Tuberculosis symptoms and medical treatment: ट्युबरक्युलोसिस किंवा मायक्रोबॅक्टिरीयम ट्युबरक्युलोसिस बॅसिलियस म्हणजेच क्षयरोग हा जवळपास दहा हजार वर्षं जुना आजार असल्याचं संशोधनात आढळतं. चक्क इजिप्तमधल्या ममींमध्येदेखील ह्या आजाराचे जिवाणू सापडतात. इतका प्राचीन आजार असूनही अद्याप क्षयरोगावर लस सापडलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४च्या आकडेवारीनुसार १ कोटी ७ लाख ही क्षयरोगबाधितांची संख्या सांगितली जाते. काय आहे क्षयरोग, तो कसा होतो, त्यातून पूर्णपणे बरं होता येतं का? त्याबरोबर डी.आर.टी.बी. म्हणजे काय? एक्स. डी. आर. टी. बी म्हणजे काय? ह्या सारख्या अनेक प्रश्नांचा जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.
क्षयरोगाविषयीच्या ऐतिहासिक नोंदी काय सांगतात?
क्षयरोग हा आजार पूर्वी ‘कंझंप्शन’ या नावाने ओळखला जात होता. एकेकाळी युरोपातील मोठी लोकसंख्या या आजाराने ग्रासलेली होती. दाटीवाटीच्या वस्त्या आणि वाढते शहरीकरण यामुळे हा आजार केवळ शहरांमध्येच होतो, अशी धारणा तत्कालीन समाजात रूढ होती. युरोपातील अनेक नामवंत प्रतिभावंतांचा बळी या आजाराने घेतल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. ॲरिस्टॉटलच्या काळापासून ते सुप्रसिद्ध कवी जॉन किट्स आणि ब्रॉन्टे भगिनींपर्यंत (शार्लट, एमिली आणि ॲन) अनेकांना क्षयाची बाधा झाली होती. अगदी आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांचाही मृत्यू या आजारामुळे झाल्याची नोंद वाचायला मिळते.
२४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?
१९ व्या शतकात लुई पाश्चर ह्यांचा सूक्ष्मजंतुवाद रोगनिर्मितीच्या शाखेतील एक महत्त्वाचं योगदान ठरला. १८६२ साली ए. जे. विलेमिन या फ्रेंच लष्करी वैद्यांनी कफक्षयामुळे मेलेल्या एका माणसाचं शवविच्छेदन केलं. त्या माणसाच्या कफाच्या ऊतकाला एका इंजेक्शनच्या सहाय्याने एका सशाच्या शरीरात सोडल्यानंतर त्या सशाला साडेतीन महिन्यांनी कफक्षय झाल्याचे आढळले, पण ह्या रोगाला पहिल्यांदा शोधण्याचे श्रेय वैद्यक, संशोधक आणि सूक्ष्मजंतूशास्त्राचे जनक रॉबर्ट कॉख यांना जाते. २४ मार्चला १८८२ मध्ये म्हणजे आजच्याच दिवशी १४४ वर्षांपूर्वी कॉख यांना क्षयाचे जिवाणू (rod shaped – bacillus) सापडले. हे जिवाणू दंडाकार असल्याने त्यांना दंडाणू म्हणतात. कॉख यांच्या या शोधानंतर पुढील कित्येक वर्ष हा आजार कॉख विकार म्हणून ओळखला जायचा. १९०५ साली कॉख यांना या कार्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.
क्षयरोग कसा होतो?
क्षयरोग हा प्रामुख्याने श्वसनमार्गाद्वारे संक्रमित होणाऱ्या ‘बॅसिली’ (Bacilli) किंवा दंडाणूंच्या माध्यमातून पसरतो. हे दंडाणू फुफ्फुसांत प्रवेश करून शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला आव्हान देतात. फुफ्फुसाच्या एका भागात पांढऱ्या पेशी (White Blood Cells) आणि तंतुमय ऊतके (Fibrous Tissue) या जंतूंभोवती एक प्रकारचे वेष्टन तयार करतात, ज्यामुळे ते तिथेच रोखले जातात आणि दीर्घकाळ शरीरात राहू शकतात. खोकणे, शिंकणे किंवा थुंकीच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. विशेषतः दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये एका बाधित व्यक्तीकडून अनेक निरोगी व्यक्तींना हा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
क्षयरोगाची सामान्य लक्षणं
क्षयरोगाची लक्षणे केवळ खोकल्यापुरती मर्यादित नसतात. सुरुवातीला तीव्र डोकेदुखी, मान आखडणे, ताप येणे आणि हळूहळू शुद्ध हरपण्यापर्यंत रुग्ण पोहोचू शकतो. काही प्रकरणांत आकडीसारखे अपस्माराचे झटकेही येतात. इंद्रियांच्या विकारामुळे पोटात सतत दुखणे किंवा शरीराच्या एखाद्या भागात गाठ येणे, अशा विविध स्वरूपात क्षयाची लक्षणे दिसतात. फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्यास तीव्र खोकला आणि खोकताना रक्ताच्या उलट्या होणे, यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.
क्षयरोगाचे प्रकार
क्षयरोगाचे दोन प्रमुख प्रकार अगदी सुरुवातीला पाहायला मिळतात ते म्हणजे,
१. फुफ्फुसांचा क्षयरोग (pulmonary tuberculosis)
२. फुफ्फुसेतर भागातील क्षयरोग (Extrapulmonary tuberculosis).
फुफ्फुसांच्या क्षयरोगामध्ये सातत्याने खोकला येणे (किमान ३ आठवड्यांपासून), खोकतांना रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वास घेतांना त्रास होणे, ताप येणे, थंडी वाजणे, रात्री झोपल्यावर घाम येणे, सारखी चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे आणि अचानक वजनात घट होणे अशी लक्षणं जाणवतात. फुफ्फुसांचा क्षयरोग बरा न झाल्यास तो फार लवकर संक्रमित होतो तसेच तो फुफ्फुसांना कायमचे निकामी करून टाकतो.
