थंडी वाढली की गरमागरम वरण-भात, तूप लावलेली पोळी, पराठे किंवा चीजी पास्ता खाण्याची तुम्हालाही तीव्र इच्छा होतेय. इतर वातावरणात जेवणावर नियंत्रण ठेवूनही हिवाळ्यात मात्र अशा पदार्थांकडे खास आकर्षित होताय. पोट भरलेलं असतानाही काहीतरी गरम खावंसं वाटतं. पण असं का होतं? थंडी पडली म्हणून शरीराला अधिक कर्बोदकांची (Carbohydrates) गरज असते का? की बदललेलं हवामान, मन:स्थिती, भूक आणि गरम पदार्थांमधून मिळणारा आराम यामुळे आपल्याला विशिष्ट पदार्थ खावेसे वाटतात? जाणून घ्या यामागील कारणे
गरम आणि पोटभरीचे पदार्थ खाण्याची इच्छा का वाढते?
थंडीच्या दिवसांत गरमागरम वरण-भात, पराठे, खीर, लापशी किंवा वाफाळत्या पदार्थांवर ताव मारण्याची मजा काही औरच असते. अशा पदार्थांमुळे केवळ पोट भरत नाही, तर थंडीपासून थोडा दिलासाही मिळतो. शिवाय, आपल्या खाण्याच्या आवडीनिवडींवर लहानपणीच्या आठवणी, घरातील खाद्यसंस्कृती आणि सवयींचाही प्रभाव असतो. त्यामुळे नेहमीच्या दिवसांत फारशी इच्छा न होणारे पदार्थही हिवाळ्यात खावेसे वाटू शकतात.
भारतात तर ऋतूनुसार काही खास पदार्थ खाल्ले जातात. हिवाळ्यात बनवले जाणारे मक्याची रोटी, गाजराचा हलवा यांसारखे अनेक खास पदार्थ लहानपणापासूनच्या आवडींशी जोडलेले असतात. तसेच सण, कौटुंबिक मेळावे आणि एकत्र जेवण्याच्या प्रसंगांमध्ये या खास पदार्थांची मेजवानी असते. त्यांचा सुगंध आणि चव यामुळे भूक नसतानाही ते खाण्याचा मोह होऊ शकतो.
हिवाळ्यात आपल्या भूकेवर आणि मूडवर काय परिणाम होतो?
हिवाळ्यात दिवस लहान होतात आणि यामुळे आपल्याला खुला सूर्यप्रकाश मिळण्याचा वेळही कमी होतो, याचा आपल्या झोपेवर आणि मूडवर परिणाम होऊ शकतो. ऋतू बदलामुळे काही लोकांमध्ये थकवा जाणवणे, कामातील उत्साह कमी होणे किंवा कामात मन न लागणे असे बदल दिसून येतात, याचा खाण्यापिण्याच्या निवडीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही जणांना या काळात नेहमीपेक्षा जास्त कर्बोदकयुक्त असलेले पदार्थ खावेसे वाटतात. मूड नियंत्रित करण्यास मेंदूतील सेरोटोनिन हे रसायन छुपी भूमिका बजावतं.
कर्बोदकंयुक्त पदार्थ खाल्ल्याने ट्रिप्टोफॅन या अमिनो आम्लाच्या शरीरातील उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. ट्रिप्टोफॅन हे ‘सेरोटोनिन’ (Serotonin) न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करते, तर सेरोटोनिनमुळे आपला मूड नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र, कर्बोदके खाल्ल्याने मूड लगेच सुधारतो किंवा सेरोटोनिनची निर्मिती वाढतेच, असे नाही. कर्बोदकंयुक्त पदार्थ आणि मूड यांच्यातील संबंध थोडा गुंतागुंतीचा आहे.
काही लोकांना ऋतूबदलादरम्यान मूड, झोप, भूक आणि ऊर्जेच्या पातळीत बदल झाल्याचे जाणवतात. काही वेळा ‘सीझनल अफेक्टिव्ह डिसॉर्डर’ (SAD) या नैराश्याच्या प्रकारामुळे अशी लक्षणे जाणवू शकतात. हा त्रास वर्षातील ठरावीक ऋतूमध्येच जाणवतो, असा समज करुन घेणे चुकीचे आहे.
थंडीत शरीराला जास्त कार्बोहायड्रेट्सची गरज भासते का?
कर्बोदकं हे शरीराला ऊर्जा देणारे प्रमुख घटक आहेत. आपण कर्बोदकं असलेले पदार्थ खातो, तेव्हा पचनानंतर त्यांचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. शरीरातील पेशी या ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी करतात.
थंडीत शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च होऊ शकते. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये शरीराला नेहमीपेक्षा जास्त कॅलरीजची गरज भासते. मात्र, तापमान किती कमी आहे, आपण कोणते कपडे घातले आहेत, किती शारीरिक हालचाल करतो आणि किती वेळ थंड वातावरणात राहतो, यावर अवलंबून असतं. घरात किंवा ऑफिसमधील वातावरणात वेळ घालवल्याने शरीराला जास्त कॅलरीजची गरज असतेच असे नाही.
जे लोक बराच वेळ बाहेरच्या थंड वातावरणात शारीरिक कष्टाचे काम करतात, त्यांना अधिक ऊर्जेची गरज भासू शकते. त्यामुळे त्यांना जास्त भूक लागू शकते. मात्र, अशावेळी शरीराला फक्त कर्बोदकांचीच गरज असते, असा अर्थ होत नाही.
झोप आणि शारीरिक हालचालींचाही भुकेवर परिणाम होतो का?
खाण्याच्या सवयी बदलण्यामागील आणखी एक कारण म्हणजे हिवाळ्यातील दिनचर्या. दिवस लहान झाल्याने बाहेर जाण्याचं आणि शाेरीरिक हालचालींचं प्रमाण कमी होऊ शकतं. थंडीमुळे सकाळी लवकर उठणंही कठीण होतं त्यामुळे झोपेची वेळ वाढते ज्याचा आपल्या खाण्याच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, आणि मध्येच काही पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा जाणवते. मात्र, हिवाळ्यात प्रत्येकाच्याच खाण्याच्या सवयी बदलतात असे नाही. काहींना या दिवसांत नेहमीपेक्षा जास्त भूक लागते, तर काहींच्या भुकेत फारसा फरक जाणवत नाही.
मात्र कर्बोदकं खाण्याची इच्छा वाढणं आरोग्यासाठी घातक आहे का?
हिवाळ्याच्या दिवसांत अधूनमधून एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होणं ही सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे लगेच काळजी करण्याची गरज नाही, ही कोणतीही आरोग्य समस्या नाही. कर्बोदकं शरीराला ऊर्जा देतात. धान्य, फळं, भाज्या आणि डाळी यांसारख्या पदार्थांतून कर्बोदकांसोबतच फायबर आणि इतर पोषक घटकही मिळतात. मात्र, तुम्ही कोणत्या कर्बोदकांचे याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. गोड पदार्थ आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ वारंवार खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेल्या फायबर, प्रथिने आणि इतर पोषक घटकांचे सेवन कमी होते.
त्यामुळे कर्बोदकं पूर्णपणे बंद करण्याऐवजी आहारात योग्य पदार्थांचा समावेश करावा. पोळी-भाजीसोबत डाळ, भातासोबत उसळी किंवा ओट्समध्ये सुका मेवा आणि बिया (सीड्स) घालून गोड पदार्थ बनवता येतात. अशा पदार्थांमुळे पोटही भरतं आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळतं. यासोबत वेळेवर जेवणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
