Who Was Wing Commander Namansh Syal : भारताचे बहुचर्चित तेजस लढाऊ विमान दुबईतील एका एअर शोदरम्यान कसरती सादर करताना शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली. विंग कमांडर नमांश सियाल (वय ३७) असे मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकाचे नाव आहे. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. हवाई दलातर्फे या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोण होते नमांश सियाल? ते भारतीय हवाई दलात कसे सामील झाले होते? अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी काय सांगितले? त्याविषयीचा हा आढावा…

दुबईत तेजस विमानाचा अपघात कसा झाला?

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुबईत लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी एअर शो आयोजित करण्यात आला होता. भारताचे बहुचर्चित तेजस लढाऊ विमानानेही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ‘तेजस’ची प्रात्याक्षिके दाखविण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांच्याकडे देण्यात होती. त्यादरम्यान दुपारी २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास आठ मिनिटांचे प्रात्यक्षिक सादर करीत असताना तेजस विमान दुर्घटनाग्रस्त झाले. प्रत्यक्षदर्शींच्या व्हिडीओनुसार, विमान कमी उंचीवर एक कौशल्यपूर्ण कृती करताना अचानक खाली आले आणि वेगाने जमिनीवर आदळले, ज्यामुळे मोठा स्फोट होऊन आगीचे आणि धुराचे लोळ उठले. वैमानिकाला विमान कोसळण्यापूर्वी झटक्यात बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

कोण होते नमांश सियाल?

तेजस विमान अपघातात शहीद झालेले नमांश सियाल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे वडील जगन्नाथ सियाल हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. नमांश यांनी आपले शालेय शिक्षण जिल्ह्यातील सैनिकी शाळेतून पूर्ण केले. २४ डिसेंबर २००९ रोजी त्यांची भारतीय हवाई दलात नियुक्ती झाली. नमांश यांच्या पत्नीदेखील भारतीय हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सहा वर्षांची छोटी मुलगी असून, ती सध्या शिक्षणानिमित्त आजी-आजोबांकडे राहते. हवाई दलाचे एक अत्यंत शूर आणि कुशल वैमानिक म्हणून नमांश यांची ओळख होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा : Stomach Cancer : मसालेदार पदार्थांमुळे वाढतो पोटाच्या कॅन्सरचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; काय सांगतात तज्ज्ञ?

तेजस विमान चालवण्याचा होता अनुभव

नमांश स्याल यांच्याकडे एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे स्वदेशी लढाऊ विमान जगाला दाखविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुरुवातीलाच भारतीय हवाई दलातील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. नमांश यांना ‘तेजस’सारखे बहुचर्चित लढाऊ विमान चालवण्याचा दीर्घकालीन अनुभव होता. दुबईतील एका एअर शोमध्येही त्यांच्याकडे तेजस विमानाचे प्रात्याक्षिक दाखविण्याची जबाबदारी होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या विमान दुर्घटनेने जागतिक विमानचालन प्रदर्शनाचे रूपांतर शोकसभेत केले. तेजस विमान अपघातात नमांश यांचे निधन झाल्यानंतर दी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने त्यांचे वडील जगन्नाथ सियाल यांच्याशी संवाद साधला.

नमांश यांच्या वडिलांनी काय सांगितलं?

“गुरुवारी (२० नोव्हेंबर) माझे त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. नमांशने मला टीव्ही किंवा यूट्यूबवर त्याचा एअर शो पाहण्यास सांगितले होते. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता मी यूट्यूबवर एअर शोचा व्हिडीओ शोधत होतो. तेव्हाच मला भारताचे तेजस विमान कोसळल्याची बातमी दिसली. त्यानंतर मी ताबडतोब माझ्या सुनेला फोन केला आणि काय झाले याची विचारणा केली. माझी सूनदेखील हवाई दलात विंग कमांडर आहे. काही वेळेतच हवाई दलाचे सहा अधिकारी आमच्या घरी आले आणि काहीतरी गंभीर घडल्याचे मला समजले,” अशी माहिती जगन्नाथ सियाल यांनी दिली.

संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. “दुबई येथील एअर शोमध्ये हवाई प्रात्यक्षिकादरम्यान भारतीय हवाई दलाच्या एका धाडसी पायलटचे निधन झाल्याची बातमी अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. या कठीण प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे”, अशा भावना राजनाथ सिंह यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून व्यक्त केल्या. भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल चौहान व भारतीय सशस्त्र दलातील सर्व अधिकाऱ्यांनी तेजस विमान दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Japan China Conflict : जपान आणि चीनमधील तणावाचा भारताला कसा झाला फायदा? अमेरिकेच्या टॅरिफचे टेन्शन मिटणार?

तेजस विमानाची वैशिष्ट्ये काय?

‘तेजस एम के वन’ म्हणून ओळखले जाणारे लढाऊ विमान इंजिन वगळता पूर्णपणे देशी बनावटीचे आहे. भविष्यात हे विमान भारतीय हवाई दलाचा कणा ठरणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून या विमानांची निर्मिती होत असून, सध्या त्याच्या दोन तुकड्या कार्यरत आहेत. पुढील काळात या बनावटीची आणखी १८० विमाने हवाई दलाला मिळणार आहेत; परंतु या प्रक्रियेत विलंब होत आहे. यंदा सप्टेंबरमध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाने ९७ तेजस विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. २०२७ मध्ये या विमानांची तुकडी भारतात येण्याची अपेक्षा आहे. याआधी २०२१ मध्ये भारत सरकारने ८३ तेजस विमानांचा करार केला होता. त्यानुसार ही विमाने २०२४ पर्यंत भारतात येणे अपेक्षित होते. परंतु, अमेरिकेतून आयात होणाऱ्या इंजिनांच्या तुटवड्यामुळे ही प्रक्रिया लांबल्याचे सांगितले जात आहे.