१९७२ साली बल्गेरियातील वर्ना परिसरात सुरू असलेल्या साध्या खोदकामादरम्यान मातीमध्ये काहीतरी चमकलं आणि त्या एका क्षणाने इतिहासाला नवं वळण दिलं. मातीखालून एक बांगडी आणि काही इतर वस्तू बाहेर आल्या. त्या वस्तू स्थानिक संग्रहालयात पोहोचल्या, पण कुणालाही कल्पना नव्हती की, हा केवळ एक योगायोग नाही तर ती एका मोठ्या शोधाची सुरुवात आहे. पुढील उत्खननात उलगडलं ते ‘वर्ना चालकोलिथिक नेक्रोपोलिस’. हे स्थळ युरोपमधील सर्वात महत्त्वाच्या प्रागैतिहासिक दफनभूमींपैकी एक आहे.
या स्थळावर जसजशी थडगी उघडू लागली, तसतसा एक धक्कादायक नमुना समोर आला. काही दफने अगदी साधी… जणू सामान्य लोकांची कहाणी सांगणारी… तर काही थडग्यांमध्ये अफाट सोने, मौल्यवान वस्तू आणि सामाजिक दर्जा दर्शवणारी प्रतीके आढळली. या विरोधाभासातून एक मोठं सत्य स्पष्ट झालं. वर्ना फक्त जगातील सर्वात प्राचीन सोन्याचे दागिने देणारी जागा नाही, तर ती प्रागैतिहासिक युरोपमधील सामाजिक स्तरव्यवस्थेचं जिवंत चित्रच आहे. म्हणजेच, संपत्ती, श्रम आणि सत्तेचं केंद्रीकरण हे प्राचीन राज्ये उभी राहण्याच्या खूप आधीपासूनच अस्तित्वात होतं आणि वर्ना हे त्याचा ठोस पुरावा ठरलं.
अतिशय टोकांच्या दफनभूमीकडे उघडलेला खंदक
१९७२ ते १९९१ या कालखंडादरम्यान झालेल्या उत्खननात जवळपास ३०० थडगी उघडकीस आली. तर काही नोंदींमध्ये हा आकडा २९४ असा दिला आहे. पण आकड्यांतील या छोट्या फरकापेक्षा एक मोठं चित्र अधिक स्पष्ट दिसतं, ही एक विशाल दफनभूमी होती, ज्याचा मोठा भाग आजही जमिनीखाली दडलेला आहे.
पण या ठिकाणाला खरं महत्त्व मिळालं ते एका धक्कादायक वास्तवामुळे. या थडग्यातून संपत्तीचं झालेल असमान वितरण स्पष्टपणे आढळून आलं. बहुतांश थडग्यांमध्ये केवळ एखादा मणी, चाकू किंवा हाडाची बांगडी इतक्याच साध्या वस्तू आढळल्या. सुमारे पाचपैकी एका थडग्यातच थोडंफार सोने दिसलं. पण आश्चर्य म्हणजे, फक्त चार थडग्यांमध्ये या संपूर्ण दफनभूमीतील जवळपास तीन-चतुर्थांश सोनं पुरलेल होतं. प्रख्यात पुरातत्त्वज्ञ व्लादिमीर स्लावचेव (archaeologist- Vladimir Slavchev) यांनी निरीक्षण नोंदवले होते की, “या दफनभूमीतील मृतांमध्ये प्रचंड विषमता दिसते. काहींकडे अफाट संपत्ती, तर काहींकडे जवळजवळ काहीच नाही, अशी अवस्था आहे.”
सोन्यानं मढवलेलं थडग
यातील सर्वात भव्य आणि गूढ थडगं म्हणजे ‘ग्रेव ४३’. प्राचीन युरोपच्या इतिहासातील एक प्रतीक मानलं जाणारं हे थडगं जणू सत्तेचं आणि वैभवाचं प्रदर्शनच आहे. या थडग्यातील व्यक्तीला सोन्याच्या बांगड्या, माळा, लॉकेट्स, छिद्र असलेले सोन्याचे तुकडे, सोन्याची दांडी असलेली कुऱ्हाड, तिच्याखाली आणखी एक कुऱ्हाड आणि बाजूला १६ इंच लांबीचा ब्लेड अशा वस्तूंनी सजवून दफन करण्यात आलं होतं. काही नोंदींनुसार, या एका व्यक्तीसोबत तब्बल १.५ किलोग्रॅमपेक्षा अधिक सोने ठेवण्यात आलं होतं. आजही या अद्भुत शोधाचे ठसे वर्ना येथील संग्रहालयात जतन केलेले आहेत. सुमारे १३ पाउंड सोन्यापैकी जवळपास ११ पाउंड सोने येथे पाहायला मिळतं. विशेष म्हणजे, ‘ग्रेव ४३’ची मूळ मांडणी जशीच्या तशी दाखवणारी पुनर्रचना पाहताना, हजारो वर्षांपूर्वीच्या त्या समाजाची संपत्ती, सत्ता आणि विषमता डोळ्यासमोर उभी राहते.
सोन्यामुळे उघड झाले व्यापार, नियंत्रण आणि संघटित श्रमाचे जाळे
वर्नामध्ये सापडलेली संपत्ती ही केवळ स्थानिक दागिन्यांपुरती मर्यादित नव्हती. उच्च दर्जाच्या थडग्यांमध्ये भूमध्य समुद्रातील स्पॉन्डायलस शंखांपासून बनवलेले दागिने आणि दूरच्या ज्वालामुखी प्रदेशांतून आणलेले ऑब्सिडियन (obsidian) दगडी ब्लेड आढळले. यावरून स्पष्ट होते की, या दफनभूमीचा संबंध दूरवर पसरलेल्या व्यापारमार्गांशी होता. तसेच, येथे सापडलेले सोने मध्य बल्गेरियातून आले असावे, ज्यामुळे संसाधनांवर नियंत्रण आणि व्यापारी जाळ्यांची व्याप्ती किती मोठी होती, हे दिसून येते.
