माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडच्या संचालक मंडळाने १५,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेची गुरुवारी घोषणा केली. मात्र सामान्य गुंतवणूकदारांच्या हाती नेमकं काय लागणार आहे ते जाणून घेऊया.
समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?
एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे.
कंपन्या ‘बायबॅक’ का करतात?
कंपन्यांकडून शेअर बायबॅक केली जाण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा कंपन्यांच्या ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असते. बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमानुसार, एका ठरावीक कालावधीत कंपन्यांना शिल्लक गंगाजळीचा विविध उद्देशांसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी वापर करावाच लागतो आणि त्याव्यतिरिक्तदेखील ठरावीक काळ कंपनीकडे अतिरिक्त निधी पडून असल्यास कंपनीला लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये तो वितरित करावा लागतो. शिवाय लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला जातो.
विप्रोची शेअर बायबॅक योजना काय?
आयटी अग्रणी विप्रो लिमिटेडच्या संचालक मंडळाने १५,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेची घोषणा केली आहे. गुरुवारच्या सत्रातील शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीच्या भागधारकांना यातून त्यांच्याकडील समभागावर १९ टक्के लाभ मिळविता येणार आहे. विप्रोच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या योजनेनुसार, कंपनीकडून सुमारे ६० कोटी समभाग प्रत्येकी २५० रुपये किमतीला खरेदी केले जाणार आहेत. म्हणजेच समभागाच्या गुरुवारच्या बीएसईवरील २१०.२० रुपये बंद भावाच्या तुलनेत १९ टक्के अधिमूल्य भागधारकांना मिळेल. ही विप्रोची आतापर्यंतची सर्वात मोठी बायबॅक योजना आहे. भागधारकांची मंजुरी मिळाल्यास, २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
बायबॅक लाभकारी ठरणार?
भागधारकाची प्रत्यक्ष किती कमाई होईल, हे प्रामुख्याने त्याच्याकडील किती शेअर बायबॅक प्रक्रियेत स्वीकारले जातात, यावर अवलंबून असेल. आदर्श परिस्थितीत (जिथे सर्व शेअर स्वीकारले जातील), ५०, १०० आणि ५०० शेअर असलेल्या एखाद्या वैयक्तिक भागधारकाला अनुक्रमे २,००० रुपये, ४,००० रुपये आणि २०,००० रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे. याची गणना अत्यंत साध्या पद्धतीने केली जाते. बायबॅकचा दर २५० रुपये आहे, तर सध्याचा बाजारातील भाव (market price) सुमारे २१० रुपये आहे. यातील फरक ४० रुपये प्रति शेअर इतका आहे. त्यामुळे, जर सर्व शेअर स्वीकारले गेले तर, ५० शेअर × ४० रुपये = २,००० रुपये; १०० शेअर × ४० रुपये = ४,००० रुपये; ५०० शेअर × ४० रुपये = २०,००० रुपये.
प्रत्यक्ष कमाई कमी का असते?
कंपनीकडून बायबॅकच्या माध्यमातून शेअर स्वीकारले खरेदी केले जाण्याचे प्रमाण अर्थात स्वीकृतीचे प्रमाण हे भागधारकाच्या अपेक्षांपेक्षा बऱ्याचदा खूपच कमी असते. किरकोळ गुंतवणूकदारांच्या बाबतीत हे प्रमाण प्रामुख्याने १५ टक्के ते २५ टक्क्यांच्या दरम्यान असते. स्वीकृतीचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे गृहीत धरल्यास, त्याच भागधारकांना करापूर्वीचा नफा अनुक्रमे सुमारे ४०० रुपये, ८०० रुपये आणि ४,००० रुपये इतका दिसून येईल.
कारण १०० शेअर असतील आणि त्यापैकी केवळ २० टक्के शेअर स्वीकारले गेले, तर केवळ २० शेअरचीच ‘बायबॅक’द्वारे (पुनर्खरेदीद्वारे) खरेदी केली जाते. अशा वेळी, नफा हा २० × ४० रुपये = ८०० रुपये इतका होतो, ४,००० रुपये नव्हे.
पुनर्खरेदी समभागांबाबत निर्णय काय?
कंपन्यांनी भागधारकांहाती असलेले समभाग खरेदी केले (बायबॅक) तर त्यावर त्या भागधारकांना २०१३ पर्यंत कर भरावा लागत नव्हता. २०२० पासून ही तरतूद शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांसाठीसुद्धा लागू करण्यात आली. मात्र १ ऑक्टोबर २०२४ नंतर समभाग खरेदी (बायबॅक) केल्यास भागधारकासाठी त्यावरील लाभ करपात्र करण्यात येऊन ते ‘लाभांश’ समजण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. आता आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात समभाग पुनर्खरेदीला (बायबॅक) रकमेला भांडवली नफा म्हणून गृहित धरून सर्वच भागधारकांना कर कक्षेत आणले आहे. समभागाच्या पुनर्खरेदीवरील कराचे सुलभीकरण करण्यासाठी हा बदल करण्यात आला. याआधी समभाग पुनर्खरेदीवर मिळालेली रक्कम लाभांश उत्पन्न ठरत होती. पण १ एप्रिल २०२६ पासून भांडवली नफा या शीर्षकाखाली ती करपात्र असेल. शिवाय बायबॅक योजना आणणाऱ्या प्रवर्तकांवर कर लावण्यात आला आहे. देशी कंपन्यांच्या प्रवर्तकांना २२ टक्के, तर परदेशस्थ प्रवर्तकांना ३० टक्के दराने कर भरावा लागेल.
किती कर आकारला जाणार?
जर बायबॅकच्या माध्यमातून ८०० रुपयांचा नफा झाला असेल, तर त्यापैकी सुमारे १६० रुपये करापोटी वजा होऊ शकतात. परिणामी, हाती साधारणपणे ६४० रुपये उरतात. त्याचप्रमाणे, ४,००० रुपयांचा नफा कराची वजावट झाल्यानंतर सुमारे ३,२०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. याचा अर्थ असा की, कागदोपत्री किंवा वरकरणी दिसणाऱ्या मोठ्या आकड्यांच्या तुलनेत, प्रत्यक्ष कमाई अर्थात लाभ ही कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘बायबॅक’ प्रक्रियेत जे शेअर स्वीकारले जात नाहीत, ते डिमॅट खात्यामध्येच पडून राहतात आणि त्यांना बाजारातील चढ-उतारांच्या जोखमीचा सामना करावा लागतो. बाजारातील परिस्थितीनुसार, या उर्वरित शेअरच्या किमतीत वाढ किंवा घट होऊ शकते; त्यामुळे, ‘बायबॅक’ प्रक्रियेत सहभागी होऊनही, गुंतवणुकीबाबतची अनिश्चितता मात्र कायम राहते. थोडक्यात समभाग स्वीकारले जाण्याचे प्रमाण (प्रमाण) वाढल्यास अधिक लाभ शक्य आहे. बायबॅकची किंमत आणि आकारमान पाहता ते आकर्षक वाटत असले तरी बहुतांश गुंतवणूकदारांना यातून केवळ किरकोळच फायदा मिळणार आहे.