फुफ्फुसेतर भागातील क्षयरोग हा फुफ्फुसात क्षयरोग झाल्यानंतर रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोहोचतो. यात अनेक उपप्रकार असतात:
अ.) लसिकायक्ष्मा (Lymphnode T.B.) लसिका ग्रंथींना सूज येणे, ताप येणे अशी लक्षणं ह्या क्षयरोगात दिसतात.
ब.) हाडे व सांध्यांचा क्षयरोग (Bone & joint T.B./ skeletal T.B.) पाठीचे दुखणे तसेच सांध्यांचे दुखणे, कडकपणा वाटणे, सूज येणे, हालचाल करतांना त्रास जाणवणे.
क.) कणियक्ष्मा (Miliary T.B.) ह्या विशिष्ट प्रकारात आजाराचे जीवाणू संपूर्ण शरीरभर पसरतात.
ड.) मेंदूयक्ष्मा (brain T.B./ T.B. Meningitis) ह्या विशिष्ट प्रकारात मेरुरज्जु, पाठीचा कणा तसेच आधारकला (Membrane) ह्यावर परिणाम होतो.
इ.) मूत्रजननयक्ष्मा ( Genitourinary T.B.) यकृत, मूत्राशयाचा क्षयरोग.
३.) सूप्तयक्ष्मा (latent T.B.)
ह्या प्रकारात जिवाणू आपल्या शरीरात राहतो पण कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला जाणवत नाही किंबहुनी तो आपल्याला दिसतही नाही. ह्या प्रकारात रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे; (एच. आय. व्ही., मधुमेहसारख्या रोगांच्या औषधोपचारामुळेही हा धोका संभवतो.) धुम्रपान किंवा अधिक मद्यपानामुळेही हा त्रास उद्भवतो.
४.) एम. डी. आर. टी. बी. आणि एक्स. डी. आर. टी. बी.
एकदा क्षयरोग झाल्यावर त्यावर पूर्ण उपचार न झाल्यास, डी. आर. टी. बी. म्हणजेच ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस (औषधप्रतिरोधीयक्ष्मा) होतो. काही क्षयाचे विकार हे प्रमाणित औषधोपचारानंतरही बरे न होता तसेच राहातात, यामुळे उपचार करणे कठीण होऊन बसते. अशा प्रकारच्या क्षयात पुन्हा दोन प्रकार आढळतात ते पुढीलप्रमाणे;
- (एम. डी. आर. टी. बी.) मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस: या प्रकारात आयसोझोनाईड आणि रिफॅंपीसीन अशा किमान दोन ड्रग्जचा प्रतिरोध केला जातो.
- (एक्स. डी. आर. टी. बी.) एक्सटेंसिवली ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस: या प्रकारात जवळपास सर्वच औषधोपचारांचा प्रतिरोध करणारा यक्ष्मा तयार होतो. जो बरा करणं अधिक कठीण होऊन बसतं.
क्षयरोग बरा होऊ शकेल का?
प्राथमिक स्तरावरील क्षयरोग योग्य औषधोपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचारांमध्ये प्रामुख्याने रिफॅम्पिसिन, आयसोनिआझिड, इथॅम्ब्युटॉल आणि पायरॅझिनामाइड या औषधांचा वापर केला जातो. भारतात ‘डॉट्स’ (DOTS – Directly Observed Treatment, Short-course) या प्रणालीद्वारे रुग्णांना थेट निरीक्षणाखाली औषधे दिली जातात. क्षयरोगाचा उपचार अर्धवट सोडणे अत्यंत धोकादायक असते, कारण यामुळे साध्या क्षयरोगाचे रूपांतर MDR-TB किंवा XDR-TB मध्ये होते, ज्यावर उपचार करणे अधिक कठीण आणि खर्चिक असते. रुग्णांनी संयम राखून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण कोर्स पूर्ण केल्यास क्षयरोगावर खात्रीशीर मात करता येते.
मुंबई: क्षयरोगाचे केंद्र आणि धोरणात्मक आव्हाने
भारतात उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर क्षयरोगबाधितांची सर्वाधिक संख्या मुंबईत आढळते. मुंबईतील शिवडी येथील रुग्णालय हे या आजारावरील उपचारांसाठी आशियातील सर्वांत मोठे केंद्र मानले जाते. ‘मेडेसिन्स सॅन फ्रंटीअर्स’ (MSF) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या २०२१ मधील संशोधन अहवालाने या संकटाचे गंभीर पैलू समोर आणले आहेत. या अहवालातील २९ निष्कर्षांनुसार सरकारी संसाधनांची कमतरता, धोरणांमधील त्रुटी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात येणारे अडथळे यामुळे क्षयरोग निर्मूलनात अडथळे येत आहेत.
प्रतिबंधात्मक काळजी आणि वेळेवर उपचार हाच एकमेव मार्ग
जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी तब्बल २७% रुग्ण भारतात आहेत. इंडोनेशिया (१०%), फिलिपाईन्स (७%) आणि चीन (६.५%) यांच्या तुलनेत भारतापुढील आव्हान मोठे आहे. विकसित देशांनी या आजारावर नियंत्रण मिळवले असले तरी, भारतात मात्र सरकारी धोरणे आणि प्रत्यक्ष कृती यांतील तफावत आजही कायम आहे. जोपर्यंत अधिक प्रभावी लसींचा शोध लागत नाही, तोपर्यंत प्रतिबंधात्मक काळजी आणि वेळेवर उपचार हाच एकमेव मार्ग आहे.”
