चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले, पण त्यातील दहा चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात तीन बछड्यांचा समावेश आहे. तर आता नुकतेच एका मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. भारतातील चित्ता प्रकल्पासाठी ते आशेची किरण आहेत. मात्र, मागील तीन बछड्यांचा मृत्यू हा उन्हाळ्यातच झाला होता. आताही उन्हाळा तोंडावर असताना ते परिस्थितीशी कसे जुळवून घेतील, असा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुनोत बछडे जगण्याची शक्यता किती?

वाघ, बिबटे असो वा चित्ते यांच्यात बरेचदा पहिल्यांदा बछड्यांना जन्म दिल्यानंतर ते गमावण्याची शक्यता असते. मात्र, हाच अनुभव त्यांना अनेक गोष्टी शिकवून जातो. चित्त्यांचे बछडे आणि त्यांचे संगोपन यावरून दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. बछडे आणि त्यांच्या आईला संरक्षित अधिवासात वाढवणे त्यांना मान्य नाही. कुनोतील अधिकारी मात्र बछड्यांना जंगलात सोडण्यापूर्वी संरक्षित अधिवासात वाढवण्यावर ठाम आहेत. चित्ता तज्ज्ञांच्या मते बछड्यांचे संगोपन जंगलातील मोकळ्या अधिवासातच केले पाहिजे. कारण बंदिवासात असणारे चित्ते चांगली अनुवांशिकता टिकवून ठेवू शकत नाही आणि त्यांचा जनुक संचय कमकुवत होण्याची शक्यता असते. अशा वेळी मानवी हस्तक्षेपाची गरज भासते.

हेही वाचा : विश्लेषण : जसप्रीत बुमरा भारतासाठी इतका महत्त्वपूर्ण का? तो इतरांपेक्षा वेगळा कसा ठरतो? 

अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप कधी करावा?

‘ज्वाला’ या नामिबियन चित्त्याने मार्च २०२३ मध्ये चार बछड्यांना जन्म दिला. मात्र, उन्हाळ्यातील हवामान त्यांना मानवले नाही आणि तीन बछड्यांचा मे महिन्यात मृत्यू झाला. केवळ एकच बछडा जिवंत राहू शकला. आता पुन्हा एकदा कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांच्या बछड्यांचा जन्म झाला आहे. त्यामुळे उद्यानाचे अधिकारी त्यांच्यावर बारिक लक्ष ठेवून आहेत. जर मादी चित्ता बछड्यांकडे दुर्लक्ष करत असेल, त्यांची काळजी घेण्यास ती सक्षम नसेल तर या बछड्यांना तिच्यापासून दूर करून अधिकाऱ्यांना त्या बछड्यांचे संगोपन करावे लागेल.

मादी चित्ता आणि तिच्या बछड्यांना हाताळण्यासाठी ‘प्रोटोकॉल’ काय?

बछडे आईसोबत राहणे हे कधीही चांगले आहे. कारण मादी चित्त्यासोबत बछडा असेल तर शिकार कशी केली जाते, हे त्याला तिच्यासोबत राहून शिकता येईल. आईकडून बछड्यांना मिळणारा वारसा हे प्राधान्य आहे. ते मोठे झाल्यानंतर तिच्यापासून त्यांना दूर नेल्यास आईवरचाही ताण कमी होईल. बरेचदा मादी चित्ता तणावाखाली असते कारण आजूबाजूला मानवी हालचाली असतात. अशा वेळी माता होणार असलेल्या किंवा माता बनलेल्या मादी चित्त्याला तणावमुक्त ठेवण्यासाठी कुणालाही त्या परिसरात परवानगी देऊ नये. जेव्हा ते आठ आठवडा ते दोन महिन्याचे असतात, त्याकाळात त्यांना लस दिली जाते. त्यांची दृष्टी चांगली राहावी आणि हाडे मजबूत राहावीत यासाठी त्यांना व्हिटॅमिन ए, तांबे आणि कॅल्शियम यांसारखा पूरक आहार दिला जातो.

