दक्षिण हिंद महासागरात निर्माण झालेल्या होरासिओ या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले आहे. अवघ्या २४ तासांत या वादळाचा ताशी वेग १०४ किमीवरून २६० किलोमीटरपर्यंत वाढला आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे ‘होरासिओ’ चक्रीवादळाचा समावेश सर्वांत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या पाचव्या श्रेणीत करण्यात आला आहे. चक्रीवादळांच्या वर्गीकरणातील ही सर्वांत धोकादायक आणि विनाशकारी श्रेणी मानली जाते. केवळ एका दिवसात या वादळाच्या वेगात झालेल्या प्रचंड वाढीमुळे हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘होरासिओ’च्या वाढत्या तीव्रतेमुळे हिंद महासागरातील किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या विनाशकारी चक्रीवादळाची निर्मिती कशी झाली? त्याचा भारतातील हवामानावर काय परिणाम होणार? त्याविषयीचा हा आढावा…
चक्रीवादळांची निर्मिती कशी होते?
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वारे बदलले की एक अख्खा ऋतू बदलतो आणि निसर्गचक्र पुढे सरकते. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की, वारे जमिनीच्या दिशेने वाहू लागतात. या कमी दाबाच्या केंद्राला ‘चक्रीवादळाचा डोळा’, असे म्हटले जाते. या डोळ्याभोवती हवा गोल गोल फिरून विध्वंसक वादळ निर्माण करते. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ अंश डिग्री सेल्सिअस तापमान आणि ते ६० मीटर खोलीपर्यंत असणे हे चक्रीवादळासाठी पोषक ठरते. चक्रीवादळांना वातावरणातील विचलन, असेही म्हणतात. या चक्रीवादळांचा आकार गोलाकार, लंबवर्तुळाकार ते ‘V’ आकारापर्यंत असतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील, तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की, हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.
काय आहे होरासिओ चक्रीवादळ?
- होरासिओ या चक्रीवादळाने सध्या जगभरातील हवामान तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.
- या चक्रीवादळाची निर्मिती दक्षिण हिंद महासागरातील उबदार पाण्यावर झाल्याचे सांगितले जाते.
- इतर सर्व उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांप्रमाणेच ‘होरासिओ’ची सुरुवातही समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यापासून झाली.
- अवघ्या काही तासांतच या दाबाचे रूपांतर भीषण महाचक्रीवादळात झाले.
- समुद्राच्या पाण्याचे वाढलेले तापमान या वेगवान तीव्रतेसाठी कारणीभूत ठरल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
- ‘होरासिओ’चे स्वरूप आणि त्याची तीव्रता पाहता, अशा प्रकारची चक्रीवादळे जागतिक स्तरावर अत्यंत दुर्मीळ मानली जातात.
- या चक्रीवादळामुळे दक्षिण हिंद महासागराला लागून असलेल्या किनारपट्टीच्या भागांना इशारा देण्यात आला आहे.
- होरासिओ हे २०२६ मधील जगातील सर्वांत शक्तिशाली चक्रीवादळ म्हणून नोंदवले गेले आहे.
- जगभरातील अनेक हवामान तज्ज्ञ या वादळाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
आणखी वाचा : श्वानाच्या चाटण्यामुळे गंभीर आजार; महिलेने गमावले दोन्ही हातपाय, सेप्सिस म्हणजे नेमके काय?
श्रेणी-५ मधील चक्रीवादळे किती धोकादायक?
होरासिओ हे पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळ ठरल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चक्रीवादळाचे मोजमाप करणाऱ्या सॅफिर-सिम्पसन स्केलवरून त्याची श्रेणी निवडण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये वाऱ्याचा वेग ताशी २५० किलोमीटरहून अधिक असतो. इतक्या वेगाने वाहणारे वारे आपल्यासोबत भीषण पाऊस आणि समुद्राच्या उंच लाटा घेऊन येतात. या वादळाची विध्वंसक क्षमता अत्यंत विनाशकारी मानली जाते. घरावरील छपरे उडून जाणे, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडणे आणि वीजपुरवठा करणारी यंत्रणा [खांब, विद्युत रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर)] पूर्णपणे कोलमडून पडणे, असे नुकसान पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळामुळे होण्याची शक्यता असते. त्याशिवाय मुसळधार पावसामुळे वादळाच्या मुख्य क्षेत्रापासून दूर असलेल्या भागांतही अचानक पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडू शकतात.
