रुग्णालयात डॉक्टरपेक्षा रुग्णाची अधिक काळजी घेते ती म्हणजे नर्स / सिस्टर किंवा परिचारिका. रुग्णाला औषधे देण्यापासून ते प्रसंगी अगदी त्यांची शारीरिक स्वच्छता राखण्यापर्यंत, नर्सेसकडून कोणतेच काम टाळले जात नाही. हा केवळ एक पेशा नाही, तर त्यांनी समाजाप्रति केलेले समर्पणच असते ते. ‘समाजाय इदं न मम’ या भावनेने काम करणार्‍या प्रत्येक नर्ससाठी आजचा दिवस विशेष आहे. फ्लोरेन्स नाइटिंगेल या आद्य परिचारिकेचा आज २०६ वा वाढदिवस, हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.

‘नर्स’, ‘नर्सिंग’ नेमकं कधीपासून सुरू झालं? परिचारिकांचा इतिहास किती वर्ष जुना आहे? भारतात ‘नर्सिंग’ कसं सुरू झालं? भारतातील पहिल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल कोण? आशिया खंडात पहिल्यांदाच ऑक्युपेशनल थेरेपीचा इलाज सुरू करणार्‍या मराठमोळ्या स्त्रीची गोष्ट आणि बरंच काही…

प्राचीन इजिप्त व ग्रीसमधील परिचर्या

प्राचीन काळात आजारांबाबतच्या कल्पना निरनिराळ्या होत्या. पापाचे फळ म्हणून माणसाला रोग होतो, असे त्या काळी मानले जात असे. जादूटोणा, देवाचा वा देवीचा कोप, भूतबाधा यांमुळे रोग व्हायचे, असा समज होता. त्या काळात अशांवर उपचार करणार्‍यांना ‘प्रिस्टर फिजिशियन’ (Priester Physician) म्हटले जात असे. कारण ही मंडळी बहुतांशी धार्मिक कार्ये, तंत्रमंत्रादी उपाय करायची. अनेकदा दवा- काढे नाही तर केवळ प्रार्थना…

हिपोक्रेट्सने लिहिलेली शपथ आजही सगळे डॉक्टर शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय सुरू करण्याआधी घेतात, याच शपथेला ‘हिपोक्रेट्स ओथ’ म्हणतात. पुढे कित्येक शतकांनंतर फ्लॉरेन्स नाइटिंगेलने परिचर्येची प्रतिज्ञा याच ‘हिपोक्रेट्स ओथ’च्या धर्तीवर लिहिली.

मध्ययुगातील परिचारिका

मध्ययुगात युद्धांचे प्रमाण वाढले आणि शुश्रूषा करणार्‍यांची गरज भासू लागली. येशू ख्रिस्ताच्या उपदेशाने प्रभावित झालेल्या स्त्रिया डेकोनेस या नावाने ओळखल्या जात. चर्चकडून रुपयाही न घेता, त्या स्वखर्चाने कार्य करीत असत. इ.स.च्या पाचव्या शतकात सेंट पॉल यांनी अशा डेकोनेसेसचा उल्लेख केल्याचे आढळते. फेबी (Phebe), ट्रिफेना (Tryphena), ट्रिफोजा (Tryphosa), पेरसीस (Persis) यांचा उल्लेख आढळतो. युद्धात जवान मरत, त्यांच्या विधवा निराधार पत्नींचा सांभाळ ‘डेकोनेस’ करत आणि याच महिला पुढे डेकोनेसेस बनत, असे चक्र होते. श्रीमंत व सुसंस्कृत ख्रिश्चन स्रिया ‘मेट्रन’चे (Matron) काम करीत असत. ‘मर्सिला’, ‘फॅबिओला’, ‘पौला’ ही मेट्रन्सची नावे वैद्यकेतिहासात प्रसिद्ध आहेत. या तिघींच्या कार्याची प्रशंसा तेव्हाच्या ग्रेट काउन्सिल ऑफ चर्चमध्ये केल्याचे आढळते.

आधुनिक काळाकडे वळताना…

‘रेनेसॉ’ने युरोपीय दृष्टिकोन पालटू लागले. मानसिकता बदलली. विचारांच्या केंद्रस्थानी आता ईश्वर नव्हता, मानव होता. धर्मापेक्षा तर्क, बुद्धी आणि विचारांचे प्राबल्य वाढू लागले होते. अशात ‘रेनेसाॅ’च्या उत्तरार्धात फ्लोरेन्सचा जन्म १२ मे १८२० रोजी इंग्लंडमध्ये झाला. अनेक शास्त्रे, भाषांची जाण असलेली फ्लोरेन्स धार्मिक वृत्तीची होती. तिला समाजकार्यात रस होता आणि म्हणूनच जन्मभर अविवाहित राहण्याचे ठरवले. १८४७ ते ५२ दरम्यान युरोपभ्रमंती करून शिक्षण पूर्ण केले. १८५४-५६ च्या क्रिमियन युद्धामध्ये ३८ स्त्रियांच्या ताफ्यासह पहिल्यांदाच युद्धात परिचारिकेच्या रूपात पदार्पण केले. इ.स. १८६० मध्ये लंडनच्या सेंट थॉमस इस्पितळात ‘नाइटिंगेल्स स्कल ऑफ नर्सिंग’ सुरू करून जगातली पहिली परिचारिकांची शाळा सुरू केली. फ्लोरेन्सच्या परिचारिकांच्या जडणघडणीत व रुग्णांच्या शुश्रूषेत फार मोठे योगदान राहिले आहे. तिच्या या कार्यासाठी १९०७ मध्ये किंग एडवर्डने तिला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ ही पदवी बहाल केली. नाइटिंगेलचे अनेक क्षेत्रातील योगदान वाखाणण्याजोगे आहे.

