करोनाच्या प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असतानाच आता जगासमोर मंकीपॉक्स नावाचं संकट उभं आहे. सध्या जगभरात मंकीपॉक्स आजारामुळे भीतीचं वातावरण आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्लूएचओने पुरुषांना मंकीपॉक्सची लागण होण्याचा धोका जास्त असल्याचं सांगतानाच एक सल्ला दिला आहे. पुरुषांनी लैंगिक संबंध असणाऱ्या जोडीदारांची (सेक्स पार्टनरची) संख्या कमी ठेवणं या संसर्गाच्या कालावधीमध्ये फायद्याचं ठरेल असं जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितलं आहे. नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. टेड्रोस गेब्रेयसस यांनी दिलेल्या माहितीनुसार “मे महिन्यात मंकीपॉक्सचा उद्रेक झाल्यापासून समोर आलेल्या प्रकरणांपैकी ९८ टक्के प्रकरणांमध्ये समलिंगी, उभयलिंगी आणि पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचा समावेश आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनीच अशाप्रकारचा सल्ला दिल्याने पुन्हा एकदा लैंगिक संबंध आणि मंकीपॉक्सच्या संसर्गाचा काही थेट संबंध आहे का यासंदर्भातील चर्चा सुरु झाली आहे. सेक्सच्या माध्यमातून, गुप्तांगामधून या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो का? या विषाणूचा प्रादुर्भाव किंवा संसर्गाचा वेग लैंगिकतेनुसार निश्चित करता येऊ शकतो का? हे आणि असे अनेक प्रश्न सध्या लोकांना पडलेत. त्याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं सेक्स आणि मंकीपॉक्सबद्दल नेमकी काय माहिती दिलीय जाणून घेऊयात…

मंकीपॉक्स हा लैंगिक आजार होण्याची अनेकांना भीती
मंकीपॉक्स जवळच्या शारीरिक संपर्कातून म्हणजेच स्पर्श, एकमेकांच्या सानिध्यात राहणे यासारख्या माध्यमातून पसरतो हे लक्षात घेता, लैंगिक संबंध ठेवण्यासंदर्भातील चिंताही अनेकांना सतावू लागली आहे. अमेरिकेमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार पाहता, अनेक तज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला असून या नव्या संसर्गामुळे लैंगिक संबंधांच्या माध्यमातून पसरणाऱ्या आजारांमध्ये एका नवीन आजाराची भर पडण्याची भीती तज्ज्ञांना वाटतेय. रोगाच्या संभाव्य संसर्ग मार्गाबद्दल तज्ञ या मताशी सहमत नाहीत की हा संसर्ग लैंगिक संबंधांमधून होऊ शकतो. काहींना अशी भीती वाटते की मंकीपॉक्सचा संसर्ग इतका व्यापक होत आहे की तो आता एसटीडी (सेक्शुएली ट्रान्समिटेड डिसीजेस) बनण्याच्या मार्गावर आहे. गोनोरिया, नागीण आणि एचआयव्हीसारखे रोग आधीच या प्रकारामध्ये मोडतात.

तोंड, घसा, गुप्तांग, योनीमध्येही पुरळ असू शकतात
मंकीपॉक्सचा संसर्ग हा एखाद्या व्यक्तीचं चुंबन घेणे, त्याला स्पर्श करणे, तोंडावाटे पसरु शकतो. शरीरसंबंधांबद्दल सांगायचे झाल्यास योनीतून किंवा गुदद्वारासंबंधीच्या संभोगासह संसर्ग झालेल्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क झाल्यास हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरू शकतो. नवीन आणि असामान्य पुरळ किंवा त्वचेसंदर्भातील काही समस्या असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) आणि मंकीपॉक्सची तपासणी होईपर्यंत लैंगिक संबंध ठेऊ नयेत. हा रोग कांजण्या, नागीण आणि सिफिलीस यांसारख्या इतर संसर्गजन्य रोगांसारखा आहे. याच कारणामुळे सध्याच्या मंकीपॉक्स उद्रेकातील अनेक प्रकरणे ही लैंगिक समस्यांविषयीच्या आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांसंबंधितील असल्याचं दिसून येत आहे. लक्षात ठेवा मंकीपॉक्सच्या संसर्गाचं पुरळ तोंड, घसा, गुप्तांग, योनी आणि गुदद्वार/गुदद्वाराच्या क्षेत्रासह एखाद्या व्यक्तीला आपल्याच शरीरावर थेट पहता येणार नाही अशा अवयवावर देखील आढळू शकते.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘मंकीपॉक्सपासून मारबर्गपर्यंत’… करोनापेक्षाही भयंकर असलेल्या ‘या’ विषाणूंनी घातलयं जगात थैमान