हेही वाचा : इन्फोसिसमुळे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक अडचणीत? नारायण मूर्तींच्या कंपनीला ब्रिटनमध्ये ‘व्हीआयपी प्रवेश’ देण्याचे प्रकरण काय आहे?

मादी चित्त्याची गर्भधारणा संशयास्पद असू शकते? असल्यास काय?

चित्ते साधारणपणे २६ ते ४० महिन्यांपर्यंत लैगिक परिपक्वता गाठतात. त्यानंतर लवकरच मीलन होऊन बछडे जन्माला येतात. ते मोठे होऊन स्वतंत्र झाले किंवा हरवले, तर त्यानंतरच पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. मादी चित्ता गर्भवती असल्यास अधिकारी काळजी घेतात. तिला चांगले अन्न मिळेल याची खात्री करतात. तिची आरोग्य तपासणी करतात. माता चित्त्याला कोणत्याही तणावाचा सामना करावा लागणार नाही याची खात्री करण्यासाठी कमीत कमी हस्तक्षेप करण्यावर भर दिला जातो. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या पद्धतीने काळजी घेतली जात आहे. कारण नर चित्त्याकडून भ्रुणहत्या समोर आल्याने अशी स्थिती माता होणाऱ्या मादी चित्त्यासाठी तणावपूर्ण असू शकते.

चित्त्यांच्या बछड्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे कोणते?

चित्त्यांचा गर्भधारणा कालावधी ९३ दिवसांचा असतो आणि एक मादी चित्ता एकाच वेळी एक ते सहा बछड्यांना जन्म देऊ शकते. जन्माच्या वेळी बछड्याचे वजन ८.५ ते १५ औंस असते. जन्मल्याबरोबर त्यांना दिसत नाही आणि अशा वेळी त्यांची आई त्यांचे पालनपोषण करते. शिकारीसाठी ती बाहेर पडते तेव्हा सहा ते आठ आठवडेपर्यंत बछड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवते. ती त्यांना नियमितपणे खाऊ घालते, पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असते. जेणे करून इतर मोठ्या शिकारी प्राण्यांना त्यांचा शोध लागू नये. यानंतर मात्र ते बछडे आईसोबत फिरू लागतात, पण हा काळ त्यांच्यासाठी तेवढ्याच धोक्याचा असतो. साधारण दहा बछड्यांपैकी एखादाच जिवंत राहतो. आईशिवाय त्यांच्या सुरक्षेचे आणखी एक साधन म्हणजे पाठीवर असणारे लांब केसांचे आच्छादन. ते त्यांना ऊबदार ठेवण्यासाठी आणि शिकाऱ्यापासून लपण्यासाठी मदत करतात.

हेही वाचा : ‘चारशेपार’च्या रणनीतीसाठी भाजप नव्या ‘मित्रां’च्या शोधात? पूर्वेपासून उत्तरेपर्यंत मोहीम….

चित्त्यांचे बछडे शिकार कोणत्या वर्षांपासून करतात?

चार ते सहा महिन्याचे असताना चित्त्यांचे बछडे खूप सक्रिय आणि खेळकर असतात. ते झाडांवरही चढू शकतात. ही त्यांची खेळकर वृत्ती त्यांना भविष्यात शिकारीसाठी मदतीची ठरू शकते. एवढेच नाही तर त्यांच्या मागावर कुणी शिकारी तर नाही ना, याचा मागोवा घेण्यास देखील मदत करते. साधारण एक वर्षाचे झाल्यानंतर बछडे त्यांच्या आईसोबत शिकार करू लागतात. शिकार शोधणे, पाठलाग करणे, शिकार पकडणे आणि गुदमरून मारणे यासारखी महत्त्वाची कौशल्ये शिकतात. साधारण १८ महिन्यांत ते त्यांच्या आईपासून वेगळे होतात. नर भावंडे जोडी बनवतात आणि एकत्र शिकार करतात, तर मादी चित्ते स्वतःची पिल्ले जन्माला येईपर्यंत एकाकी जीवन जगतात.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the newly born three cheetah cubs at kuno national park survive cheetah project challenges print exp css
First published on: 08-02-2024 at 08:39 IST