार्ड यांच्या मते, या प्रक्रियेत सर्वप्रथम शरीरातील मांस नाहीसे होते आणि त्यामुळे हाडे उघडी पडतात. मात्र, कोणतेही संरक्षण नसल्यास ही हाडेही नंतर समुद्रातील रासायनिक प्रक्रियेमुळे विरघळून जातात. उथळ पाण्यातील जुन्या जहाजांच्या अवशेषांमध्ये सांगाडे टिकून राहतात, कारण तिथे scavengers कमी असतात.
टायटॅनिकवरील मानवी हाडे कशामुळे विरघळली?
मानवी हाडे प्रामुख्याने कॅल्शियम फॉस्फेट (calcium phosphate) या घटकापासून तयार झालेली असतात, जी कॅल्शियम कार्बोनेटसारखीच असतात. मात्र, ही हाडे कॅल्शियम कार्बोनेट कॉम्पेन्सेशन डेप्थ (CCD) खाली टिकू शकत नाहीत. हा स्तर साधारणतः ९०० ते १५०० मीटर दरम्यान असतो. या खोलीत समुद्रातील पाणी अधिक आम्लीय (acidic) असते आणि त्यात कॅल्शियम आयन्सची कमतरता असते, त्यामुळे खनिजे हळूहळू विरघळून जातात.
रॉबर्ट बॅलार्ड यांनी याचे सोप्या शब्दांत स्पष्टीकरण देताना सांगितले की; “सुमारे ३००० फूट खोलीखाली तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट कॉम्पेन्सेशन डेप्थच्या खाली जाता. खोल समुद्रातील पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट नसते, जे हाडांचा मुख्य घटक आहे.” टायटॅनिकचे अवशेष या मर्यादेपेक्षा खूपच खोल आहेत. जहाजाच्या लोखंडी भागावर rusticles (गंजासारखी रचना) तयार होऊन काही प्रमाणात संरक्षण मिळते, पण हाडांवर असा कोणताही संरक्षक थर तयार होत नाही. धातूवर तयार होणाऱ्या बॅक्टेरियल थरांप्रमाणे संरक्षण हाडांना मिळत नाही आणि कालांतराने ती पूर्णपणे विघटित होतात. मात्र, लेदरचे बूट आणि इतर सेंद्रिय वस्तू ऑक्सिजन कमी असलेल्या (anoxic) जागांमध्ये किंवा गाळात अडकून राहिल्यामुळे काही प्रमाणात टिकून राहतात.
टायटॅनिकच्या रिकाम्या अवशेषातून मिळणारे धडे
टायटॅनिकच्या अवशेषांमध्ये सांगाडे न सापडण्यामागील गूढ आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. समुद्राची खोली ही निसर्गाची सर्वात मोठी रीसायकलिंग यंत्रणा आहेत. ही परिस्थिती मृतांचा सन्मान राखते, कारण जहाज ‘भयावह प्रदर्शन’ नसून एका गंभीर दुर्घटनेचे स्मारक म्हणून उभे आहे. सागरी पुरातत्त्वज्ञ जेम्स डेलगाडो यांनी टायटॅनिकचे मॅपिंग करण्याच्या अत्याधुनिक मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांनी नैतिकदृष्ट्या जबाबदार संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना २०१० मधील मोहिमेबद्दल सांगितले; “ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा संपूर्ण टायटॅनिक स्थळ पाहण्याची संधी असेल, त्याचे मॅपिंग करण्यात येईल आणि त्या ठिकाणाचा पूर्ण अनुभव पृष्ठभागावर म्हणजेच बाहेर आणता येईल.”
आज 3D मॅपिंगसारखे आधुनिक तंत्रज्ञान अवशेष शिल्लक नाहीत, यास दुजोरा देते आणि जहाजाच्या जतनासाठी मदत करते. काळानुसार त्याचा ऱ्हास होत असला तरी, शंभर वर्षांनंतरही ही कहाणी आपल्याला खिळवून ठेवते. टायटॅनिक ही केवळ दुर्घटना नाही, तर ती मानवी अहंकार (hubris), प्रचंड हानी आणि समुद्राच्या निर्दयी शक्तीची शांत आणि परिणामकारक अशी गंभीर आठवण आहे.