१२ आठवडे कंडोम वापरण्याचा सल्ला
मंकीपॉक्स विषाणू वीर्यामध्ये सापडला असला तरी, तो वीर्य किंवा योनिमार्गातून पसरतो की नाही हे सध्या ठामपणे सांगता येत नाही. मंकीपॉक्सचा संसर्ग रुग्णांनी आजारावर मात केल्यानंतर १२ आठवडे शरीरसंबंध ठेवताना कंडोम न चुकता वापरण्याचा सल्ला दिला जातो. आजारामधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या वीर्याच्या माध्यमातून या विषाणूच्या संसर्गाची क्षमता आणि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यतेसंदर्भात ठामपणे सांगता येत नाही तोपर्यंत कंडोम न वापरता शरीरसंबंध न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कंडोम वापरल्याने कोणाचेही मंकीपॉक्स होण्यापासून १०० टक्के संरक्षण होणार नाही, मात्र यामुळे एखाद्या बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्या जोडीदाराला लैंगिक आजारांची लागण होण्यापासून नक्कीच रोखण्यात मदत करेल.

अनेकांसोबत लैंगिक संबंध असतील तर…
जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील देशांसाठी जारी केलेल्या नियमांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसोबत शरीरसंबंध ठेवत असल्यास त्यांचा संपर्क क्रमांक आणि इतर माहिती घेऊन ठेवण्याचा सल्ला दिलाय. असं केल्याने जोडीदाराला काही लक्षणे आढळल्यास तो समोरच्या व्यक्तीला सूचित करेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. एकाहून अधिक जणांसोबत लैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींनी मंकीपॉक्सच्या संपर्कात येण्याचा धोका टाळण्यासाठी ज्यांना मंकीपॉक्सची लक्षणे आहेत त्यांच्याशी जवळचा संपर्क टाळावा. लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडीदारांची संख्या कमी केल्यास मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याची शक्यता आणि धोका कमी होईल, असं या सूचनांमध्ये सांगण्यात आलंय.

पाहा व्हिडीओ –

हा विषाणू केवळ लैंगिक संबंधांमधूनच पसरत नाही, तर संसर्ग झालेल्या व्यक्तीशी जवळचा संपर्क आल्यासही पसरतो. एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त धोका असतो. ज्यांना मंकीपॉक्सची लक्षणे असतील त्यांनी ताबडतोब आरोग्य कर्मचार्‍यांचा सल्ला घ्यावा, असं जागतिक आरोग्य संघटना सांगते.

नक्की वाचा >> विश्लेषण : सामान्य सर्दी, पावसाळ्यात अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास, की ओमायक्रॉनचा संसर्ग? समजून घ्या कसं ओळखावं

पुरुषांनी पुरुषांसोबत संबंध ठेवल्यास?
मंकीपॉक्सचा धोका केवळ लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या किंवा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांपुरता मर्यादित नाही. लक्षणे असलेल्या एखाद्या व्यक्तीशी जवळचा संपर्क असलेल्या कोणालाही संसर्गाचा धोका असतो.

