Women Feel More Body Pain Than Men : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला वारंवार अंगदुखीची तक्रार करतात. तरीही काही पुरुष मंडळी त्यांच्याकडे रोजची समस्या म्हणून दुर्लक्ष करताना दिसून येतात. महिला वारंवार वेदनांची तक्रार करत असतील, तर त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही असू शकतात. यादरम्यान पुरुषांच्या तुलनेत महिलांना आयुष्यभर जास्त शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात, असे एका नव्या संशोधनातून समोर आले. तसेच वेदनांच्या बाबतीत महिलांशी होणाऱ्या असमानतेवरही या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला, त्याविषयी…

अभ्यास नेमका कशावर आधारित?

‘नेचर मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात जगभरातील जगभरातील महिला आणि पुरुषांना होणाऱ्या शारीरिक वेदनांचा सखोल आढावा घेण्यात आला. त्यात तब्बल ११८ देशांमधील ६१ लाखांहून अधिक जणांनी आपल्या शरीरात होणाऱ्या वेदनांची माहिती दिली. या अभ्यासात केवळ वैद्यकीय निदानावर अवलंबून न राहता महिला आणि पुरुषांना शरीरात जाणवणाऱ्या वेदनांबाबत काय अनुभव येतात, याचाही आढावा घेण्यात आला. अनेकदा अंगदुखीचा त्रास जाणवूनही आर्थिक परिस्थितीमुळे काहीजण डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे संशोधकांनी थेट अशा लोकांपर्यंत पोहोचून प्रत्यक्षात त्यांनी सांगितलेल्या अनुभवांचा अभ्यास केला. या अभ्यासात पाच वर्षे वयोगटापासून ते वयाची शंभरी पार करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता.

महिलांना शरीरातील सर्व ११ भागांत अधिक वेदना

या अभ्यासात असे आढळून आले की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना आयुष्यभर जास्त शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. त्यामध्ये डोके, चेहरा, मान, पाठ, पोट, कंबर आणि गुडघे यांसह शरीराच्या विविध भागांचा समावेश होता. विशेषतः डोकेदुखी, चेहऱ्यावरील वेदना आणि पोटदुखीच्या बाबतीत महिला आणि पुरुषांमध्ये लक्षणीय फरक दिसून आला. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये चेहऱ्यावरील वेदनांची शक्यता ८३ टक्क्यांनी अधिक आढळली. डोकेदुखीच्या बाबतीत महिलांमध्ये हा त्रास पुरुषांपेक्षा ७४ टक्क्यांनी जास्त असल्याचे नोंदवले गेले. त्याशिवाय पोटदुखी किंवा ओटीपोटातील वेदना सहन करण्याची शक्यता महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी अधिक दिसून आली आहे. अनेकदा महिलांनी वेदनांबाबत तक्रार केल्यानंतरही पुरुष मंडळी त्यांच्या त्रासाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचेही या अभ्यासात अधोरेखित करण्यात आले.

शरीरात वेदनांचा त्रास कोणत्या वयात वाढतो?

वय वाढेल तशा वेदनाही वाढत जातात असा सर्वसाधारण समज आहे. मात्र संशोधनातून समोर आले की, शरीराच्या बहुतांश भागांमधील वेदना वयाच्या ५५ वर्षांपूर्वी वेगाने वाढतात. या वेदनांचा भडका प्रौढावस्थेच्या मध्यावर किंवा उत्तरार्धात सर्वाधिक उच्चांकावर पोहोचतो आणि वृद्धापकाळात उलट कमी होत जातो. यापूर्वीच्या जागतिक अंदाजानुसार, श्रीमंत आणि प्रगत देशांमध्ये वेदनांशी संबंधित समस्यांचे प्रमाण जास्त मानले जात होते; पण या अभ्यासात नेमके उलट वास्तव समोर आले आहे. कमी उत्पन्न असलेल्या गरीब देशांमधील नागरिकांना उतारवयात शरीराच्या वेदनांचा त्रास लक्षणीयरीत्या जास्त होतो. या देशांमध्ये पाठदुखी किंवा कंबरदुखीचे प्रमाण श्रीमंत देशांच्या तुलनेत तब्बल दुप्पट असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

वेदनेची कारणे भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून

उत्तर अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित भागांमध्ये धूम्रपान, लठ्ठपणा आणि कमी उत्पन्न यांसारखे टाळता येण्याजोगे घटक शारीरिक वेदनेसाठी मोठ्या प्रमाणावर (२७ टक्क्यांपर्यंत) कारणीभूत ठरतात. याउलट, गरीब देशांमध्ये या घटकांचा वाटा केवळ १२ टक्क्यांच्या आसपास आहे. यावरून असे सूचित होते की, विकसनशील देशांमध्ये वेदनांचे प्रमाण अधिक असण्यामागे इतर घटकही कारणीभूत असू शकतात. त्यामध्ये शारीरिक कष्टांची कामे, संसर्गजन्य आजार आणि वैद्यकीय उपचारांचा अभाव यांसारख्या घटकांचा समावेश असू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांना जाणवणाऱ्या वेदनांमागील कारणे वेगवेगळी असू शकतात.

