Silent heart attack in women गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, हृदयविकाराचा धोका केवळ वयस्करांनाच नाही, तर तरुणांनाही आहे. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, पाश्चात्त्य देशांतील लोकांच्या तुलनेत भारतीयांना हृदयविकार सुमारे १० वर्षे आधीच जडण्याची शक्यता असते. परंतु, आता महिलांमध्येही सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काय आहेत यामागील कारणे? सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे कोणती? धोका टाळण्यासाठी काय करावे? जाणून घेऊयात…

हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितला अनुभव

बंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ व वैद्यकीय संचालक डॉक्टर रंजन शेट्टी यांनी त्यांच्या रुग्णालयात आलेल्या महिला रुग्णांच्या आजारपणाविषयी सांगितले. ३७ वर्षीय गायत्री नावाची महिला गॅस्ट्रो ओपीडीत आली, तेव्हा तिला वाटले की, तिच्या पोटात काहीतरी बिघाड झाला आहे. तिला छातीत जळजळ होत होती, पोटात वारंवार गच्च वाटत होते आणि पाठीत सौम्य वेदना जाणवत होती. तिला वाटले की, हे शरीरात गॅस झाल्यामुळे होत असावे.

मुख्य म्हणजे तिला यापूर्वी असा अनुभव कधीच आला नव्हता आणि तिला वाटले की, हे वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल आहेत. गॅस्ट्रो डॉक्टरांनी तिला ‘ईसीजी’ आणि ‘ट्रोपोनिन’ टेस्ट करायला सांगितली. ट्रोपोनिन टेस्ट ही हृदयाच्या स्नायूंच्या नुकसानीमुळे निर्माण होणारे विशिष्ट प्रथिन शोधण्यासाठी केली जाते. तिचा ईसीजी नॉर्मल आला; पण ट्रोपोनिन टेस्टमध्ये तिला आधीच हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे दिसून आले.

गायत्रीला छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, उलट्या, अशी लक्षणे जाणवत नव्हती. हीच हार्ट अटॅकची मुख्य लक्षणे मानली जातात. तिचा रक्तदाबही सामान्य होता, तिचे नाडीचे ठोके ८६ होते, तिच्या ‘लेफ्ट अँटीरियर डिसेंडिंग’ (एलएडी) आर्टरीमध्ये ब्लॉकेज नव्हते. ही हृदयाच्या मुख्य कक्षांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवणारी सर्वांत मोठी रक्तवाहिनी आहे. स्टेंट टाकून ब्लॉकेज काढल्यानंतर केलेल्या सखोल तपासणीत असे आढळले की, तिला ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (पीसीओएस) होता. पीसीओएसमध्ये अनेकदा इन्सुलिन रेझिस्टन्स, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल व लठ्ठपणा यांचा समावेश असतो. हे सर्व हृदयविकारासाठी जोखमीचे घटक आहेत. तसेच तणाव, धूम्रपान व मद्यपान हेदेखील त्यासाठी जबाबदार आहेत.

महिलांमधील हार्ट अटॅकचा धोका

डॉक्टर रंजन शेट्टी सांगतात, १५ ते ४९ वयोगटातील पाचपैकी एका भारतीय महिलेला उच्च रक्तदाब आहे. जोपर्यंत महिला चाळिशी ओलांडत नाहीत किंवा त्यांना डॉक्टरांकडे जावे लागेल, अशी गंभीर स्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत त्या स्वतःची तपासणी करून घेत नाहीत. तरीही जागतिक स्तरावर महिलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण हृदयविकार आहे. हे प्रमाण स्तनाच्या कर्करोगापेक्षाही अधिक आहे. मधुमेह असलेल्या ३० वर्षीय महिलेला, त्याच वयोगटातील मधुमेह असलेल्या पुरुषाच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

साधारणपणे रजोनिवृत्तीपर्यंत इस्ट्रोजेन हार्मोनमुळे हृदयविकारापासून काही प्रमाणात संरक्षण मिळते. परंतु, जेव्हा व्यक्तीची चुकीची जीवनशैली व उच्च जोखमीचे घटक त्यामागे असतात, तेव्हा हे संरक्षण परिपूर्ण नसते. तरीही हृदयाच्या आरोग्यावरील बहुतेक संशोधन हे पुरुषांना झालेल्या हृदयविकाराचा अभ्यास, त्यांची कारणे आणि त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या लक्षणांवर आधारित आहे.

