आताच दखल का?
जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचा विचार करता १९४६ नंतरच्या उच्चांकी पातळीवर ते पोहोचले आहेत. ही युद्धे प्रदीर्घ काळ चालणारी, अधिक हिंसक आणि नागरी भागातच संहार घडवणारी आहेत. यात घरे, शाळा, रुग्णालये, मदत छावण्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. या सर्व युद्धजन्य स्थितीत महिला आणि मुलींनाच सर्वाधिक लक्ष्य केले जात असल्याचे वास्तव संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून उघड झाले आहे. जगभरात कोट्यवधी महिला आणि मुली या युद्धात अडकल्या आहेत.
सद्य:स्थिती काय?
बॉम्ब हा महिला आणि पुरुषांमध्ये कधी भेदभाव करीत नाही, परंतु युद्धाचे गंभीर परिणाम महिला आणि मुलींना भोगावे लागतात. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी २० सशस्त्र संघर्षांमध्ये ३७ हजार सामान्य नागरिकांचा बळी गेला. त्यात दर पाचपैकी एक महिला होती. केवळ गाझाचा विचार करता युद्ध सुरू झाल्यापासून ते डिसेंबर २०२५ पर्यंत ३८ हजार महिला आणि मुली ठार झाल्या आहेत. याचबरोबर युद्धात पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, त्यात निवासी इमारतींचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक आहे.
परिणाम काय?
युद्धामुळे महिला आणि मुलींवर स्थलांतरित होण्याची वेळ येते. त्यातून शाळा सुटणे अथवा काम सोडावे लागण्याची वेळ त्यांच्यावर येते. याचबरोबर आरोग्यसुविधा न मिळणे आणि लैंगिक अत्याचाराची शिकार बनणे यांसारख्या संकटातून त्यांना जावे लागते. एखादा समुदाय पराभूत झाल्यानंतर मुले आणि वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी त्या समुदायातील महिलांवर येऊन पडते. ही जबाबदारी सांभाळत आणि भूक आणि गरिबीचा सामना करीत त्यांना जगण्याची लढाई लढावी लागते.
लैंगिक अत्याचारात किती वाढ?
गेल्या वर्षी युद्धाशी निगडित लैंगिक अत्याचाराच्या ९ हजार ३०० प्रकरणांची नोंद संयुक्त राष्ट्रांनी केली. त्याआधीच्या वर्षात तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे. तरीही हे केवळ हिमनगाचे टोक असू शकते, असा अंदाज आहे. कारण अनेक पीडित तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. लैंगिक अत्याचाराच्या नोंद झालेल्या एकूण घटनांमध्ये ९५ टक्के पीडित महिला व मुली आहेत. सुदानमध्ये यादवी युद्धाचे चौथे वर्ष सुरू असून, महिलांवर त्यांच्या घरात हल्ले केले जात आहेत अथवा त्या अन्न, पाणी, आरोग्यसेवेच्या शोधात असताना त्यांना लक्ष्य केले जात आहे. सुदानमध्ये अत्याचाराच्या बळी पडलेल्या महिलांनी मदत मागण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत दुपटीने तर युद्ध सुरू झाल्यापासून चार पटीने वाढले आहे. जगभरात २०२४ अखेरपर्यंत १ कोटी २३ लाखांहून अधिक जणांना युद्ध, संघर्ष आणि वांशिक युद्धामुळे स्थलांतरित व्हावे लागले.
आरोग्यसुविधांची वानवा?
केवळ गाझाचा विचार करता डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत तेथील ९४ टक्के रुग्णालयांचे नुकसान अथवा ती उद्ध्वस्त करण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रांचा अहवाल दर्शवतो. यामुळे महिलांना प्रसूतीसाठी आणि जखमींना उपचारांसाठी पुरेशा आरोग्यसुविधा सध्या उपलब्ध नाहीत. युद्धामुळे तिथे सात लाखांहून अधिक महिला व मुलींना मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक निगेसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होत नाहीत. याच वेळी त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणामही गंभीर आहे. अफगाणिस्तान, युक्रेन, गाझा आणि लेबनानमधील महिलांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढत आहेत, मात्र त्यांना मानसिक आरोग्य सुविधा फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
महिलांना कितपत स्थान?
शांतता चर्चा अथवा राजकीय निर्णय प्रक्रियेतून महिलांना बहुतांश वेळा वगळण्यात येते. जगभरात शांतता चर्चेत मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणार्यांमध्ये महिलांचे प्रमाण केवळ सात टक्के आहे. असे असले तरी युद्धग्रस्त भागात बचाव कार्यात महिला आघाडीवर असतात. सामुदायिक स्वयंपाक घरे, विस्थापित कुटुंबांना मदत आणि त्यांना आधार देण्याचे काम महिला करीत आहेत. आधुनिक युद्धात स्त्री-पुरुष भेदभाव दिसून येतो आणि त्यामुळे जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या पिढ्या उद्ध्वस्त होतात. यामुळे महिला व मुलींच्या संरक्षणासाठी जास्तीतजास्त संरक्षण, निधी आणि सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे.
sanjay.jadhav@expressindia.com