होरासिओ चक्रीवादळाचा भारताला किती धोका?
- होरासिओ या चक्रीवादळाने दक्षिण हिंद महासागरात रौद्र रूप धारण केले असले तरीही भारताला मात्र त्याचा कोणताही धोका नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
- भारताला प्रामुख्याने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचा फटका बसतो.
- होरासिओ वादळ भारतीय किनारपट्टीपासून हजारो किलोमीटर दूर असल्याचे सांगितले जात आहे.
- उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे क्वचितच एका गोलार्धातून दुसऱ्या गोलार्धात प्रवेश करतात.
- वाऱ्याची दिशा आणि तापमानातील तफावत नैसर्गिक भिंतीसारखे काम करीत असल्याने ही वादळे दक्षिण गोलार्धातच राहतात.
- त्यामुळे होरासिओ चक्रीवादळही भारतीय समुद्राकडे येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
होरासिओ चक्रीवादळामुळे भारत सतर्क का?
होरासिओ चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून हजारो किलोमीटर दूर असले तरीही देशातील हवामान तज्ज्ञ या वादळाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारताला ८,०४१ किलोमीटर लांबीची अथांग किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे चक्रीवादळप्रवण देशांच्या यादीत भारत वरच्या क्रमांकावर आहे. जगातील एकूण उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांपैकी जवळपास १० टक्के वादळे भारतीय उपखंडाला धडकतात. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यांना वारंवार बंगालच्या उपसागरातील वादळांचा तडाखा बसतो; तर गुजरातला अरबी समुद्रातील वादळांचा सामना करावा लागतो. २०१९ मध्ये आलेल्या ‘फनी’ चक्रीवादळाने ‘श्रेणी-५’ इतकी तीव्रता गाठली होती आणि ओडिशामध्ये प्रचंड हाहाकार माजवला होता. हजारो गावे उद्ध्वस्त झाली होती आणि लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले होते. हिंद महासागराच्या पाण्याचे तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी चक्रीवादळे अधिक वेगाने शक्तिशाली होतील आणि त्यांच्यासोबत भीषण पाऊस येईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अवयवदानाचे प्रमाण वाढले की घटले? आकडेवारी काय सांगते?
चक्रीवादळाचा पुढील प्रवास कसा असेल?
सध्याच्या हवामान अंदाजानुसार, होरासिओ चक्रीवादळ दक्षिण हिंद महासागराच्या आग्नेय दिशेने सरकत आहे. ते जमिनीपासून बरेच दूर असले तरीही त्याचा फटका महासागरातील काही बेटांना बसण्याची शक्यता आहे. फ्रेंच बेट असलेल्या रीयुनियनच्या हवामान केंद्रानेही या वादळावर बारीक लक्ष ठेवले आहे. जसजसे हे चक्रीवादळ पुढे सरकत जाईल, तसतशी त्याची तीव्रता कमी होईल. समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी झाल्यामुळे आणि वाऱ्याचा वेग बदलल्यामुळे पुढील ४८ ते ७२ तासांत या वादळाची तीव्रता कमी होऊन, ते श्रेणी-५ वरून खाली येईल. हे वादळ मानवी वस्ती असलेल्या कोणत्याही मोठ्या भूभागावर धडकण्याची शक्यता नाही. ते दक्षिण महासागराच्या मोकळ्या भागात विरून जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, समुद्रात असलेल्या जहाजांना आणि रॉड्रिग्स बेटावरील मच्छीमारांना या वादळापासून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

