ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात झालेल्या महिलांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने निकहत झरीन, लवलिना बोरगोहेन, नीतू घंसास आणि स्विटी बूरा या चौघींनी सुवर्ण कामगिरी केली. भारताचे हे यश ऐतिहासिक ठरले. भारतीय बॉक्सिंग खेळाडूंची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, महिला बॉक्सिंगपटूंची ही कामगिरी आगामी काळात किती महत्त्वाची ठरू शकेल याबाबत मतमतांतरे आहेत.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील ही कामगिरी सर्वोत्तम ठरते का?

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या एकूण चार खेळाडूंनी सुवर्णपदके मिळवली. घरच्या प्रेक्षकांसमोर झालेली ही कामगिरी उल्लेखनीय असली, तरी एकाच स्पर्धेत चार सुवर्णपदके मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २००६ मध्ये भारताने अशीच चार सुवर्णपदके पटकावली होती. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कामगिरीला विशेष महत्त्व आहे. भारतीय महिला खेळाडूंच्या जागतिक स्पर्धेतील यशाला मेरी कोमने सुरुवात केली. त्यानंतर आता निकहत, लवलिना, नीतू, स्विटी, मनीषा, मंजू अशा खेळाडू हा वारसा पुढे नेत आहेत.

जागतिक स्पर्धेतील सर्वांत महत्त्वाचे यश कोणाचे?

निकहत आणि लवलिना या दोघींचे यश विशेष लक्षवेधी ठरते. याचे मुख्य कारण म्हणजे दोघींचे जागतिक यश हे ऑलिम्पिक वजनी गटातील आहे आणि दोघींनीही वजनी गट बदलून या स्पर्धेत आपला ठसा उमटवला. जागतिक स्पर्धेत सलग दोन विजेतीपदे मिळवणारी निकहत ही मेरीनंतरची दुसरी खेळाडू ठरली. विशेष म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीत निकहतने सहाही लढती जिंकल्या. निकहतने वजन कमी केले, तर लवलिनाने वजन वाढवले. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्व राखून असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी हे असे निर्णय खेळाडूंना घ्यावेच लागतात. दोघींनी दाखवलेली मानसिकता, दृढनिश्चय आणि तंदुरुस्ती ही सर्वांत मोठी वस्तुस्थिती विसरता येत नाही.

विश्लेषण : लेबनॉनमध्ये घड्याळाची वेळ बदलल्यामुळे गोंधळ, ‘डेलाइट सेव्हिंग टाईम’ म्हणजे काय? जाणून घ्या

नीतू आणि स्विटी यांनी कसा खेळ केला?

नीतू घंसास (४७ किलो) आणि स्विटी (८१ किलो) या दोघींनाही सोनेरी कामगिरी करण्यात यश आले; परंतु या दोघींच्या वजनी गटांचा ऑलिम्पिक गटात समावेश नाही. अर्थात, ऑलिम्पिक गट नाही म्हणून त्यांच्या यशाला महत्त्व नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. या दोघींनी प्रयत्नपूर्वक मेहनत करून जागतिक यश मिळवले. त्यांनी दाखवलेली जिगर निश्चितच भारताच्या भावी पिढीसाठी मेरी, निकहत, लवलिना यांच्याइतकीच प्रेरणादायी आहे. एकीकडे, बहुतांश भारतीय महिला बॉक्सिंगपटू स्पर्धेत घवघवीत यश मिळवत असताना मनीषा मून (५७ किलो) आणि मंजू बम्बोरिया (६० किलो) या दोघींना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

हे यश भारतीयांसाठी निर्णायक ठरू शकेल का?

याबाबत अनेक मतमतांतरे असू शकतात. भारतीय युवा पिढीसमोर या कामगिरीचा निश्चित आदर्श ठेवता येईल. मात्र, पुढे जाऊन विचार निश्चित करावा लागेल. याचे मुख्य कारण म्हणजे महिला खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य आहे, पण आंतरराष्ट्रीय दर्जा राखण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. निकहत आणि लवलिना दोघी वजन गट बदलून खेळत आहेत. या नव्या वजनी गटात त्या अजून स्थिरावत आहेत. त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. या वजनी गटात प्रमुख खेळाडूंच्या माघारीमुळे त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहू शकले नाही. म्हणूनच या यशानंतरही भारतीय महिला खेळाडूंना कामगिरीत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. स्विटीच्या गटात फारसे आव्हानच नव्हते. तिला पदकापर्यंत पोचताना केवळ तीन लढती खेळाव्या लागल्या.

जागतिक स्पर्धा यशस्वी ठरली का?

खेळाडूंचा सर्वाधिक सहभाग, प्रथमच देण्यात आलेली रोख पारितोषिके आणि खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेले फळ, या आघाडीवर ही स्पर्धा निश्चित यशस्वी झाली. मात्र, दर्जाच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. याची दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे स्पर्धेत दहाहून अधिक देशांनी बहिष्कार टाकला होता. बहिष्कार टाकलेल्यांत अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, पोलंड, नेदरलँड्स हे देश गेल्या दोन स्पर्धेत पहिल्या दहांत होते. दुसरे कारण म्हणजे या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा नव्हता. त्यामुळे ऑलिम्पिकमधील वजनी गटांचा समावेश असूनही फारशी चुरस दिसून आली नाही.

विश्लेषण : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताची तयारी कशी? ऑस्ट्रेलिया मालिकेतून कोणत्या त्रुटी दिसल्या?

प्रमुख देशांच्या बहिष्काराची आणि ऑलिम्पिक पात्रता दर्जा नसण्याची कारणे काय?

या दोन्हीचे मूळ रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हेच आहे. या युद्धात बेलारूसने रशियाला पाठिंबा दिला. ऑलिम्पिक समितीकडे एक ठाम भूमिका घेणारी क्रीडा संस्था म्हणून बघितले जाते. त्यांच्या भूमिका आणि तत्त्वांना एक विचारांची बैठक असते. रशियाने पुकारलेले युद्ध आणि त्याला बेलारूसने दिलेला पाठिंबा याचा अभ्यास करताना ऑलिम्पिक समितीने खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून या दोन देशांतील खेळाडूंना आपल्या ध्वजाखाली खेळण्यास परवानगी दिली. या निर्णयाला विरोध म्हणून प्रमुख देशांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला. प्रमुख देशांचा सहभाग नाही म्हणून ऑलिम्पिक समितीने स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रता देण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World boxing championship indian nikahat zarin lovlina nitu sweety wins medals print exp pmw
First published on: 29-03-2023 at 08:34 IST