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे

महिलांना असामान्य थकवा जाणवू शकतो. अनेकदा त्या या थकव्याला तणाव समजून, त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना छातीत श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांच्या जबड्यात, मानेत किंवा पाठीत सौम्य वेदना जाणवू शकतात. त्या वेदनेला महिला स्नायूंवर आलेला ताण समजण्याची चूक करतात. याच कारणामुळे महिलांमधील हार्ट अटॅक ‘सायलेंट’ मानले जातात. डॉक्टर रंजन शेट्टी सांगतात, “म्हणूनच मी माझ्या रुग्णांना सांगतो की, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे कोणतेही लक्षण जाणवेल तेव्हा हृदयाची प्राथमिक तपासणी नक्की करून घ्या. मी असे म्हणत नाही की, ही लक्षणे म्हणजे हार्ट अटॅकच असतील; पण खात्री करून घेण्यासाठी तपासणी करणे गरजेचे आहे.”

डॉक्टर रंजन शेट्टी पुढे सांगतात, “पोटात दुखत असल्यास, थकवा जाणवत असल्यास, अचानक कळ येत असल्यास किंवा सतत घाम येत असल्यास त्याकडे गॅस, स्नायू दुखणे किंवा हार्मोनल बदल म्हणून दुर्लक्ष करू नका. हे हृदयाच्या आपत्कालीन स्थितीचे संकेत असू शकतात.”

महिलांमधील हार्ट अटॅक घातक का असतात?

पुरुषांमध्ये बहुतेक हार्ट ब्लॉक्स ‘प्लाक रप्चर’मुळे होतात. याचाच अर्थ असा की, रक्तवाहिनीतील चरबीवर जखम होते आणि त्या जखमेवर रक्ताची गाठ तयार होते. परंतु, महिलांमध्ये ही समस्या ‘प्लाक इरोजन’मुळे निर्माण होते. या स्थितीत चरबीच्या थराचा एक भाग खराब होतो आणि तिथे प्लेटलेट्स जमा होऊन रक्ताची गाठ तयार होते. याच कारणामुळे महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे सौम्य असतात.

जर यावर वेळेत उपचार केले नाहीत, तर त्यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तरुण महिलांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी जास्त असते. त्यामुळे धमन्यांमधील चरबीच्या थराच्या रचनेवर परिणाम होतो आणि ते रप्चर होण्याऐवजी इरोजन होण्यास अधिक प्रवृत्त होतात. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या महिलांना याचा धोका अधिक असतो.

नियमित तपासणीद्वारे हार्ट अटॅक कसा टाळावा?

डॉक्टर रंजन शेट्टी सांगतात की, महिलांनी आपल्या जोखमीच्या घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी वयाच्या २० व्या वर्षापासून नियमित रक्त तपासणी केली पाहिजे. जर कौटुंबिक इतिहास असेल, तर वयाच्या ३० व्या वर्षी आणि नसेल, तर वयाच्या ४० व्या वर्षी ईसीजी, इको, स्ट्रेस टेस्ट व कॅल्शियम स्कोरिंग यांसारखी हृदय तपासणी करून घेतली पाहिजे.

महिलांमधील हृदयविकाराचे आजही निदान होत नाही किंवा खूप उशिरा निदान होते. महिलांमध्ये याची लक्षणे वेगळी आणि गोंधळात टाकणारी असतात. त्यामुळे डॉक्टरांकडूनही ती दुर्लक्षित होण्याची शक्यता जास्त असते. महिलांनी आपल्या हृदयाच्या आरोग्याला गृहीत धरणे थांबवले पाहिजे. त्यांनी जीवनशैलीतील बदलांबरोबरच नियमित चाचण्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही डॉक्टर शेट्टी सांगतात.