‘चिंटू’, ‘बोक्या सातबंडे’, ‘फास्टर फेणे’ हे नाव न ऐकलेला मराठी माणूस कदाचितच सापडेल. आपल्या लहानपणी कोणत्या ना कोणत्या तरी टप्प्यावर आपण ही पुस्तकं वाचलेली असतात. २ एप्रिल म्हणजेच जागतिक बालग्रंथ दिन. त्यानिमित्ताने बालसाहित्याची सद्य:स्थिती जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
मराठीतलं पहिलं लहान मुलांचं पुस्तक
मराठीतलं पहिलं लहान मुलांचं पुस्तक कधी आलं याचा संदर्भ, साहित्य संशोधक मंगला वरखेडे यांच्या ‘बालबोध रत्नमाला’ या पुस्तकात सापडतो, सुब्बाजी शेषो ऊर्फ सख्खन पंडित यांनी इंग्रजीतल्या इसापनीतीवरून ‘बालबोध मुक्तावली’ हा ग्रंथ अनुवादित केला. तो ग्रंथ १८०६ साली तंजावूर येथील सरफोजीराजे भोसले यांच्या संस्थानात छापण्यात आला.
इसापनीतीचाच अनुवाद (१८२८) काशिनाथ बापू छत्रे यांनी ‘बाळमित्र’ या नावाने केला. मिसेस फेरार यांच्या ‘बाळबोध गोष्टी’ही त्यावेळी प्रसिद्ध झाल्या. त्या काळातील छत्रे, फेरार, परशुरामपंत गोडबोल्यांपासून नंतरच्या काळात साने गुरुजी, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, इंदिरा संत, सरिता पदकी, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, अनंत भावे अशी कितीतरी बालसाहित्यातील दिग्गजांची नावं घेता येतील. मूल्यशिक्षण, संस्कार, नीतिबोध या प्रकारचं साहित्य त्या काळात लिहिलं गेलं.
बालसाहित्याच्या सद्यस्थितीबाबत प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणाले की, चिऊकाऊच्या गोष्टी आजच्या मुलांनाही आवडतात; पण या पिढीसमोर मानसिक, शैक्षणिक, अशी जी आव्हानं आहेत, त्या दृष्टीने फार कमी साहित्य तयार होतं. ही पिढी वास्तववादी साहित्याकडे वळताना दिसते. आपली भाषा पुढच्या पिढीने जपण्यासाठी कोडी, गाणी यांपेक्षा वेगळे प्रयत्नही झाले पाहिजेत. मुलांना परीकथा, प्राणीकथा आजही आवडतात; पण त्यांचा जुना थाट न बिघडवता, नव्या पद्धतीनं त्या लिहिलं जाणं गरजेचं आहे.
सर्व परीघावरच्या मुलांपर्यंत पोहोचणारं साहित्य निर्माण झालेलं नाही. आदिवासी पाड्यांवरील मुलांसाठी, ग्रामीण मुलांसाठी, आणि ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या मुलांच्या भावविश्वाला सांधणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे.
बालसाहित्याच्या भाषेबाबत, आव्हाड म्हणाले की, आताच्या मुलांना भाषा शिकताना अडचण येते म्हणून मी अनेकदा निरनिराळे प्रयोग करत असतो, त्यातीलच एक म्हणजे जोडाक्षररहित कविता.
पुढून पाठ मागून सपाट,
बाबांनी आणलं लोखंडी कपाट…
पैशांचं कपाट घमेंडी भारी,
उघडायला लागल्यावर कुरकुर करी.
प्रत्येक कथेचं तात्पर्य मुलांना उकलू द्यावं, आपण लिहून त्याचा निष्कर्ष मुलांनी काढण्यासाठी सोडला पाहिजे असं मला वाटतं.
‘श्यामची आई’ आता आऊटडेटेड झालेलं आहे : राजीव तांबे
मुलांना होणारे मानसिक आजार मुलांच्या समस्येतून निर्माण होत नाहीत; त्या पालकांच्या समस्या असतात, असे सांगून ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे म्हणाले की, पालकांच्या आतलं मूल जागं आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याच्या बालसाहित्यात कुणीही वेगवेगळ्या (genre) शैलीचा वापर करताना दिसत नाही. समुद्रकथा, विज्ञान-भयकथा, रहस्यकथा मराठीत तयार झालेल्या नाहीत. सिंदबादच्या सात सफरी आहेत, आठवी सफर कुणाला का लिहावीशी वाटत नाही? आम्ही शक्यतांचा शोध घ्यायला कमी पडतो. चांगली बालनाट्य सध्या सापडत नाहीत. पुन्हा पुन्हा रत्नाकर मतकरींकडे का वळावं लागतं? लेखकांनी त्यांचा भूतकाळ सांगू नये. ‘श्यामची आई’, ‘फास्टर फेणे’ आता आऊटडेटेड झालेलं आहे. आपल्याला नवीन कथा हव्या आहेत.