फ्लोरेन्स नाइटिंगेल | स्रोत : विकिमीडिया कॉमन्स

भारतातील परिचारिकांची सुरुवात…

पंधराव्या शतकापर्यंत परिचर्येविषयीची फार कमी माहिती मिळते. पोर्तुगीजांनी गोवा, मद्रास येथे डिस्पेंसरीज् उघडल्या, वैद्यक कामावर ठेवले इतकेच समजते; पण नर्सिंगची खरी सुरुवात भारतात ‘मिलिटरी नर्सिंग’पासून झाली. १६६४ साली मुंबई, मद्रास येथे ईस्ट इंडिया कंपनीने दवाखाने सुरू केले.

१८५४ साली मिडवाईफ ट्रेनिंग स्कूल्सची स्थापना करण्यात आली आणि १८६१ मध्ये नाइटिंगेलच्याच प्रयत्नांमुळे मिलिटरी व सिव्हिलियन दवाखान्यात सुधारणा होऊन आरोग्याच्या सोयी-सुविधा भारतीयांना उपलब्ध झाल्या. १८७१ मध्ये मद्रासमध्ये सरकारी दवाखान्यात परिचारिकांसाठी शिक्षण सुरू झाले. त्यासाठी इंग्लंडहून परिचारिका आणल्या गेल्या. त्यात पहिल्या सहा विद्यार्थिनींनी मिडवाईफरीचा डिप्लोमा केला आणि जनरल ट्रेनिंगचे प्रशिक्षण घेतले.

पहिलीवहिली भारतीय स्त्री परिचारिका

१८४३ साली मुंबईत सर्वप्रथम जेजे रुग्णालयाची स्थापना झाली. पुढे १८८६ मध्ये कामा अँड आलब्लेस इस्पितळ उघडले गेले. सुरुवातीला परिचर्येचं काम वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी केले; पण पुढे ते काम अँग्लो-इंडियन स्त्रिया करू लागल्या. अशात १८९१ मध्ये पहिली भारतीय स्री, जिने स्त्री परिचर्येचे प्रशिक्षण पूर्ण केले, तिचे नाव काशीबाई गणपत होय. काशीबाईंचे दोन वर्षांचे परिचारिकेचे शिक्षण जेजे रुग्णालयात पूर्ण झाले. त्यांच्या आयुष्यासंबंधी जन्म-मृत्यू, कारकीर्द याविषयीची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. काशीबाईंप्रमाणेच इतिहासाच्या पानात हरवलेली अजून दोन नावे म्हणजे मिस. मौला बक्ष (१९२३) व सरस्वतीबाई पाठक (१९२५). यातील बक्षबाईंचे शिक्षण इंग्लंडला पूर्ण झाले.

अशियातील पहिल्यावहिल्या व्यावसायिक उपचारक (Occupational Therapist)

व्यवसायोपचाराचे तंत्र भारतातच नव्हे, तर आशियातही प्रथम आणले ते कमलाबाई निंबकर यांनी. भारतीय वंशाच्या, पण अमेरिकेत जन्मलेल्या कमलाबाईंनी विष्णुपंत निंबकर यांच्याशी लग्न केले आणि भारतात राहण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा देशाला करून द्यायचा हे नवरा-बायकोत आधीच ठरले होते.

कमला निंबकर | ai-modified image | chatGPT

कमलाबाईंनी १९५० साली के.ई.एम. हॉस्पिटलच्या अस्थिरोग, शस्त्रक्रिया व बालरुग्ण या विभागांमध्ये एक वर्षभर प्रायोगिक तत्त्वावर काम करून व्यवसायोपचाराची उपयोगिता दाखवून द्यावी, असे ठरले. तो एका वर्षाचा प्रयोग यशस्वी झाला. तिथून त्या १९५७ साली निवृत्त झाल्या. पुढे नागपूर येथील महाविद्यालयात व्यवसायोपचार सुरू करण्याची संधी चालून आली. कमलाबाईंनी त्या संधीचे सोने केले आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात आशियातील पहिला व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रम १९६३ साली सुरू झाला.

तुरुंगातील कैद्यांसाठी व्यवसायोपचाराचा वापर

अनेक कैदी तुरुंगात त्यांच्या ‘केस’चा निकाल लागण्यासाठी थांबलेले असतात आणि इतर अनेक जण गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असतात. ते सारे कैदी एकत्र ठेवलेले असतात. त्यांच्या हाताशी वेळच वेळ असतो आणि हाताला व डोक्याला काही काम नसते. अशा कैद्यांना काहीतरी काम द्यावे, जेणेकरून जेलमधून बाहेर पडल्यावर या अनुभवाचा उपयोग त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी करता येईलस असा विचार कमलाबाईंनी केला होता. कमलाबाईंच्या याच कार्याचा गौरव न होता, उपेक्षा वाट्याला आली हे दुर्दैवी. आज त्यांच्या नावे ज्येष्ठ भाषातज्ज्ञ मॅक्सिम बर्नसन यांनी कमलाबाई निंबकर विद्यालय उभारले, ती कमलाबाईंच्या स्मृतीची एकमेव खूण.

संदर्भ :

  • डॉ. सौ. एस. एस. मोमीन; परिचर्या : शास्त्र, तंत्र, कला.
  • The Nursing Journal of India/ Ms. Prem Mehra; Nursing at the Threshold of 21st Century.
  • थिंक महाराष्ट्र डॉट कॉम/ मंजिरी निंबकर; कमला निंबकर – व्यवसायोपचाराच्या प्रवर्तक (Pioneer of occupational therapy in India).