जगभरात महिलांना पाठदुखीचा त्रास सर्वाधिक

जगभरातील महिलांमध्ये कोणत्या प्रकारच्या वेदना अधिक प्रमाणात आढळतात, याचाही आढावा अभ्यासात घेण्यात आला. त्यानुसार, चेहऱ्यावरील वेदना सर्वांत कमी प्रमाणात आढळल्या. जगातील सुमारे २ टक्के लोकांना या प्रकारच्या वेदनांचा त्रास होतो. याउलट, पाठदुखीचा त्रास सर्वाधिक आढळला असून, जगभरातील सुमारे ४० टक्के महिलांना पाठदुखीचा सामना करावा लागतो.

पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास कोणत्या वयात अधिक?

अभ्यासानुसार, पोटदुखीचा त्रास वयाच्या तुलनेने कमी टप्प्यावर, म्हणजेच साधारण २३ व्या वर्षी सर्वाधिक असतो. त्यानंतर डोकेदुखीचा त्रास शिखरावर पोहोचतो. साधारण वयाच्या ३४ व्या वर्षी डोकेदुखीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले.

वयानुसार शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील वेदना

पुरुष आणि महिलांना मान, खांदे आणि कोपर यांसारख्या शरीराच्या वरच्या भागातील सांध्यांच्या वेदना मध्यम वयात, साधारण ५९ ते ६२ वर्षांच्या दरम्यान सर्वाधिक असतात. त्यानंतर या वेदना कमी होऊ लागतात. मात्र, शरीराचा भार पेलणाऱ्या खालच्या भागातील सांध्यांमध्ये वेगळी स्थिती दिसून आली. कंबर, नितंब आणि गुडघ्यांमधील वेदना वाढत्या वयानुसार अधिक तीव्र होत जातात. या भागांवर दीर्घकाळ पडणारा ताण आणि झीज यांमुळे वयाच्या ७५ वर्षांनंतर या वेदना सर्वाधिक पातळीवर पोहोचत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

लठ्ठपणाचा थेट फटका घोट्यांना आणि पायांना

लठ्ठपणामुळे सांधेदुखीचा धोका वाढतो, हे यापूर्वीही ज्ञात होते. मात्र, नव्या अभ्यासात शरीराच्या कोणत्या भागांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो, हे स्पष्ट करण्यात आले आहे. लठ्ठपणामुळे पाय आणि घोट्यांमध्ये तसेच गुडघ्यांमध्ये वेदना होण्याचा धोका जवळपास दुप्पट होतो. नितंबांच्या वेदनांवरही लठ्ठपणाचा परिणाम होतो; मात्र, पाय, घोटे आणि गुडघ्यांच्या तुलनेत हा परिणाम किंचित कमी असल्याचे अभ्यासात आढळले आहे. या संशोधनातून जगभरातील शारीरिक वेदनांचे प्रमाण काम करण्याच्या वयात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. तसेच, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वेदनांचा भार पूर्वीच्या अंदाजांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना का होतात जास्त वेदना?

महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक तीव्र शारीरिक वेदना जाणवण्यामागे अनेक घटक कारणीभूत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. इस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी कमी-जास्त झाल्यावर मेंदूतील वेदना स्वीकारणाऱ्या मज्जातंतूंची संवेदनशीलता बदलते. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या बदलांमुळे महिलांमध्ये वेदना तीव्र जाणवतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी नैसर्गिक वेदनाशामक म्हणून कार्य करते. महिलांमध्ये याचे प्रमाण नगण्य असल्याने त्यांना नैसर्गिक संरक्षण कमी मिळते. तसेच महिलांच्या त्वचेमध्ये आणि ऊतींमध्ये मज्जातंतूंची घनता पुरुषांपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ, चेहऱ्याच्या त्वचेवर महिलांमध्ये प्रति चौरस सेंटीमीटर जास्त मज्जातंतू असतात, ज्यामुळे वेदनेचा संदेश मेंदूपर्यंत वेगाने आणि तीव्रतेने पोहोचतो.

महिलांची वेदना सहन करण्याची क्षमता कमी असते का?

वेदनेचा अनुभव घेताना महिला आणि पुरुषांच्या मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय होतात. महिलांमध्ये अनेक तीव्र वेदना देणारे आजार पुरुषांपेक्षा मोठ्या प्रमाणात आढळतात. महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत अधिक तीव्रतेने वेदना नोंदवतो, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले. याशिवाय महिलांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण, चयापचय आणि संप्रेरके पुरुषांपेक्षा वेगळी असल्याने अनेक वेदनाशामक औषधे महिलांच्या शरीरावर पुरुषांइतकी प्रभावी ठरत नाहीत. एकंदरीत महिलांची वेदना सहन करण्याची मानसिक क्षमता कमी नसते, तर निसर्गतःच त्यांची मज्जासंस्था आणि संप्रेरके वेदनेचे सिग्नल अधिक तीव्रतेने शरीरापर्यंत पोहोचवतात, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.