टेनिसमध्ये ‘लाइन कॉल’ पंचांचे काम काय?
‘लाइन कॉल’ म्हणून ओळखले जाणारे पंच हे चेंडू कोर्टच्या हद्दीत होता की नाही तसेच, ते चेंडू ‘इन’ (आत) आहे की ‘आऊट’ (बाहेर) याकडे लक्ष देतात. खेळाडू योग्य ‘सर्व्हिस ’ करतो का, याकडेही लाइन पंचांचे विशेष लक्ष असते. एखादा टेनिसपटू ‘सर्व्हिस’ करताना रेषेवर किंवा त्याहून पुढे गेल्यास त्याला ‘फुट फॉल्ट’ असे म्हटले जाते.
‘लाइन पंच’ऐवजी कोणते तंत्रज्ञान?
विम्बल्डन स्पर्धेत यंदापासून ‘इलेक्ट्रॉनिक लाइन-कॉलिंग’ (ईएलसी) तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत या आधीच तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे केवळ फ्रेंच खुली टेनिस स्पर्धाच आता चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एकमेव असेल, जेथे ‘लाइन पंच’चा वापर सुरू आहे. खेळाडूंनी घातलेले पांढरे किट वा चाहत्यांना दिल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीपासून ते मैदानावरील रोमहर्षक फुलापर्यंत, सर्वच ठिकाणी विम्बल्डन ही आपली परंपरा जपत आले आहे. मात्र प्रत्येक खेळातच आता तंत्राचा उपयोग नित्याचा झाला आहे. गेल्या वर्षीच २०२५ च्या विम्बल्डनमध्ये तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याची अंमलबजावणी आता होते आहे.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
यंदा २३ जूनपासून सुरू झालेल्या नि १३ जुलैपर्यंत चालणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत सोनी समूहाची उपकंपनी असलेल्या हॉक-आय इनोव्हेशन्सच्या सौजन्याने इलेक्ट्रॉनिक लाइन-कॉलिंग (ईएलसी) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे ‘लाइन कॉल’चा निर्णय पूर्णपणे कॅमेऱ्याद्वारे दिला जात आहे. इंग्लंडमधील बेसिंगस्टोक ही कंपनी बेसबॉल आणि फुटबॉलसह २५ खेळांमध्ये खेळाचे विश्लेषण आणि पंचांच्या मदतीसाठी चेंडूचा मार्ग निश्चित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. करोनाकाळात अनेक पंचांनी राजीनामा दिल्याने पंचांची संख्या कमी पडू लागल्याचे कारण यासाठी दिले जात आहे. मात्र, यानंतरही उपलब्ध पंच तंत्राच्या वापराबाबत संताप व्यक्त करत आहेत. सोनीने २०११ मध्ये ‘हॉक-आय’ विकत घेतले. त्यांच्या पद्धतीनुसार कॅमेरा चेंडू कुठे पडतो आणि ‘सर्व्हिस’दरम्यान खेळाडूच्या पायांची स्थिती त्वरित निर्धारित करते. स्पर्धेसाठी एका कोर्टवर एकूण १२ कॅमेरे आहेत, तर सर्व कोर्टवर मिळून ४५० हून अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे यंदा ३०० पंचांची संख्या ८० पर्यंत कमी करण्यात आली. यापैकी दोन जण प्रत्येक कोर्टवर यंत्रणा बंद पडल्यास मदत करतील.
संचालक कसे काय राजी झाले?
‘‘गेल्या काही वर्षांतील बदल आम्हाला दिसत होता. आमचा प्रयत्न नेहमीच परंपरेचा आणि नावीन्यतेचा योग्य समतोल साधण्याकडे असतो. ‘विम्बल्डन’साठी हे तंत्रज्ञान हे सकारात्मक पाऊल आहे,’’ असे ‘विम्बल्डन’चे स्पर्धा संचालक जेमी बेकर म्हणाले. ‘विम्बल्डन’ आपला वारसा जपण्यासाठी काळजीपूर्वक कार्य करीत आहे. यामध्ये पांढऱ्या कपड्यांच्या नियमाचा समावेश आहे. हा नियम दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत आता काटेकोरपणे पाळला जातो. खेळाडू या (ईएलसी) नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतील, कारण त्यांना त्याची सवय आहे, असे बेकर यांनी नमूद केले.
तंत्रज्ञानाबाबत खेळाडूंचे मत काय?
ब्रिटनचा आघाडीचा टेनिसपटू जॅक ड्रेपरला क्वीन्स क्लबमधील सामन्याच्या ‘सेट पॉइंट’दरम्यान गर्दीच्या आवाजामुळे देण्यात आलेला निर्णय ऐकू आला नाही. अन्य खेळाडू सोनय कार्टललाही ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये या तंत्रज्ञानाबाबत अडचणी आल्या होत्या. लगतच्या कोर्टवरून घोषणा (ऑटोमेटेड कॉल्स) ऐकू येत असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि खेळाडूंना अनावश्यकपणे पॉइंट्स थांबवावे लागले. ‘योग्य वेळी तंत्रज्ञानाने पंचांची पूर्णपणे जागा घेतली पाहिजे,’ असे विख्यात टेनिसपटू जॉन मॅकेन्रो यांना वाटते. टेनिसच्या सर्वोच्च स्तरावरील सामन्यांचे निरीक्षण करणारे चेअर पंच थॉमस स्वीनी यांच्या मते, मानवी पंच हा या खेळाचा अविभाज्य भाग आहे. ‘‘तंत्रज्ञानाच्या मर्यादा पाहता, मदत करण्यासाठी नेहमी कुणा माणसाचीच गरज भासेल. आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांसाठी तयार राहता येत नाही. खेळाडूला समजून घेण्यासाठी तेथे एक सक्षम व्यक्ती असणेच आवश्यक आहे,’’ असे स्वीनी यांना वाटते.sandip.kadam@expressindia.com