अनुवाद म्हणजे सर्वश्रेष्ठ साहित्य हा गैरसमज
आपल्याकडे अनुवाद म्हणजे सर्वश्रेष्ठ साहित्य मानलं जातं, हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. नवीन सर्जनशील, इथल्या मुलांना आवडणारं, त्यांच्या गल्लीतलं साहित्य त्यांच्या हातात येणं गरजेचं आहे. जगात काय प्रवाह चालू आहेत हेही आम्ही पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार लेखन केलं पाहिजे. याचसाठी कार्यशाळा घेणं गरजेचं आहे, असंही तांबे यांनी सांगितलं.
लहान मुलांसाठी अनेक नियतकालिकं प्रसिद्ध होतात. छात्र प्रबोधन, मुलांचे मासिक, चिकूपिकू, अहम् आवाम वयम् अशी अनेक मासिकं बाजारात उपलब्ध आहेत. ‘बालभारती’चं ‘किशोर’ हे मासिकही गेली ५५ वर्षं प्रकाशित होत आहे. ‘किशोर’चे संपादक किरण केंद्रे संवाद साधताना म्हणाले की, आताची मुलं फार गतिशील आहेत. आता जे नवीन आहे, ते उद्या त्यांना जुनं वाटणार आहे. त्यामुळे आम्हाला लिहिताना व लेखकांकडून लिहून घेताना खूप विचार करावा लागतो. एकेका लेखाच्या शीर्षकाबद्दलही भरपूर विचार करावा लागतो. ‘किशोर’चे ८० हजारहून अधिक वर्गणीदार आहेत. जवळपास दीड लाखाहून अधिक वाचक आहेत; पण आम्हाला हे गौरवास्पद जरी वाटलं तरी ते पुरेसं नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकापर्यंत, मुलापर्यंत पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे आणि ते साकार करण्याचं ‘किशोर’चं स्वप्न आहे. आजही किशोर अवघ्या सात रुपयांत वाचता येतं आणि वार्षिक वर्गणी केवळ ८० रुपये आहे.
किशोर आजही महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या तरुण कलावंतांकडून चित्र रेखाटून घेतं. किशोर नेहमी चित्रं हाती रंगवून घेतं, ते कृत्रिमरित्या तयार करत नाही. मुलांचं भावविश्व संवेदनशील आहे; आपण त्यांना काय देणार आहोत याचा परिणाम त्यांच्यावर होणार आहे. याचा पूर्ण विचार करूनच आम्ही किशोरचा प्रत्येक अंक काढत असतो.
बदलापुरातील ‘ग्रंथसखा’च्या प्रमुख कार्यवाह ग्रंथपाल अर्चना कर्णिक सांगतात, उन्हाळ्याची सुट्टी लागली की, १० एप्रिल ते १० जूनपर्यंत आम्ही खास मुलांसाठी ग्रंथालय खुलं करतो, त्यासोबतच वेगवेगळे उपक्रम राबवतो. नवी पिढी स्वतःहून हातात पुस्तकं घेणार नाही, त्यांनी वाचावं म्हणून ‘पुस्तक वाचन स्पर्धे’सारखे उपक्रम, ज्यात जास्तीत जास्त पुस्तकं वाचणाऱ्या मुलाला/ मुलीला काही त्याच्या/ तिच्या आवडत्या खेळण्यांसोबत पुस्तकंदेखील पारितोषिक म्हणून देतो. त्याचसोबत ‘ऐकू गोष्टी, सांगू गोष्टी’, ‘माझं आवडतं पुस्तक’ अशा उपक्रमांसोबतच चित्रकला, गाणी, ओरिगामीचे उपक्रमही घेतो.”
‘ग्रंथसखा’चे संस्थापक श्याम जोशी सांगतात, बालवाङ्मयाचे साधारणतः दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार- आदर्शवादी, आपलं मूल नेहमी सुसंस्कृत, सदाचारी, सद्वर्तनी असलं पाहिजे, असं जरासं साचेबद्ध वाङ्मय. दुसरा प्रकार- मुलाची आवड-निवड काय?, त्याचा पिंड काय?, तो कशात यशस्वी होईल? याचा विचार करून तयार केलेलं वाङ्मय. हे दुसर्या प्रकारचं वाचन मुलांना अधिक सकस करेल. पालकांनी परीक्षांमधील गुणांपेक्षा व्यक्तिमत्त्वांवरील गुणांवर भर देणं जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं.”
मूल स्वतःहून पुस्तक हातात घेईल असं पुस्तक मुलांच्या हातात येण्यासाठी बालसाहित्यिक, संपादक, आणि प्रकाशकांना या आजूबाजूच्या वेगाने बदलत चाललेल्या वातावरणाकडे पाहून आजचे बालसाहित्य निर्माण करावे लागेल. तेव्हाच पुढच्या पिढीचं चांगलं वाचन वाढलेलं पाहायला मिळेल, हे प्रकर्षाने लक्षात येते.
