एमी इसाबेल नावाची चिमुकली गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रियेतून जन्माला आलेली यूकेमधील पहिली मुलगी ठरली आहे. या प्रक्रियेतून जगभरात जन्माला आलेल्या ६५ मुलांपैकी एमी ही एक आहे. गर्भाशयासंबंधित समस्या असणाऱ्या आणि वंध्यत्वाने ग्रस्त असलेल्या सुमारे १५ हजार यूकेतील महिलांसाठी ही प्रक्रिया आशा देणारी ठरत आहे. गर्भाशयासंबंधित समस्यांमुळे अनेक जोडप्यांना नैसर्गिकरित्या मुलं होत नाहीत. दत्तक घेणे, सरोगसी किंवा आयव्हीएफ असे पर्याय नक्कीच त्यांच्यासमोर आहेत. मात्र, त्यापलीकडे जात यापैकी काहीच शक्य नसलेल्या जोडप्यांसाठी गर्भाशय प्रत्यारोपण हा पर्याय महत्त्वाचा ठरत आहे. दरम्यान, याबाबत बोलताना ही नवीन उपचारपद्धती कशी उपलब्ध करून दिली जाईल, गर्भाशय कसे मिळवले जाईल आणि उपचार कोणाला मिळू शकतात तसेच याचा खर्च याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…

गर्भाशय प्रत्यारोपणाचा खर्च किती?
गर्भाशय प्रत्यारोपणातून पहिल्या अपत्याचा जन्म २०१४ मध्ये स्वीडन येथे झाला होता. तेव्हापासून जगात विविध ठिकाणी गर्भाशय प्रत्यारोपणाच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या १२ वर्षांत या उपचार पद्धतीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या प्रक्रियेत गर्भाशय दान करणारी महिला किंवा मृत दात्याकडून गर्भाशय मिळवता येऊ शकते. त्यामध्ये रोबोटिक पद्धतीचा वापरही शस्त्रक्रियेसाठी करता येऊ शकतो. त्यामुळे जलद गतीने गर्भाशय प्रत्यारोपण, तसेच ते अधिक अचूक पद्धतीने करता येणे शक्य आहे. बहुतेक प्रत्यारोपण केंद्रे ही प्रक्रिया केवळ संशोधन चाचण्यांचा भाग म्हणून करतात; तर काही खासगी दवाखान्यांमध्येही ही प्रक्रिया केली जाते. यूकेमधील गर्भाशय प्रत्यारोपण मोहीम सध्या वॉम्ब ट्रान्सप्लांट यूकेअंतर्गत धर्मादाय देणग्यांद्वारे दिलेल्या निधीमार्फत चालवली जात आहे. सध्या केवळ १५ जिवंत दात्यांच्या प्रक्रियांसाठी निधी देण्याची योजना त्यांच्याकडे आहे. ही उपचारपद्धती खूप महाग आहे. धर्मादाय संस्थेकडून अंदाजे २१,२८,३७५ इतकी रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे ही रक्कम केवळ प्रत्यारोपणासाठीची किंमत आहे. त्यामध्ये आयव्हीएफ उपचार, औषधे आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी यांसारख्या अनेक खर्चांचा समावेश नाही.

सध्या संभाव्य रुग्ण आयव्हीएफ उपचारांचा खर्च स्वत: उचलतात. प्रत्यारोपणासाठी पात्र होण्यासाठी महिलांनी सुरुवातीला किमान पाच गर्भ (एम्ब्रीयो) तयार करणे आणि साठवणे आवश्यक आहे. प्रत्यारोपित गर्भाशय रुग्णाच्या अंडाशयाशी जोडले जाऊ नये यासाठी आयव्हीएफ आवश्यक आहे. गर्भाशय प्रत्यारोपण एनएचएस (National Health Service) मध्ये नियमित उपलब्ध होण्याआधी या उपचारासाठी सार्वजनिकरीत्या निधी दिला पाहिजे की नाही आणि दिला, तर तो कोणत्या परिस्थितीत हे मात्र आयुक्तांना ठरवावे लागेल.