सध्याच्या मंकीपॉक्सच्या उद्रेकात नोंदवलेली अनेक प्रकरणे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये आढळून आली आहेत. या सोशल नेटवर्क्समध्ये सध्या हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गाच्या माध्यमातून पसरत असल्याचं दिसून आलंय. हे लक्षात घेता, पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांनी संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीशी जवळचा संपर्क ठेवल्यास त्यांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग अधिक आढळून येणाऱ्याचं संभाव्य कारण म्हणजे या व्यक्ती लैंगिक आरोग्याबद्दल अधिक जागृक असतात. मंकीपॉक्स पुरळ हे नागीण आणि सिफिलीससह काही लैंगिक मार्गाने संक्रमित होणाऱ्या रोगांसारखे असू शकतात. यासंदर्भात अधिक अभ्यास होईल त्याप्रमाणे अधिक संसर्गाची प्रकरण समोर येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. समलिंगी, उभयलिंगी आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणार्‍या इतर पुरुषांच्या समुदायांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. सर्वाधिक धोका असणाऱ्या गटांच्या संसर्गासाठी ही जागृती महत्त्वाची आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : नाका-तोंडातून रक्तस्राव, लक्षणानंतर ८-९ दिवसात रुग्णाचा मृत्यू, नेमका काय आहे जीवघेणा मारबर्ग संसर्ग? वाचा…

लैंगिकतेच्या आधारे एखाद्या विशिष्ट घटकाला दोष देणं किती योग्य?
या उद्रेकामुळे घाबरुन गेलेले काही गट सध्या पहावयास मिळत आहे. एखाद्या विशिष्ट लैंगिक वर्तन असणाऱ्यांमुळे हा संसर्ग होत असल्याचे चुकीचे संदेश सध्या चर्चेत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं हे स्पष्ट केलं आहे की अशाप्रकारे घाबरुन जाणं चुकीचं आहे. यामधील पहिली गोष्टमध्ये मंकीपॉक्स असलेल्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा जवळचा शारीरिक संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीला धोका असतो, ते कोण आहेत, ते काय करतात, त्यांनी कोणाशी लैंगिक संबंध ठेवले आहेत किंवा इतर कोणत्याही घटकांचा संसर्ग होणार की नाही याच्याशी थेट संबंध नसतो. एखाद्या आजारामुळे किंवा रोगामुळे लोकांना ते एका विशिष्ट समुदायाचे आहेत म्हणून दोष देणं चुकीचं असल्याचं जागतिक आरोग्य संघटना सांगते. अशाप्रकारे दोष दिल्यास परिस्थिती अधिक वाईट होण्याची शक्यता असते आणि आपल्याला एक समाज म्हणून शक्य तितक्या लवकर हा उद्रेक संपवण्यामध्ये असा अपप्रचार अडथळा ठरु शकतो.

ज्यांना संसर्ग झाला आहे किंवा जे आजारी लोकांची काळजी घेण्यास मदत करत आहेत त्यांना आधार देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे किंवा जे आजारी लोकांची काळजी घेण्यास मदत करत आहेत त्यांना आधार देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हा संसर्ग कसा थांबवायचा आणि आपण सर्वजण स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करू शकतो हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. दोष देणे आणि भेदभाव करणे कधीच योग्य नसते. यामध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.

एचआयव्ही बाधितांच्या मृत्यूची शक्यता अधिक?
उपचार न केल्यास एचआयव्हीमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. काही पुराव्यांच्या आधारे असं सांगता येतं की इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड (अनेक व्याधी असलेली किंवा सहव्याधी व्यक्ती) असल्‍याने अशा व्यक्तींच्या संपर्कात असल्‍यास त्यांना संसर्ग होण्‍याची शक्यता अधिक असते. तसेच गंभीर आजार असणाऱ्यांना मंकीपॉक्‍सचं संसर्ग झाल्यास त्यांना मृत्यूचा अधिक धोका असतो. मात्र, हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी अधिक माहितीची आवश्यक आहे, असं डब्ल्यूएचओ सांगते.