या मौल्यवान वस्तूंच्या मागे एक मोठा इतिहास दडलेला आहे. खनन, वाहतूक आणि धातूला आकार देण्यासाठी प्रचंड वेळ, कौशल्य आणि समन्वय आवश्यक असतो. संशोधक Svend Hansen यांनी याबाबत सोप्या शब्दांत सांगितले की, “धातूची कुऱ्हाड तुटली तरी ती पुन्हा वितळवून नवीन बनवता येते. धातू कधीही संपत नाही, तो पुन्हा पुन्हा वापरता येतो.”
याच ठिकाणी वर्नाचा हा शोध केवळ ‘खजिना’ म्हणून न राहता एक ‘प्रणाली’ (system) म्हणून समोर येतो. इ.स.पूर्व सुमारे ४६०० च्या आसपास या प्रदेशात धातुकाम (metalworking) विकसित झाले होते. मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी झालेली साठवण दर्शवते की, कच्च्या मालावर आणि तयार वस्तूंवर नियंत्रण एका मर्यादित गटाकडे होते. या थडग्यांमधून केवळ संपत्तीच नव्हे, तर श्रमांचे संघटन आणि समाजातील भूमिका निश्चित करण्याची क्षमता देखील स्पष्टपणे दिसून येते.
काही सर्वात प्रभावशाली थडग्यांमध्ये मृतदेहच नव्हते
वर्नातील सर्वात गूढ आणि महत्त्वाचे शोध म्हणजे अशी काही थडग्यांमध्ये मानवी अवशेषच आढळले नाहीत. यांना ‘सेनोताफ’ (cenotaphs) म्हणजे प्रतीकात्मक दफन मानले जाते. उदाहरणार्थ, ‘ग्रेव ३६’मध्ये सोन्याचे राजदंड (scepters), लहान बैलांच्या मूर्ती, एक छोटासा मुकुट आणि जिथे डोके असावे तिथे ठेवलेला मातीचा मुखवटा सापडला. ही प्रतीकात्मक थडगी एक महत्त्वाचा संदेश देतात. सत्ता आणि दर्जा हे केवळ व्यक्तीच्या उपस्थितीवर अवलंबून नव्हते. वस्तू, त्यांची मांडणी आणि विधी यांद्वारेही सत्ता दाखवली जात होती. त्यामुळे ही दफनभूमी केवळ अंत्यसंस्कारांची नोंद राहात नाही, तर ती जणू सत्तेचे एक प्रदर्शन (display of authority) ठरते.
या शोधामुळे प्रागैतिहासिक युरोपबद्दलचा जुना समज बदलला आहे. पूर्वी या समाजांना लहान, समतावादी शेतकरी समुदाय मानले जात होते. पण संशोधक Vladimir Slavchev यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “येथील समाज पुरुषप्रधान होता. सर्वात श्रीमंत थडगी पुरुषांचीच होती आणि प्रमुखही पुरुषच होते.”
स्थळ प्रसिद्ध, पण त्याचा एक भाग अजूनही जमिनीखाली दडलेला
इतकं महत्त्व असूनही वर्नाची ही प्रागैतिहासिक दफनभूमी अजून पूर्णपणे उलगडलेली नाही. साधारणपणे एक-तृतीयांश भाग आजही उत्खननाशिवायच राहिला आहे. १९९१ मध्ये उत्खनन थांबवण्यात आले, जेणेकरून भविष्यातील संशोधक अधिक प्रगत तंत्रज्ञानासह पुन्हा अभ्यास करू शकतील आणि आधीच्या शोधांचे सविस्तर प्रकाशन होऊ शकेल. आज या न तपासलेल्या भागांपैकी काही भाग औद्योगिक परिसरात, जुन्या उत्खननातील मातीखाली आणि कम्युनिटी गार्डनजवळ दडलेला आहे.
वर्नातील या सोन्याच्या संस्कृतीचा शेवटही तितकाच अचानक झाला. इ.स.पूर्व सुमारे ४००० च्या आसपास डॅन्यूबच्या खालच्या भागात आणि काळ्या समुद्राच्या (Black Sea) पश्चिम किनाऱ्यावरील अनेक वसाहती अचानक सोडून दिलेल्या दिसतात. मात्र, यामागे युद्ध किंवा हत्याकांडाचे ठोस पुरावे सापडत नाहीत. त्याऐवजी बदलणारे पर्यावरण आणि वाढणारी पाण्याची पातळी ही संभाव्य कारणे मानली जातात. संशोधक Vladimir Slavchev यांनी एक शक्यता मांडताना म्हटले आहे, “कदाचित त्यांच्या शेतीची जमीन दलदलीत बदलली असेल. हवामानातील बदलांमुळे लोकांना आपली जीवनशैली बदलावी लागली असेल.”
आज उरले आहे ते एक असे दफनस्थळ, जे अजूनही पुरातत्त्वज्ञांच्या विचारांना दिशा देत आहे. प्राचीन सोन्याचा वापर, सुरुवातीची सामाजिक विषमता आणि प्रागैतिहासिक युरोपमध्ये संघटित सत्तेची पहिली चिन्हे याबाबतचे आकलन या ठिकाणामुळेच घडले आहे.