रुग्णांची स्वायत्तता आणि उत्तम आरोग्यासाठी सार्वजनिक निधी देणं योग्य वाटतं. वंध्यत्वाचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. नैराश्य, चिंता, ताण आणि आयुष्याची घटलेली गुणवत्ता या घटकांना गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. दरम्यान, एनएचएसची संसाधनं मर्यादित आहेत आणि आय़व्हीएफशी संबंधित पोस्ट कोड लॉटरी आधीपासूनच आहे. इंग्लंडच्या काही भागांत लोकांना एनएचएस उपचारांपर्यंत पोहोचणं कठीण जातं. मात्र, एनएचएस या प्रक्रियेसाठी निधी देण्यात येत असला तरी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी भेदभाव निर्माण होण्याचा धोकाही आहेच.

कोणाला प्राधान्य दिले जाते?
गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रिया यूकेमध्ये नियमित झाली तर अवयव दानाबाबतची धोरणं पुन्हा पडताळावी लागतील. इंग्लंडमधील कायद्यानुसार, प्रौढांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्यास संमती दर्शविली आहे, असे मानले जाते. असं असताना ही संमती फक्त त्वचा, ह्रदय आणि फुप्फुसांसारख्या सामान्यपणे प्रत्यारोपित अवयवांना लागू होते. हे नवीन किंवा दुर्मीळ प्रत्यारोपणाला लागू होत नाही. दुर्मीळ प्रत्यारोपणामध्ये गर्भाशयाचा समावेश आहे. एनएचएस अवयवदात्याच्या नोंदणीमध्ये गर्भाशयाचा समावेश नाही. त्यामुळे मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या गर्भाशयाच्या दानासाठी स्पष्ट संमती देणे आवश्यक आहे. जिवंत अवयव दान करणारे एखाद्या विशिष्ट किंवा ओळखीच्या व्यक्तीला गर्भाशय दान करू शकतात. मृत व्यक्तीदेखील आधीच निर्देशित केलेल्या व्यक्तीला दान करू शकते. मात्र, धर्मादाय निधीसाठी पात्र होण्यासाठी काही निकषांची पूर्तता करावी लागते. प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे की नाही हे पडताळणंही गरजेचं असतं.

साधारणपणे अवयव आणि ऊती दुर्मीळ असल्याने सध्या निष्पक्ष आणि पारदर्शक निधीवाटप होण्यासाठी जटिल धोरणे वापरली जातात. वैद्यकीयदृष्ट्या प्रत्यारोपणाची गरज असणे हेदेखील निधीवाटपात उपयुक्त ठरू शकते; जेणेकरून सर्वांत गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी प्राधान्य दिले जाईल. दरम्यान, गर्भाशय प्रत्यारोपणासाठी समान तर्क लागू होऊ शकत नाही. कारण- परिपूर्ण गर्भाशय वंध्यत्व अंशांमध्ये येत नाही. अशा स्थितीत असलेल्या महिलांना गर्भवती होण्याची शक्यता शून्य टक्का असते. म्हणूनच गर्भाशय प्रत्यारोपणाच्या संदर्भात ज्यांना मूल नाही त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. वयाचा मुद्दाही लक्षात घेतला जाऊ शकतो. एखाद्या महिलेचे वय एका विशिष्ट वयापेक्षा कमी असेल, तरच गर्भ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रजनन उपचारांना एनएचएसद्वारे निधी दिला जातो. वयोमर्यादा ठिकाणानुसार बदलते. काही ठिकाणी ती ३५ वर्षांपेक्षा कमी असू शकते. गर्भाशयांचा पुरवठा वाढवण्यासाठी दात्यांच्या नोंदणीमध्ये गर्भाशयांचा समावेश करावा की नाही याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचीदेखील आवश्यकता असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तरी जगात कुठेही गर्भाशय प्रत्यारोपण ही उपचारपद्धती व्यापकपणे वापरली जात नाही. यूकेमध्ये अजून या प्रवासाची सुरुवातच होत आहे. तेव्हा गर्भाशय प्रत्यारोपणासाठी समान प्रवेश धोरणे तयार करण्यात आणि लागू करण्यात यूकेला जागतिक आघाडीवर येण्याची नक्कीच संधी आहे. यासाठी आरोग्यविषयक डेटा, नैतिक आणि कायदेशीर मुद्दे तसंच प्रभावित झालेल्या सर्वांचे विचार काळजीपूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे. गर्भाशयातील समस्येमुळे वंध्यत्व आलेल्या महिलांसाठी ही उपचारपद्धती वरदान ठरू शकते.