नक्की वाचा >> विश्लेषण- करोना लस ‘अपडेट’ : किती शक्य, किती आवश्यक?

कोणाला धोका अधिक?
रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असलेल्या लोकांना मंकीपॉक्सपासून अधिक गंभीर आजार होण्याचा आणि त्रास होण्याचा धोका असू शकतो. एचआयव्हीशी लढा देणाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रकृतीनुसार विशेष काळजी घेऊन संसर्ग होणार नाही याबद्दल अधिक जागृक राहणं फायद्याचं आहे. सध्याच्या उद्रेकात बरेच लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत, परंतु काही गंभीर प्रकरणे आढळली आहेत. अशा लोकांवर मंकीपॉक्सचा अधिक परिणाम दिसून येण्यामागील कारण सुद्धा फार विचित्र आहे. ज्यांचा एचआयव्ही संसर्ग चांगल्या प्रकारे नियंत्रित होता त्यांना अधिक प्रमाणात लक्षणं दिसून आली आहेत. हे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अभ्यास चालू आहेत.

एचआयव्हीग्रस्त असलेल्या लोकांसह अनेकांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या लोकांनी लक्षणे असलेल्या कोणाशीही जवळचा संपर्क टाळून मंकीपॉक्सच्या संपर्कात येण्याचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा व्यक्तींनी लैंगिक संबंधांबद्दल अधिक जागृक राहणं गरजेचं असल्याचं त्यांना योग्य पद्धतीने पटवून देणं गरजेचं आहे असं डब्ल्यूएचओ म्हणते.

आरोग्य सेवांवर ताण येणार नाही यासाठी काय करता येईल?
सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यासंदर्भातील सवयींना प्राधान्य देऊन निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करुन आपल्या स्थानिक आरोग्य सेवांवर या संसर्गाच्या माध्यमातून ताण पडणार नाही याची काळजी घेऊ शकतो. ऑनलाइन, व्हिडिओ किंवा फोन सेवा उपलब्ध असल्यास त्या माध्यमांमधून या संसर्गासंदर्भातील प्रश्नांसाठी वापर करावा. असा वापर केल्याने वैयक्तिक सेवांवरील दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते. मंकीपॉक्सपासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहिल्याने रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, हा प्रादुर्भाव संपेल आणि त्यामुळे आरोग्य सेवांवरील भार कमी होईल, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> विश्लेषण : आई होण्यासाठी योग्य वय काय? जाणून घ्या

मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास…
तुम्हाला मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यास, आरोग्य कर्मचारी व्यस्त असले तरीही त्याचा सल्ला, चाचणी आणि काळजी घेण्यासाठी तुम्ही आरोग्य सेवा केंद्रांमध्ये संपर्क साधणे महत्त्वाचे आहे, असं जागतिक आरोग्य संघटना सांगते. मंकीपॉक्स जवळच्या संपर्कातून पसरत असल्याने, आरोग्य कर्मचार्‍यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलंय. – तुमची लक्षणे मंकीपॉक्समुळे असू शकतात असा तुम्हाला संशय असल्याची माहिती देण्यासाठी तुमच्या भेटीपूर्वी आरोग्य केंद्रावर कॉल करा. काळजी घेण्याचे सोपे उपाय म्हणून मास्क घाला आणि कापडाने तुमची त्वचा झाका आणि मगच आरोग्य केंद्रावर जा.

रक्ताच्या माध्यमातून संसर्ग होतो का?
अस्वस्थ वाटत असताना कधीही रक्तदान करु नये. रक्त देण्याआधी मंकीपॉक्सच्या कोणत्याही लक्षणांचे निरीक्षण करा आणि तुम्हाला बरे वाटत नसल्यास रक्त देणं टाळा. रक्त संक्रमणाद्वारे मंकीपॉक्स पसरल्याचे कोणतेही अहवाल अद्याप उपलब्ध नाहीत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why who chief advises to reduce sex partners as monkeypox cases surge scsg
First published on: 28-07-2022 at 18:48 IST